हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
यशोगाथा
भूमिहीन ते प्रयोगशील शेतकरी, केली संघर्षमय वाटचाल
नंदापूर (जि. जालना) येथील विलासराव टेकाळे यांनी भूमिहीन ते प्रयोगशील शेतकरी असा संघर्षमय प्रवास यशस्वीपणे पेलला आहे. स्व हिमतीवर त्यांनी डाळिंब, इमूपालन, शेळीपालन, द्राक्ष बाग अशी विविधता शेतीत उभी केली. त्यातून आर्थिक व सामाजिक पत तयार केली आहे.
नंदापूर (जि. जालना) येथील विलासराव टेकाळे यांनी भूमिहीन ते प्रयोगशील शेतकरी असा संघर्षमय प्रवास यशस्वीपणे पेलला आहे. स्व हिमतीवर त्यांनी डाळिंब, इमूपालन, शेळीपालन, द्राक्ष बाग अशी विविधता शेतीत उभी केली. त्यातून आर्थिक व सामाजिक पत तयार केली आहे.
जालना जिल्ह्यातील नंदापूर, कडवंची, धारकल्याण, वरूड, वखारी, आदी दहा ते पंधरा गावात द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. या गावांच्या शिवारात शेततळ्यांचं जाळंही पसरले आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर शिवारातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने भर असतो. त्यामुळेच द्राक्षाला मत्स्य व्यवसाय, भाजीपाला, फुलशेती, शेळी व कुक्कुटपालन आदींची जोड देण्याचं काम शेतकरी करताहेत.
टेकाळे यांची वाटचाल
द्राक्षाचं आगर असलेल्या कडवंचीला लागूनच नंदापूर (ता. जि. जालना) गाव आहे. येथील विलासराव त्र्यंबकराव टेकाळे, पत्नी सौ. वनमाला व दहावीत शिकणारा मुलगा शिवराज असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. आजघडीला त्यांची साडेचार एकर शेती. भूमिहीन ते द्राक्ष बागायतदार असा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला. खरं तर टेकाळे मूळचे बदनापूर तालुक्यातील राजूर गणपतीजवळ असलेल्या हिवरा दाभाडीचे. लहानपणीच आईचे निधन झाले. मग बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथील मामांनी सांभाळ केला. त्यानंतर ते मावशीचं गाव असलेल्या नंदापूर येथे आले. तिथे मावशीच्या आधाराने जालना व नाव्हा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच किराणा दुकान चालवण्याचे धडे मिळाले. सन २००० मध्ये विवाह झाल्यानंतर ते स्वतंत्र राहू लागले.
शेतीसाठी धडपड
मावशीचे पती कै. पंडितराव उबाळे, त्यांचे बंधू अंकुशराव व विष्णू यांनी विलासरावांना भरपूर मदत केली. त्यामुळेच पुढील शेतीची वाटचाल सुकर झाली. पुढे इमूपालनासाठी अडीच एकर शेती ‘लीज’वर घेतली. व्यवसाय यशस्वी केला, पण बाजारपेठ अभावी तो टिकला नाही. हिंमत न हारता पुन्हा कर्ज घेऊन शेळीपालन सुरू केले. उत्तम व्यवस्थापनातून सुमारे १०० शेळ्यांपर्यंत विस्तार केला. किराणा दुकान व शेळीपालनातील उत्पन्नातून तीन एकर शेती घेतली. त्यात शासकीय योजनेतून शेततळे व विहीर घेतली.
डाळिंब शेती
शेतीत सुरुवातीला एक एकरात डाळिंबाची लागवड केली. त्यातून दरवर्षी चांगले उत्पन्न घेण्याचे
प्रयत्न केले. मग दोन वर्षे पाऊण एकरांत द्राक्षाचे पीक घेतले. सारं काही सुरळीत सुरू होते. परंतु समृद्धी महामार्गासाठी तीन एकर शेतीपैकी अडीच एकर जमीन अधिग्रहित झाली. डाळिंबशेती व शेळीपालन त्यामुळे थांबले. जमीन अधिग्रहणातून मिळालेल्या पैशातून चार एकर शेती विकत घेतली. त्यात पुन्हा शेततळे व विहीर उभारून अडीच एकरांवर द्राक्ष बाग उभी केली. सध्या एकूण शेती साडेचार एकरांपर्यंत आहे. बारा वर्षांचा शेतीतील अनुभव निर्माण झाला आहे. द्राक्षे अडीच एकरांत असून, सुपर सोनाका, माणिकचमन हे वाण आहेत.
