agriculture story in marathi, farmers are getting good success in direct marketing of their produce. | Agrowon

शेतीतच नव्हे. विक्रीतही आम्ही बहादूर!

संतोष मुंढे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील हरी देविदास ठोंबरे यांनी विक्री व्‍यवस्थेचा अभ्यास व विपणनाचे चातुर्य वापरून द्राक्षांची थेट विक्री केली. फळे व भाजीपाला यांच्या अनुषंगाने शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्रीचा औरंगाबाद विभागाचा पॅटर्नही आदर्श झाला आहे.

कोरोना संकटात आठवडी बाजार बंद झाले, बाजारांवर वेळेचे बंधन आले. शेतीमालाची मागणी मंदावली. त्यामुळे नाशिवंत फळे, भाजीपाला विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील हरी देविदास ठोंबरे यांनी विक्री व्‍यवस्थेचा अभ्यास व विपणनाचे चातुर्य वापरून द्राक्षांची तडाखेबंद थेट विक्री केली. फळे व भाजीपाला यांच्या अनुषंगाने शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्रीचा औरंगाबाद विभागाचा पॅटर्नही आदर्श झाला आहे.
 
मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोना संकटाचे स्वरूप यंदाच्या वर्षी अधिकच गंभीर झाले आहे. मुख्य म्हणजे शेती क्षेत्रावर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. आठवडी बाजार बंद झाले. बाजारांवर वेळेचे बंधन आले. शेतीमालाची मागणी मंदावली. नाशवंत फळे, भाजीपाला विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला. अर्थात, या संकटातून काही संधी देखील तयार झाल्या. औरंगाबाद जिल्हा हा त्यासाठी आदर्श उदाहरण म्हणायला हरकत नाही.

शेतकऱ्यांनी मिळवल्या संधी
औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील हरी देविदास ठोंबरे या युवा शेतकऱ्याने पहिल्यांदाच सुमारे दोन एकरांतील द्राक्षांसाठी थेट ग्राहक विक्रीचा पर्याय निवडला. केवळ पंधरवड्यात बांधावरून विकल्या गेलेल्या द्राक्षांव्यतिरिक्त जवळपास साडेआठ टन थेट विक्री केली. व्यापाऱ्यांनी १८ रुपये प्रति किलोने मागितलेल्या द्राक्षांना चक्क ४५ रुपये दरही त्यांनी पदरात पाडून घेतला.

फळबागांचे पद्धतशीर नियोजन
फळबाग व पाणीटंचाई या बाबी लक्षात घेऊन त्यांनी शेततळे उभारले. सन २०१३ मध्ये डाळिंब व पुन्हा त्यानंतर ते वाढवले. चांगले उत्पन्न मिळाले. नवे काही करून पाहावे म्हणून द्राक्ष बाग लावण्याचे ठरविले. नाशिक जिल्हा, जालना जिल्ह्यातील कडवंची व धारकल्याण परिसरात भेटी दिल्या. सन २०१७- १८ मध्ये लागवड केली. बांधावरच व्यापाऱ्यांना माल देण्याचे ठरवले. मात्र विकण्याचा अनुभव नसल्यामुळे व्यापारी मागेल त्या किमतीमध्ये दोन वर्षे माल दिला.
पण दुसरा पर्याय नव्हता.

संकटावर संकटे
यंदा द्राक्ष उत्पादनात निसर्गाच्या प्रतिकूल बाबींचा सामना करावा लागला. अति पावसात
घड खूप कमजोर निघाले. मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. कोरोना संकटाने यंदाही डोके वर काढले. यंदा द्राक्षे विक्रीसाठी मार्चच्या मध्यात तयार झाली. पण आठवडाभर भरपूर फोन करूनही व्यापारी जागेवर येईनात. कोरोना संकटाचे कारण सांगून मातीमोल दराने द्राक्षे मागू लागले. व्यापारी मागेल त्या दराने देणे किंवा बाजार समितीत नेऊन देणे हे दोनच पर्याय समोर होते.

