agriculture story in marathi, The farmers in Maharashtra State are doing progress through Skil Development Programme of Maharashtra Govt. & with allied Institutes. | Agrowon

कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी राहतेय सकारात्मक चळवळ

अमोल बिरारी
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

प्रथमच अनुभवले कौशल्य प्रशिक्षण
सुरगाणा (जि. नाशिक) तालुक्यातील वावरपाडा हे सर्कल अतिशय दुर्गम भागातले ठिकाण. येथे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने आयोजित कौशल्य प्रशिक्षणाचा अनुभव गावकऱ्यांना मिळाला. हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींनी सांगितले.

केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २.० आणि महाराष्ट्र शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान यांची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे दोन लाख ८२ हजार शेतकऱ्यांना गटशेती, पीक उत्पादन, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रक्रिया व मूल्यसाखळी, बाजारपेठ, शासकीय योजनांबाबत माहिती देणारी कौशल्य प्रशिक्षणे सुरू आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन यशस्वीपणे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना एकत्रित येऊन यशस्वी गटशेती करण्यासाठी व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रेरणा मिळाली. प्रशिक्षणाचा हा परिणाम बघता त्यातून हळूहळू शेतकऱ्यांची चळवळ उभी राहत असल्याचे दिसत आहे. याबाबत घेतलेला हा आढावा.

समविचाराने, एका उद्देशाने, एका ध्येयाने एकत्र येऊन केलेल्या कोणत्याही कामाला यश नक्कीच मिळते. मात्र, यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो व सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागते. दुर्दैवाने शेती क्षेत्रात या बाबीचा अभाव जाणवत असून बोटावर मोजण्याइतपत लोक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करताना दिसतात. परंतु आता शेतकरी स्वतःच आपली मानसिकता बदलून शेती एकत्रित करण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. गटशेतीसारखा चांगला पर्याय अवलंबत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाद्वारे शेतकऱ्यांना याबाबत मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याचे काम केले जात आहे. याद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांतून यशस्वी गटशेती करण्यासाठी पुढाकार घेणारे गटशेती प्रवर्तक गावोगावी तयार होत आहेत. गटांमार्फत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर लक्ष दिले जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आपली ताकद निर्माण
करणे शक्य होणार आहेच. शिवाय, व्यक्तिगत शेतकरी गटांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीची ही चळवळ हळूहळू यशाकडे मार्गक्रमण करत आहे.

प्रशिक्षणानंतर पाठपुरावा ठरला महत्त्वाचा
प्रशिक्षणे तर खूप होतात; परंतु ती घेतल्यानंतर त्याचे नेमके काय परिणाम झाले, प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा पुढे कसा फायदा केला यावर फारसा प्रकाश टाकला जात नाही. मात्र महसूल मंडळ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या तीन दिवसांच्या कौशल्य प्रशिक्षणानंतरही आठ आठवड्यांच्या अभ्यासक्रमांद्वारे पाठपुरावा केला जातो, हे या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचाच परिणाम म्हणजे प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीची खऱ्या अर्थाने शेतकरी अंमलबजावणी करू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी समविचाराने एकत्र येऊन गट स्थापन केले आहेत. शिवाय, गट यशस्वीपणे चालविण्यासाठी गटाचे कामकाज, व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेला प्राधान्य दिले असून, कंपनी स्थापनेच्या उद्देशानुसार प्रकल्प आराखडा तयार करून कामकाजही सुरू केले आहे.

