agriculture story in marathi, farmer Vaibhav Kale from Nagar Dist. has started geranium oll production & contract farming for same. | Agrowon

जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून यशाची गुढी

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 13 एप्रिल 2021

देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या पंचविशीतील तरुणाने जिरॅनिअमपासून तेलनिर्मिती व्यवसायात दमदार वाटचाल सुरू केली आहे. स्वतःकडील १० एकरांसह सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे जिरॅनियम उत्पादन घेण्यात येते. 

देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या पंचविशीतील तरुणाने जिरॅनिअमपासून तेलनिर्मिती व्यवसायात दमदार वाटचाल सुरू केली आहे. स्वतःकडील १० एकरांसह सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे जिरॅनियम उत्पादन घेण्यात येते. येत्या काळात १०० एकरांपर्यंत विस्ताराचे ध्येय बाळगून त्यानुसार प्रयत्न व यशाची गुढी उंचावण्यास सुरुवात केली आहे.

नगर तालुक्यातील देहरे, खारेकर्जुने, विळद पट्टा तसा दुष्काळी. काही प्रमाणात या भागाला मुळा धरणाचा आधार आहे. उपलब्ध पाण्यावर ऊस, फळपिके, कांदा यांसारखी पिके घेतली जातात. नगर शहराला जवळ असल्याने दुग्ध व्यवसायाचाही जोडही काही शेतकरी देतात. त्यामुळे दुग्ध उत्पादन करणारे गाव अशी देहरेची ओळख आहे. शेतीतील नवे व्यवसाय, बाजारपेठांच्या मागण्या ओळखून नवे प्रयोग करण्याकडेही कल वाढला आहे.

काळे यांची शेती
गावातील विक्रम काळे यांची वीस एकर शेती आहे. त्यांचा मुलगा वैभव याने ‘बीएस्सी ॲग्री’चे घेतले. पूर्वी काळे कुटुंब पारंपरिक पिके घेत. सन २००५ मध्ये आठ एकरांवर डाळिंब लागवड केली. मात्र तेलकट डाग व अन्य रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होऊ लागला. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यात तफावत येऊ लागली. मग बाग काढून टाकली. दरम्यान, वैभव यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर गुजरातमध्ये एका कंपनीत चार महिने नोकरी केली. त्यानंतर काही काळ कांदा खरेदी- विक्री व्यवसाय केला. त्यानंतर पूर्णवेळ शेतीतच करिअर करण्याचे पक्के करून सूत्रे हाती घेतली.

जिरॅनिअम शेतीचा शोध
अभ्यासू व शोधक वृत्तीच्या वैभव यांना मुंबईत सुगंधी उत्पादने तयार करणाऱ्या आणि जिरॅनिअम तेल खरेदी करणाऱ्या कंपनीबाबत माहिती मिळाली. तेलाची मागणी, महत्त्व व अर्थकारण समजले. हाच व्यवसाय करायचे पक्के झाल्यावर लखनौ येथील सुगंधी व औषधी तेलविषयक संस्थेत पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सन २०१७ मध्ये एका एकरात जिरॅनिअमची लागवड केली.

व्यवसायातील वाटचाल
वैभव यांनी तेलखरेदी करणाऱ्या मुंबई येथील कंपनीविषयीही माहिती घेतली होती. त्यांच्याकडून रोपे उपलब्ध झाली. वैभव सांगतात की सुरुवातीला स्टंप लावावे लागतात. नर्सरीत वाढ करावी लागते.पुनर्लागवड केल्यानंतर चार महिन्यांनी उत्पादन सुरू होते. त्यानंतर दर साडेतीन महिन्यांनीपाल्याची कापणी करावी लागते. लागवड केल्यावर तीन वर्षे पीक चालते. दर पंधरा दिवसांनी पाणी द्यावी लागते. बाकी खते व कीडनाशकांचा गरजेनुसार वापर होतो. दीड वर्षापासून लागवडीसाठी मल्चिंगचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्यात बचत होत आहे. तणांची समस्याही कमी झाली आहे.

