सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार केला आदर्श

बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी सुयोग्य व्यवस्थापन, पट्टा पध्दत, विविध वाणांची निवड व बिजोत्पादन यातून हरभरा पिकात आदर्श तयार केला आहे. एकरी ११ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असलेल्या देशमुख यांच्या बियाण्याला राज्यभरातून मागणी असते.
विनोद देशमुख यांनी पट्टा पद्धतीने लागवड केलेला हरभरा
विनोद देशमुख यांनी पट्टा पद्धतीने लागवड केलेला हरभरा

बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी सुयोग्य व्यवस्थापन, पट्टा पध्दत, विविध वाणांची निवड व बिजोत्पादन यातून हरभरा पिकात आदर्श तयार केला आहे. एकरी ११ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असलेल्या देशमुख यांच्या बियाण्याला राज्यभरातून मागणी असते. हवामानात झालेले बदल शेतीला मारक ठरत आहेत. चांगले व्यवस्थापन करूनही अनेकवेळा मनासारखे उत्पादन साधत नाही. दुसरीकडे उत्पादन खर्चही सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत उत्पादकता कायम ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सवडद (ता.. सिंदखेडराजा) येथील विनोद देशमुख यांनी हे आव्हान पेलून त्याला सुसंगत हरभरा शेती करून आदर्श तयार केला आहे. त्यांचे एमए पर्यंत झाले आहे. नोकरीच्या उद्देशाने त्यांनी ‘पीएसआय’ स्पर्धा परिक्षेची तयारीही केली. मात्र काही कारणांमुळे त्यात मनासारखे यश मिळाले नाही. परंतु न खचता शेतीत प्रयोगशील राहण्याचे ठरवले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण २० एकर शेतीचे व्यवस्थापन हाती घेतले. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात सातत्यपूर्ण उत्पादन काढण्यात हातखंडा निर्माण केला. त्यासाठी लागणारे नवनवीन ज्ञान, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रांनी संशोधित केलेले वाण, व्यवस्थापनात सुधारणा यावर जोर दिला. हरभरा व्यवस्थापन वाणाची निवड-   खरिपात सोयाबीन व तूर घेतल्यानंतर विनोद रब्बीत दरवर्षी १० ते ११ एकरांत हरभरा आणि दोन एकरांत गहू घेतात. अलीकडील काळात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे, अशा काळात यंत्राच्या साह्याने काढणी करणे (हार्वेस्टर) शक्य असलेल्या फुले विक्रम व पीडीकेव्ही कनक यासारख्या वाणांवर भर देतात. मर रोग प्रतिबंधक, सरळ व उभट वाढणारे तसेच अधिक उत्पादन देणारे वाण असाही विचार असतो. विनोद सांगतात की दहा बारा एकरांत किमान दोन ते तीन वाण असतात. ते वेगवेगळ्या कालावधीचे असतात. प्रतिकूल हवामानाने एखाद्या वाणाला फटका बसल्यास दुसरे वाण आधार देऊन जाते. पट्टा पद्धतीचा वापर सहा ओळीनंतर एक ओळ रिकामी या पद्धतीने पट्टा पद्धतीचा अंगीकार करतात. या पद्धतीमुळे पिकाला मोकळी हवा मिळते. स्प्रिंकलरद्वारे खते देणे, कीडनाशकांची फवारणी करणे सोपे होते. या सर्व बाबींचा उत्पादन वाढीला फायदा होतो. दोन ओळींमधील अंतर १६ इंच तर दोन झाडांमधील अंतर चार इंच ठेवतात. खत व्यवस्थापन जैविक बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, पीएसबी आदी सूक्ष्मजीवांवर आधारित खतांचा वापर होतो. पेरणी करतेवेळी १४- ३५- १४ एकरी ५० किलो असा वापर करतात. ह्युमिक ॲसिडचाही गरजेनुसार वापर होतो. दुय्यम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत एकरी १२ किलोप्रमाणे याप्रमाणे वापर होतो. विनोद सांगतात की पाच अंश सेल्सियसपेक्षा तापमान कमी झाल्यास व २८ ते ३० अंशापेक्षा वाढल्यास तसेच फुलोरावस्थेत जास्त थंडी जाणवल्यास पीक ताणामध्ये जाते. अशावेळी योग्य काळजी घ्यावी लागते. अशावेळी परिस्थिती पाहून अमायनो ॲसिडची फवारणी व पाण्याचा हप्ता असे नियोजन करतो. पाणी व्यवस्थापन सिंचनासाठी स्प्रिंकलरचा वापर होतो. विहिरीचा स्रोत आहे. सिंचनाच्या दृष्टीने या पिकाच्या तीन संवेदनशील अवस्था आहेत. लागवड केल्यानंतर पहिले, फुलकळी लागण्याच्या अवस्थेत दुसरे तर दाणे भरण्याची अवस्था सुरु होताच तिसरे या पद्धतीने पाणी दिले जाते. गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्यास मुळकूज येते. कीड नियंत्रण घाटेअळीचे नियंत्रण हा महत्त्वाचा भाग आहे. जैविक नियंत्रणावर अधिक भर असून गरजेनुसार तीन ते चार वेळा फवारण्या घेतात. सोबत प्रत्येक फवारणीत बुरशीनाशकाचा वापर होतो. उत्पादन व उत्पन्न प्रति झाड ३० ते ३५ फांद्या, प्रति फांदीला १२ ते १३ घाटे असतात. एकरी उत्पादन खर्च किमान १० हजार व त्याहून अधिक होतो. बियाणे एकरी ३० किलो लागते. अर्थात ते घरचे असल्याने त्यावरील खर्च कमी होतो. बीज प्रक्रियेसाठी २०० ते २५० रुपये प्रति एकर खर्च होतो. दरवर्षी एकरी सरासरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. बियाण्यासाठी विक्री केल्यास ७००० रुपये प्रति क्विंटल तर बाजारात विक्री केल्यास ५००० रुपये असा दर मिळतो. मागील तीन वर्षांतील उत्पादन (एकरी) वर्ष              उत्पादन २०२०           नऊ क्विंटल ५० किलो २०१९           दहा क्विंटल २५ किलो २०१८          ११ क्विंटल एकरी सन २०२० मध्ये कनक वाण बियाण्याची ७००० रुपये दराने , सन २०१९ मध्ये विक्रम हरभरा बियाण्याची ८००० रुपये तर २०१८ मध्ये दिग्विजय वाणाची ६५०० रुपये दराने विक्री. बीजोत्पादन विनोद यांनी हरभरा बीजोत्पादनात आपली ओळख तयार केली आहे. ते सांगतात की कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ नव्या वाणांचे बियाणे चाचण्या घेण्यासाठी देतात. पीक पैदासकार बियाण्यासाठी शेतकऱ्यांना माझे नाव सुचवतात. दिग्विजय, फुले विक्रम, पीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, पीकेव्ही कनक या वाणांचे बीजोत्पादन घेतले आहे. बियाणे कोल्ड स्टोरेजलाही ठेवण्यात येते. यंदा पीडीकेव्ही कनक वाणाचे सुमारे ४५ क्विंटल बियाणे ठेवले असून क्विंटलला सातहजार रुपये दराने विक्रीचे नियोजन आहे. मागील वर्षी फुले विक्रम बियाण्याची १०० क्विंटलपर्यंत राज्यभरातील शेतकऱ्यांना विक्री केली आहे. हरभरा व्यवस्थापनात तज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबरोबर ॲग्रोवन व अन्य साहित्य वाचनही करतात. या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष शेतीत होतो. संपर्क- विनोद देशमुख- ९४२१३९६३४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com