गटाचे रूपांतर झाले शेतकरी कंपनीत
लातूर येथील कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत नोंदवलेल्या शेतकरी गटाच्या सदस्यांना गटशेतीबद्दल कल्पना होती; परंतु शेतकरी उत्पादक कंपनी आणि नोंदणी, वाटचालीबद्दलची अधिक माहिती शासनाच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळाली. तेथे समविचारी शेतकऱ्यांशी संवादाची संधी मिळून गटशेतीविषयी माहितीची देवाण-घेवाण झाली. प्रमाणित प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीसाठी खरी प्रेरणा मिळाली आणि अवघ्या दोनच महिन्यांत गटाचे मुरुडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर झाले. अन्य कृषी प्रशिक्षणांच्या तुलनेत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातील प्रशिक्षण वेगळे वाटल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. सध्या कंपनीचे १६६ शेतकरी सभासद आहेत.

दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज 
कंपनी स्थापन करतेवेळी सदस्यांनी कंपनीच्या वतीने शेतातील टाकाऊ घटकांपासून कांडी कोळशाचे उत्पादन करण्यासाठी वीस लाख रुपयांचा आराखडा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे सादर केला होता. त्याला मान्यता मिळून दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज कंपनीला मंजूर झाले. पंधरा जुलै, २०१९ म्हणजेच कौशल्य विकासदिनी राज्यपालांच्या हस्ते या कर्जाचा चेक कंपनीला सुपूर्त
करण्यात आला.

शासकीय खरेदी केंद्रासाठीची तयारी 
मुरुडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सध्या शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. यासाठी सर्व अटींची पूर्तता केलेला अर्जही केला आहे. एवढेच नव्हे, तर गटातील सदस्यांनी कंपनी यशस्वीपणे कशी चालवावी याबाबत कंपनी व्यवस्थापनाच्या ‘ऑनलाइन’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन त्याचा अभ्यासही सुरू केला आहे. केवळ दहा महिन्यांत कंपनीची ही वाटचाल कौशल्य विकास अभियानातून मिळालेल्या प्रेरणेने होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणामुळेच शेतीसंबंधी कार्याची दिशा मिळाली, दृष्टिकोन विशाल झाला. विशेष म्हणजे उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळाली.
- नरसिंग भारती, संचालक,
मुरुडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, मुरुड, ता.जि. लातूर
संपर्क- 
९५०३५४७१७१
 
दुष्काळी मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांची कंपनी
ऊस उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा (जि. लातूर) गावात बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांमध्ये आर्थिक उत्पन्नवाढीसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. अशा धडपडणाऱ्या महिलांना छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातील प्रशिक्षणाने शेतीवर आधारित उद्योजकतेची दिशा मिळाली. सततच्या दुष्काळामुळे एकेकाळी समृद्ध असलेले हे गाव आर्थिक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवत होती. अशा परिस्थितीत काही महिलांनी पुढे येऊन कौशल्य प्रशिक्षण घेतले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली. शोभा गव्हाणे आणि त्यांच्या गटातील महिलांची आता आत्मविश्‍वासाने वाटचाल सुरू आहे.

प्रशिक्षणातून मिळाली उद्योजकतेची प्रेरणा
अन्य प्रशिक्षणांसारखेच कृषी विषयातील प्रशिक्षण म्हणून सुरुवातीला या महिलांनी नोंदणी केली. मात्र, तीन दिवसांत त्यांना बचत गट आणि गटशेती यांतील मूलभूत फरक लक्षात आला. आपले उत्पन्न वाढवावयाचे असेल तर शेतकरी उत्पादक कंपनी हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांना समजले. जोड कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गटाला पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लबच्या छाया पाटील यांच्यासोबत संवादाची संधी उपलब्ध झाली. त्यांच्या भाजी व्यवसायाच्या उलाढालीची यशोगाथा ऐकून शोभा गव्हाणे आणि त्यांच्या गटातील महिला सदस्यांना आपणही एकत्रित येऊन उद्योग उभारला पाहिजे असे वाटू लागले.  

कर्ज झाले मंजूर
गटातील महिलांनी दोन आठवडे एकमेकांशी संवाद साधला. मग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीचे काम सुरू केले. यासाठी गटातील अनेक महिलांनी अनुभव असलेला कुक्कुटपालनाचा व्यवसाय निवडला. त्याचा व्यवसाय आराखडा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे सादर केला. कौशल्यदिनी या महिला शेतकरी उत्पादक कंपनीला दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर झाले.

