फळबाग शेतीसह बारमाही भाजीपाला पिकांचा पॅटर्न 

लिंबू बागेत विनोद पाटील.
लिंबू बागेत विनोद पाटील.

धुळे जिल्ह्यातील चौगाव (ता. धुळे) येथील युवा शेतकरी विनोद सीताराम पाटील यांनी फळबाग केंद्रित शेतीसह बारमाही भाजीपाला शेतीचा पॅटर्न अवलंबिला आहे. टोमॅटो, दोडके, गिलके, लिंबू, सीताफळ  आदी पिकांची विविधता त्यांच्या शेतीत दिसून येते. सोबतच आपल्याकडील दोन शेळ्यांचे व्यवस्थित संगोपन करून त्यांची संख्या १४ पर्यंत वाढविली आहे. लाहूर व तितर संगोपनही यंदा सुरू केले आहे. शेतीचे सूक्ष्म नियोजन, पूरक व्यवसाय व व्यावसायिक दृष्टिकोनातून आर्थिक स्रोत वाढविले आहेत.    धुळे जिल्ह्यातील चौगाव (ता. धुळे) येथील तरुण शेतकरी विनोद सीताराम पाटील यांची सात एकर शेती आहे. एका भागात तीन एकर तर दुसऱ्या भागात चार एकर हलकी, मुरमाड जमीन आहे. दोन विहिरी असून पाणी मुबलक आहे. विनोद यांनी डीएडपर्यंतचे शिक्षण घेतले. पण, नोकरीत संधी न मिळाल्याने १९९५ मध्ये त्यांनी शेतीचाच अनुभव घेण्यास सुरवात केली. वडील सीताराम, पत्नी सौ. मोहिनी यांच्या भक्कम साथीमुळे त्यांचा शेतीतील हुरूप वाढला.  लिंबू, सीताफळाची बाग  विनोद यांनी फळबाग केंद्रित शेतीवर भर दिला आहे. सुमारे १२ वर्षे जुनी चिकूची बाग असून १०० झाडे जोपासली आहेत. नोव्हेंबर ते जून असा काढणीचा हंगाम सुरू असतो. प्रतिझाडापासून ९० किलो उत्पादन मिळते. सव्वा क्विंटल चिकू चार दिवसाआड उपलब्ध होतो. सीताफळाची व लिंबाची बाग २२ वर्षे जुनी आहे. सुमारे ६० झाडे सध्या व्यवस्थित स्थितीत आहेत. लिंबाची स्वतंत्र १० गुंठ्यांतही पूर्वी लागवड केली होती. परंतु, बाग जुनी झाल्याने झाडांची संख्या कमी होत गेली. आजघडीला ४५ झाडे आहेत. लिंबांची बारमाही विक्री होते. मार्च ते जूनदरम्यान अधिक उत्पादन मिळते. वर्षभरात लिंबाचे प्रतिझाड  किमान ९० किलो उत्पादन देते. दर आठवड्यात सुमारे अडीच क्विंटल उत्पादन मिळते. सीताफळाच्या प्रतिझाडापासून सरासरी ६० किलो उत्पादन मिळते.  पिकांचे नियोजन  लिंबू किंवा फळबागांना सिंचन करण्यासाठी पाट पद्धतीचा उपयोग अधिक होतो. रासायनिक खतांचा वापर होत नाही. त्यापेक्षा जीवामृत देण्यावर भर असतो. फळबागांच्या नियोजनात मजुरीखर्चही कमी केला जातो. कुटुंबातील मंडळीच्या मदतीनेच काढणीचे अधिकाधिक नियोजन असते. विनोद तीन वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेतात. पॉली मल्चिंग पध्दतीने चार बाय दीड फूट अंतरावर जूनमध्ये लागवड होते. ठिबक, गादीवाफा पद्धतीचा अवलंब असतो. परिसरातील नर्सरीला बियाणे देऊन टोमॅटोची रोपे ते तयार करून घेतात. त्यासाठी ६० पैसे प्रतिरोप दर पडतो. एक दिवसाआड २० क्विंटल टोमॅटो निघतो.  टोमॅटोनंतर गिलके, दोडका  नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचा हंगाम संपतो. टोमॅटोचे वेल काढून त्याच जागेवरील पॉली मल्चिंग, गादीवाफ्यांवर गिलके व दोडक्‍यांची लागवड सुरू होते. लागवडीनंतर सुमारे ५५ दिवसांनी काढणी सुरू होते. ती मार्चपर्यंत सुरू असते. एक दिवसाड काढणी होते. प्रत्येकी दोन क्विंटल एक दिवसाआड उत्पादन मिळते. काढणीसाठी मजुरांची मदत घेण्यात येते.  अन्य पिकांचे नियोजन  गेल्या मे महिन्यात तीन एकरांत कोइमतूर येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या शेवगा वाणाची १२ बाय सात फूट अंतरात ठिबकवर लागवड केली आहे. उत्पादन नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. सर्व पिकांसाठी जीवामृताचा वापर होत असल्याने त्याचा गुणवत्ता वाढण्यास मदत होते. तीन एकरांत दरवर्षी पूर्वहंगामी बीटी कापसाची लागवड होते. दरवर्षी एक एकरात कलिंगडही असते. एकरी सुमारे ३० टन त्याचे उत्पादन मिळते. विनोद पपईची १९९२ पासून लागवड करायचे. या हंगामात पपई नसली तरी पपईत कोथिंबीर व कलिंगडाचे यशस्वी उत्पादनही त्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतले आहे.  पक्षीपालन  गेल्या मार्चपासून लाहूर व तितर पक्ष्यांचे संगोपनही करण्यात येत आहे. सात दिवस वयाचे पक्षी साक्री तालुक्‍यातील एका उत्पादकाकडून घेण्यात येतात. त्यांचे सुमारे ३५ दिवस संगोपन होते. प्रति पक्षी २० रुपयांना मिळतो. त्याची विक्री धुळे व परिसरातील हॉटेलचालक, खरेदीदारांना ७५ रुपये प्रतिपक्षी दराने होते. यंदा २०० पक्ष्यांच्या तीन बॅचेसचे संगोपन व विक्री साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन शेळ्यांचे संगोपन करीत त्यांची संख्या दीड वर्षात ही संख्या १४ पर्यंत वाढविली आहे. धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील व अन्य तज्ज्ञांच्या संपर्कात ते नेहमी असतात. कृषी प्रदर्शने वा तत्सम उपक्रमांमध्ये ते हिरिरीने सहभागी होतात.  दरांचे गणित  टोमॅटोची विक्री नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजारात होते. गेल्या हंगामात सरासरी २० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सीताफळ, चिकू व लिंबांची विक्री धुळे बाजार समितीत होते. लिंबाला नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान सरासरी ३० रुपये, मार्च ते जूनदरम्यान सरासरी ५० रुपये प्रतिकिलो दर मागील हंगामात मिळाला. सीताफळाला सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान सरासरी ६० रुपये तर चिकूला नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान सरासरी ३० रुपये आणि फेब्रुवारी ते जूनदरम्यान सरासरी ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. कलिंगडाची जागेवर व्यापाऱ्याला विक्री केली. आठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.  विनोद पाटील- ७९७२३५५७२८८, ९८५०८८२२१८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com