जागेवर मिळते बाजारपेठ
ऑक्टोबर छाटणीवरच भर असतो. दरवर्षी मिळणारे दर लक्षात घेऊन छाटणीच्या वेळेचे नियोजन होते.
एकरी सुमारे १० ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास किलोला ३० रुपयांपासून ते ४०, ४५ रुपयांपर्यंत दर मिळतो. एकरी एक लाख रुपयांहून अधिक किमान खर्च असतो. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात.
वेळेत कर्जफेडीतून निर्माण केली पत
स्वतंत्र राहण्यास सुरुवात केल्यानंतर विलासरावांनी गावात किराणा दुकान थाटलं. त्यासाठी जागाही पाहुण्यांनी दिली. शासन देत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जासाठीच्या सोयीतून युनियन बॅंकेकडून ४० हजारांचे कर्ज घेतले. इमूपालनासाठी अडीच लाखांचे
तर त्यानंतर पुन्हा शेळीपालनासाठी आठ लाखाचे घेतलेलं कर्ज वेळेत फेडले. त्यामुळे बॅंकेकडे पत निर्माण झाली.
द्राक्ष बाग व्यवस्थापनातील ठळक बाबी
- माल काढणीनंतर महिनाभर बागेला विश्रांती.
- खरड छाटणीपूर्वी बागेला एकरी १० ट्रॉली शेणखत
- शेण, बेसणपीठ, गूळ, काळी माती, गोमूत्राची दिली जाते स्लरी.
- माती, पाणी, देठ परीक्षणानुसार रासायनिक खतांचे व्यवस्थापन
- स्लरीत २० किलो शेण, पाच किलो बेसनपीठ, ५ किलो गूळ, अर्धा किलो काळी माती व १० लिटर गोमूत्राचा वापर केला जातो. एका एकरासाठी तीन ते चार दिवस ते ढवळत ठेवले जाते.
अन्य उल्लेखनीय बाबी
- सेवाकार्यासाठी गावात नंदादीप सेवा मंडळाची स्थापना
- पत्नी वनमालाही सांभाळतात शेतीची जबाबदारी.
- अलीकडेच सात हजार मत्स्यबीज शेततळ्यात सोडून सुरू केले मत्स्यपालन.
- माशांसाठी ऑक्सिजन व दोन वेळा खाद्य देण्यावर कटाक्ष
- शेततळ्याच्या काठावर २०० लिटरच्या टाक्या ठेवल्या आहेत. टाक्यांच्या बुडाशी एक फूट काळी माती वापरली आहे. वरील भागात शेण, सिंगल सुपर फॉस्फेट, शेंगदाणा पेंड आदींचं द्रावण तयार केलं जातं.
- उस्मानाबादी शेळ्यांच्या संगोपनासाठी पुन्हा चालविली तयारी.
- दोन ट्रॅक्टर्स, शेताच्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही
फवारणी यंत्रातून पूरक व्यवसाय
सन २०१८ मध्ये विलासरावांनी फवारणीसाठी इलेक्ट्रोस्टॅटिक यंत्र घेतले. त्याचा वापर स्वतःच्या बागांत करण्याबरोबरच अन्य शेतकऱ्यांसाठी भाडेतत्वावर करून देऊ लागले. त्यासाठी तीन कामगार तैनात केले आहेत. एकरी दोन हजार रुपये शुल्क त्यासाठी घेण्यात येते. त्यातून पूरक उत्पन्नाचा स्रोत मिळाला. तीन वर्षांत जवळपास १८०० एकरांत हे काम केले आहे.
‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक
आपण ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक असल्याचे विलासराव अभिमानाने सांगतात. वाचनातून ज्ञान मिळाले. कल्पना सुचल्या. त्यास प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. कोणतेही काम करण्याचं मनात आल्यानंतर ते करू म्हणण्यापेक्षा करून पाहायच्या वृत्तीमुळे अनुभव आला व धाडस वाढत गेल्याचे विलासराव सांगतात.
संपर्क- विलासराव टेकाळे, ९८२३४३३३८२
फोटो गॅलरी
- 1 of 98
- ››