प्रतिक्रिया
अंधश्रद्धा आणि परंपरेने जोखडलेल्या दुष्काळी खेडेगावात केवळ महिला सदस्य असलेल्या शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी सुरू होते आणि उद्योग उभारण्यासाठी त्या सर्वजणी एकदिलाने पुढाकार घेतात हे खरे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाचे यश म्हणता येईल.
- शोभा गव्हाणे, संचालिका,
साक्षीळादेवी शेतकरी उत्पादक कंपनी, शिराळा, ता.जि. लातूर
संपर्क : ७७७५९६०२५९

सेंद्रिय शेतमाल उत्पादक कंपनीचा ध्यास
गटशेती ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन कोलगाव (जि. बीड) येथील प्रगतिशील शेतकरी सुधाकर फाटे यांनी शासनाच्या कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत दोन सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान ते अन्य समविचारी शेतकऱ्यांना भेटले. कंपनी स्थापनेबाबत सर्व गोष्टी संमत झाल्यावर दहा सभासदांनी मिळून प्रत्येकी अडीच हजार रुपये रक्कम जमविली. कंपनी नोंदणीसाठी बावीस हजार रुपये खर्च करून नवचेतना ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. कंपनीच्या माध्यमातून तुरीचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन प्रक्रियेद्वारे डाळनिर्मिती करण्याचा या कंपनीचा मानस आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेला कंपनीची बैठक होते. त्यात कंपनीला आपले योगदान कसे देता येईल, कंपनीची वाटचाल यावर चर्चा घडते.

कंपनीचा होतोय विस्तार
दहा सभासदांद्वारे प्रत्येकी ५० नवे सदस्य तयार करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येकी २१ हजार रुपये भागभांडवल काढून एकूण दोन लाख दहा हजार कंपनीच्या नावे जमा केले आहेत. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात ५०० शेतकरी सभासद करण्याचे उद्दिष्ट आहे. याचबरोबर विषमुक्त भाजीपाला उत्पादन करण्याचेही कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी रेसिड्यू फ्री शेतमालाबाबत जनजागृती करणे सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्याकडील एकूण क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर तशा प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

सेंद्रिय तूरडाळ
सध्या दहा सभासदांनी वीस एकर क्षेत्रावर तुरीची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली असून, आता तूर फुलोऱ्यात आहे. काढणीनंतर सर्व शेतकऱ्यांची तूर एकत्रित करून त्यावर डाळ मिलद्वारे प्रक्रिया करण्यात येईल. जिथे चांगले मार्केट आहे, तिकडे माल पाठविण्याचे नियोजन आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. याद्वारे विषमुक्त शेतीकडे जाण्याचा मानस आहे. अंदाजे दोनशे ते सव्वादोनशे क्विंटल तूर उत्पादन अपेक्षित असून डाळ मिलसाठी ‘नाबार्ड’ कडे प्रस्ताव देणार असल्याचे कंपनीच्या संचालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया
शेती तोट्यात होती. प्रशिक्षणातून समूहाने शेती फायद्याची ठरते हे समजले. त्यातून मिळालेल्या प्रेरणेने एकविचार झाला. शेतकरी कंपनीद्वारे सर्वांची प्रगती होऊ शकते याचा आत्मविश्वास मिळाला. शेतकऱ्यांना जवळच मार्केट उपलब्ध व्हावे म्हणून कंपनीतर्फे वेअरहाउसचा प्रस्ताव देण्यात येणार आहे.
- सुधाकर फाटे, संचालक, अध्यक्ष,
नवचेतना ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी, कोलगाव, ता. गेवराई, जि. बीड
संपर्क : ९८८१७६७१११

