agriculture story in marathi, farmers of Ratnagiri dist. are doing value addition in jack fruit & getting profit. | Agrowon

तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे होतेय मूल्यवर्धन

राजेश कळंबटे
शनिवार, 10 एप्रिल 2021

फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक आहे. तळलेले गरे, फ्रोझन भाजी अशा मूल्यवर्धनातून, तसेच विविध जातींच्या संगोपनातून फणसाचे व्यावसायिक महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार करू लागले आहेत.

फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक आहे. तळलेले गरे, फ्रोझन भाजी अशा मूल्यवर्धनातून, तसेच विविध जातींच्या संगोपनातून फणसाचे व्यावसायिक महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार करू लागले आहेत.

कोकणावासीयांचे आंबा, काजू, नारळ याप्रमाणे फणसदेखील महत्त्वाचे पीक आहे. कोकणात फणसाला मोठी मागणी वटपौर्णिमेला असते. त्यानंतर मात्र बाजारापर्यंत नेण्याचा खर्च लक्षात घेता विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी असते. त्यामुळे शेतकरी झाडावरील फणस बऱ्याचदा काढत नाहीत. झाडावरच पिकून ते खराब होतात. मात्र अलीकडील वर्षांत कापा, बरका आदी फणसांपासून व्यावसायिक उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोवळ्या फणसाची भाजी अनेकांना प्रिय असते. हा फणस ५० रुपयांपासून ते अगदी २०० रुपयांपर्यंत विक्रीला जातो. जानेवारीपासून फणस झाडावर लागण्यास सुरुवात होते. जून अखेरपर्यंत उत्पादन मिळते.

मूल्यवर्धन
रत्नागिरी जिल्ह्यात वैयक्तिक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून तळलेल्या फणस गऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यास मुंबईसह विविध ठिकाणी मोठी मागणी आहे. फणस एकत्रित केल्यावर फोडून आतील पाव (गऱ्यांना घट्ट पकडून ठेवणारा मधला पांढरा भाग) विळीने काढली जाते. त्यानंतर गरे काढले जातात. गऱ्यावरची पाती वाळवून म्हशींना खुराक म्हणून उपयोग केला जातो. एक किलो गरे कापण्यासाठी सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागतो. शेंगदाणा तेलाचा वापर केल्यास दोन महिन्यांनंतर खराब होण्याची शक्यता असते. खोबरेल तेलात तळलेले गरे वर्षभर चांगले राहतात. मिठाचे पाणी वापरल्याने त्यांना कुरकुरीतपणा येतो.

अर्थकारण
झाडे करारानेही घेण्यात येतात. एका फणसाची किंमत २५ ते ३० रुपये असते. एका फणसात दोन किलो गरे होतात. ते ४०० ते ५०० रुपये प्रति किलो दराने विकले जातात. रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील श्री नवलाई देवी महिला बचत गट दरवर्षी १२०० ते १५०० किलो गऱ्यांची विक्री करतो. त्यातून ७० ते ७५ टक्के नफा मिळतो. मुंबईच्या मॉलमध्येही गरे विकले जातात. आकर्षक पॅकिंग व ब्रॅण्डिंग महत्त्वाचे झाले आहे. स्थानिक बाजारातही मागणी आहे असे गटाच्या अध्यक्ष श्‍वेता शिंदे यांनी सांगितले.

फणसाची भाजी फ्रोझन रूपात
फणसाची भाजी कोकणातच नव्हे तर मुंबई, पुण्यातही आवडीने खाल्ली जाते. पौष पौर्णिमेच्या आसपास फणसाच्या झाडावर कुयऱ्या दिसू लागतात. त्यानंतर १५ दिवसांनी कोवळा फणस दिसू लागल्यावर साकट भाजी केली जाते. त्यासाठी मधल्या पावेचा भाग मोठा आणि गुळचट चवीचा फणस साकट निवडला जातो. अनावश्‍यक भाग वेगळा केल्यानंतर गरे व आठीळांचा भाग मध्यम चिरून, मिठाच्या कोमट पाण्यात भाजी शिजवण्यात येते. पाणी निथळून सुती फडक्यावर वाळवण्यात येते. पाव किलोमध्ये पॅकिंग करून डीफ्रीजरला ठेवली जाते. पूर्णगड येथील प्रक्रिया उद्योजक अनिरुद्ध ताम्हणकर दरवर्षी अशी तीनशे ते चारशे पॅकेट्स पुणे येथे पाठवून विक्री साधतात. प्रति पॅकेट्स ६० रुपये दर आहे. एक पॅकेट तीन ते चार जणांना पुरते. एका कोवळ्या फणसापासून दोन पॅकेट तयार होतात. ‘रेडी टू कूक’ भाजी असल्याने चवीनुसार तिखट, हळद फोडणी, काजूगर, शेंगदाणे आदींचा वापर करून फोडणीसह परतून भाजी करता येते. त्यास मागणी वाढत आहे.

सुमारे ७६ जातींची लागवड
झापडे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील हरिश्‍चंद्र देसाई आणि अभियंता मुलगा मिथिलेश देसाई यांनी देश व परदेशातून आणून फणसाच्या सुमारे ७६ जातींची लागवड केली आहे. दोन ते पाच वर्षे वयाची ही कलमी झाडे असून, ती चार चे पाच वर्षांत उत्पादन देण्यास सुरुवात करतात. एवढी विविधता असलेली त्यांची देशातील एकमेव बाग असावी. एकूण सुमारे १२०० झाडे आहेत. मिथिलेश सांगतात, की फणसाला सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, युरोप, अमेरिका, आखाती देशांत मागणी आहे. जगभर फणसाच्या १२८ जाती आहेत. आता १०० जातींपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भगव्या, लाल, सफेद, गुलाबी रंगांचे गरे किंवा वर्षातून दोन वेळा येणारे फणस अशा जातींचे संगोपन करतो आहे. फणस हे बहुवर्षायू, अत्यंत कमी देखभालीत येणारे व मोठ्या आकाराचे फळ देणारे पीक आहे. त्यापासून असंख्य पदार्थ तयार करता येतात. आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. प्रति झाडाला वयानुसार २० पासून ते ५० पर्यंत फळे येतात.

प्रतिक्रिया
सध्या ‘रेडी टू कूक’चा जमाना आहे. शहरातील महिलावर्गाला नोकरीमुळे जेवण तयार करण्यास वेळ कमी पडतो. फणसाची भाजी बनवणेही गुंतागुंतीचे आहे. फ्रोझन स्वरूपातील साकट भाजी त्यास उत्तम पर्याय आहे.
-अनिरुद्ध ताम्हणकर, पूर्णगड
संपर्क ः ९६२३८१३६८१

तळलेल्या गऱ्यांचा पाच वर्षांपासून व्यवसाय करीत आहोत. बाजारात त्यास मागणी आहे. सध्या त्यात स्पर्धा वाढली आहे.
-श्‍वेता शिंदे, बचत गट अध्यक्षा
८००७०८८०९७

संपर्क- मिथिलेश देसाई
फणस बागायतदार
८२७५४५५१७६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...