उल्लेखनीय विक्रीने वाढविले बळ
बाजारपेठेतही चांगला दर नव्हता. व्यापारीही बाजारपेठा बंद असल्याने माल खरेदीसाठी धजावत नव्हते. दोन दिवस विचार केल्यानंतर हरी यांनी स्वतः विक्रीचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘एमआयडीसी’ येथे जाऊन वेगवेगळ्या ‘पॅकिंग’च्या पेपर बॅग्ज आणल्या. ‘सोशल मिडिया’ औरंगाबाद शहरात माफक दरात द्राक्षे घरपोच मिळतील असा संदेश पाठविला. पहिल्याच दिवशी ४३० किलो बुकिंग झाले. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरात ग्राहकांना ती घरपोच देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात विकण्याचे ठरविले. परंतु किती प्रमाणात माल विकला जाईल याची शाश्‍वती नव्हती. तरीही जवळपास बाराशे किलो पर्यंत नियोजन केले. सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावी विक्रीसाठी नेली. सकाळी सात वाजता विकण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत जवळपास एक टनापर्यंत तडाखेबंद विक्री झाली. एकावेळी दहा दहा लोक खरेदीसाठी रांगेत उभे असायचे. हीच बाब उत्साह वाढवणारी ठरली. आपण पिकवतो ते चांगल्या पद्धतीने विकूही शकतो ही खात्री ठोंबरे यांना पटली. मागणी येत जाईल त्यानुसार द्राक्षे विकत गेले. शहरी भागात ५० रुपये, तर ग्रामीण भागात ४० रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू केली. माल थेट ग्राहकांपर्यंत नेल्याने व्यापाऱ्यांनी मागितलेल्या किमतीपेक्षा दुपट ते अडीचपट जास्त दर मिळाला. एकूण थेट विक्री सुमारे १७ ते १८ टन करण्यात ठोंबरे यांना यश मिळाले. दरवर्षी ते द्राक्षाचे एकरी १३ ते १४ टनांपर्यंत उत्पादन घेतात. मागील दोन वर्षे त्यांना किलोला २२ ते २७ रुपये दरांवर समाधान मानावे लागले होते.

कामास जोर 
विक्रीचे सत्र सुरू असताना तिसऱ्या दिवशी ठोंबरे कुटुंबाच्या आधारवड आजी सत्यभामाबाई ठोंबरे यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे विक्री काही दिवस थांबविण्यात आली. परंतु नाशवंत फळ असल्याने थांबून चालणार नव्हते. पुन्हा कामास जोर पकडला.

थेट विक्रीतील महत्त्वाच्या बाबी

  • दोन, पाच व १० किलो असे केले पॅकिंग
  • भेटेल त्या व्यक्तीला द्राक्षांची प्रत सांगून विक्रीचा प्रयत्न
  • अंधारी या एकाच गावात एकूण चार टन विक्री
  • सिल्लोड, फुलंब्री, कन्नड तालुक्यांतील काही गावांमध्यही चांगला प्रतिसाद
  • बांधावरून विकत घेणाऱ्यांना ३० रुपये प्रति किलो दरने विक्री.

फळे-भाजीपाला थेट विक्रीचा औरंगाबाद पॅटर्न
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संकट उभे ठाकले. त्यानंतर औरंगाबाद शहरात फळे-भाजीपाल्याची थेट विक्री सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून सुरुवातीला मोजके शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांनी सहभाग नोंदविण्याची तयारी दाखविली. कृषी, सहकार, पणन, महसूल, पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील दीडशेवर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट विक्री करणाऱ्या गटांशी जोडण्याचा प्रयत्न झाला. २९ मार्च २०२० पासून उपक्रम सुरू झाला. त्यातील सहभाग आता ७७ शेतकरी, शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांपर्यंत पोचला आहे. या सर्वांनी मिळून यंदाच्या २५ एप्रिलपर्यंत सुमारे एक कोटी १३ लाख ५९ हजार किलो भाजीपाला, तर ९२ लाख १२ हजार किलो फळांची थेट विक्री केली. शिवाय ४९ हजार ३०० किलो धान्यही थेट विकले. त्यातून जवळपास ३० कोटी ७२ लाख १२ हजार ९४२ रुपये एवढी उलाढाल झाली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खिशात गेली. शेतकरी ते ग्राहक साखळी अधिक दृढ झाली.

विक्री व्यवस्थेतील ठळक बाबी

  • ग्रेडिंग, पॅकिंगला शेतकऱ्यांनी दिले महत्व
  • बीड जिल्ह्यात ६३७ शेतकरी गटांमार्फत २७,८४० क्विंटल फळे, भाजीपाला विक्री
  • जालना जिल्ह्यात दोन महिन्यांत १३६ स्टॉल्सवरून दरदिवशी ८ लाख ३१ हजार रुपयांची उलाढाल

आंबेलोहळच्या गटाचे सातत्य
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीने फळभाजी व पालेभाजी यांच्यासोबत कलिंगड, खरबूज, आंबा, काकडी आदींच्या थेट विक्रीतून वर्षभरापासून सातत्य ठेवले आहे. सुमारे आठ हजार ग्राहक थेट विक्रीतून कंपनीशी जोडले आहेत.
ग्रेडिंग, पॅकिंग व भाडेशुल्क वगळून शेतकऱ्यांना जे दर मिळतात ते बाजारातील दरांपेक्षा अधिक असतात असे कंपनीचे देविदास बनकर म्हणाले.

संपर्क- हरी देविदास ठोंबरे, ९७६५११८४४२
(गाढेजळगाव)
देविदास बनकर, ९८२३३३८१५९
आंबेलोहळ


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...