उत्पादन व करार शेती
एका वर्षात एकरी तीस ते चाळीस टन पाला मिळतो. त्यापासून ३० ते ४० किलो तेल उपलब्ध होते. पूर्वी एक एकर असलेले क्षेत्र आता १० एकरांवर नेले आहे. मात्र तेलाची मागणी पाहात उपलब्धता वाढवण्यासाठी परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेती करण्यास सुरुवात केली आहे. प्रति टन पाच ते सहा हजार रुपये दराने खरेदी केली जाते. करारांतर्गत शेतकऱ्यांना रोपांचा पुरवठा तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन केले जाते.

व्यवसायातील ठळक बाबी

  • वैभव लक्ष्मी जिरॅनिअम फार्म असे प्रकल्प नामकरण
  • जिरॅनिअम तेल काढण्यासाठी २०१७ मध्येच दोन लाख रुपये गुंतवून डिस्टिलेशन युनिट उभारले.
  • प्रति दिन एक टन पाल्यापासून तेल काढणी क्षमता वाढवून ती चार टनांपर्यंत केली आहे. एका टॅंकचे दोन टॅंक उभारले आहे. प्रति टन तेल काढणीसाठी एक हजार रुपये खर्च येतो. चार लाखांची सध्याची गुंतवणूक.
  • मुंबई येथील एका कंपनीला तेल पुरवठा. प्रति लिटर साडेबारा हजार रुपये दर मिळतो.
  • वाहनातून पाठवले तरी रीतसर वजनानुसार रक्कम ऑनलाइन वर्ग होते.
  • चार वर्षांपासून तेलाच्या दरात चढउतार नाही.
  • अलीकडील वर्षांत नगर जिल्ह्यात केवळ दोन ठिकाणी जिरॅनिअमची लागवड. वैभव यांचा त्यात समावेश आहे. टाकळी खातगाव (ता. नगर) येथील योगेश पादीर, नीलेश कुलट तर गावातील हरिदास करंडे, भारत काळे, अमोल काळे यांनीही केली लागवड.

व्यवसाय विस्ताराचे उद्दिष्ट
येत्या काळात वैभव यांनी सुमारे शंभर एकरांवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. वयाच्या पंचविशीतच त्यांनी चांगला पल्ला गाठला आहे. वडील विक्रम, आई लता, पत्नी अस्मिता यांची साथ त्यांना लाभते.
भागात बहुतेक पहिल्याच असलेल्या या जिरॅनिअम प्रयोगाचे शेतकऱ्यांना अप्रूप आहे. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

रोपनिर्मिती, कंपोस्ट खत

  • तेलनिर्मितीनंतर उर्वरित भागापासून एकरी तीस ते पस्तीस टन कंपोस्ट खतनिर्मिती. त्याचा शेतात वापर.
  • यंदाच्या वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने जिरॅनिअम घेण्याचा प्रयोग
  • तीन वर्षांपासून रोपवाटिका. करार शेती अंतर्गत त्याचा पुरवठा केला आहे. वर्षाला तीन लाख रोपे तयार करण्याची क्षमता.

‘नैसर्गिक संकटे, दरांचा प्रश्‍न, वन्यप्राणी, अन्य कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी सतत चिंतेत असतात. जिरॅनिअम शेतीवर मात्र तुलनेने प्रतिकूल बाबींचा परिणाम होत नाही. कोरोना संकटातही फार नुकसान सोसावे लागले नाही. जिरॅनिअम तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने व सुगंधी द्रव्ये निर्मिती उद्योगात होतो. त्यामुळे नैसर्गिक सुगंधी स्रोत म्हणून मागणी व संधीही भरपूर आहे.
-वैभव काळे
संपर्क- ९८६०८०२०६४

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...