 
प्रथमच अनुभवले कौशल्य प्रशिक्षण
सुरगाणा (जि. नाशिक) तालुक्यातील वावरपाडा हे सर्कल अतिशय दुर्गम भागातले ठिकाण. येथे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने आयोजित कौशल्य प्रशिक्षणाचा अनुभव गावकऱ्यांना मिळाला. हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींनी सांगितले. प्रशिक्षणातून गटशेतीची माहिती प्रेरणा देणारी ठरली. त्यातून आम्ही गट स्थापन करणार असून, स्वतः शेतमाल विक्रीचे नियोजन करायचे ठरविले आहे.
- देविदास पवार, मंडळ समन्वयक, ९६०४५४२७५४,  ७६६५७३७९१
 
ऊस रोपे नर्सरीची प्रेरणा
प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन गट स्थापन करण्याच्या विचारांना चालना मिळाली. सध्या गटात २० शेतकरी आहेत. त्यांतील अनेक जण ऊस उत्पादक आहेत. दरवर्षी ऊस लागवडीसाठी उत्तम गुणवत्तेचे बेणे मिळविण्यासाठी आव्हाने येतात. यावर उपाय म्हणून गटातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी रोपे तयार करण्याचे काम सुरू करण्याचे ठरविले आहे. प्रशिक्षणामुळे एकत्र येण्याचे फायदे, पाण्याचा योग्य वापर कसा करावा, खतांचे काटेकोर नियोजन करण्याविषयी माहिती मिळाली. हे प्रशिक्षण मोफत मिळाल्याने प्रत्येकाची मानसिकता वेगळी होती; परंतु कौशल्य प्रशिक्षणाचा आम्हाला खरोखर फायदा होणार असून, याचा अपेक्षित परिणाम पुढील वर्षी नक्की दिसेल.
- दिलीप गवारे, सर्कल- विठ्ठलवाडी,
जि. पुणे, ९९२१६४२५२५

 
डाळ मिल उद्योगाकडे वाटचाल

वर्धा जिल्ह्यातील सावलीवाघ या मंडळ ठिकाणी झालेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात काजळसरा, तहसील हिंगणघाट येथील भालचंद्र धूप हे शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. ते म्हणाले, की सुरुवातीला आमचा २० लोकांचा गट होता. गटातील सगळे प्रशिक्षणात सहभागी झालो. यात आम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती होऊन प्रेरणा मिळाली. गटामधील दहा शेतकरी समविचाराने एकत्र येऊन पोथरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. कंपनीची नोंदणी केली. या भागात तूर उत्पादन अधिक होते, त्यामुळे डाळ मिल उद्योग सुरू करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने १० हजार भागभांडवल कंपनीत गुंतविले आहे. तूरडाळ मार्केटिंगसंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींकडून मार्केटिंगचे मार्गदर्शनही घेतले. शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बिनव्याजी कर्ज उपलब्धतेसाठी अर्ज केला आहे. कर्ज उपलब्ध झाल्यावर बांधकाम, डाळ मिल खरेदी करण्याचे नियोजन आहे. सुरुवातील कंपनीतील दहा जणांच्या शेतातील तुरीवर प्रक्रिया करणार आहोत, त्यानंतर अन्य शेतकऱ्यांनाही सहभागी करणार आहोत.
संपर्क ः भालचंद्र धूप, वर्धा, ९८२३९८०९१३

प्रकल्पाचा ‘फेज’नुसार आढावा....
   फेज             ए          बी          सी                        
फेज १---      ६२९६६--- ४७९७०--- ४२२१३
फेज २.१--   -६८५००--- ५९५९३---    ५३८४६
फेज २.२       ९११४७----३०२७५----२४४८०
एकूण        २२२,६१३-----१३७,८३८------१२०,५३९
ए- प्रशिक्षणार्थी
बी--परिक्षा दिलेले शेतकरी
सी-  प्रमाणपत्रधारक शेतकरी  
 
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...