agriculture story in marathi, farmers of Ratnagiri Dist. united for water scheme & fetched water for irrigation. | Agrowon

सामूहिक पाणी योजनेतून फुलली परसबाग

राजेश कळंबटे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

उशाला धरण असताना कळझोंडीतील (ता. जि. रत्नागिरी) शेतकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागे. त्यांनी परसबाग संकल्पनेतून सामूहिकपणे योजना राबवून नळाचे पाणी बांधापर्यंत आणले.
पिण्याच्या पाण्याबरोबर परसबागेत भाजीपाला पिकविणे शक्य झाले. त्यातून स्वयंपूर्ण मिळवलीच. शिवाय विक्रीतून उत्पन्नवाढही केली.
 

उशाला धरण असताना कळझोंडीतील (ता. जि. रत्नागिरी) शेतकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागे. त्यांनी परसबाग संकल्पनेतून सामूहिकपणे योजना राबवून नळाचे पाणी बांधापर्यंत आणले. पिण्याच्या पाण्याबरोबर परसबागेत भाजीपाला पिकविणे शक्य झाले. त्यातून स्वयंपूर्ण मिळवलीच. शिवाय विक्रीतून उत्पन्नवाढही केली.
 
रत्नागिरी जिल्ह्यात कळझोंडी गणेशवाडी हे डोंगरावर वसलेले गाव आहे. पायथ्याशी धरण असले तरीही त्याचे पाणी माथ्यावर वसलेल्या गावाला पोचत नव्हते. सुमारे २०० ते २५० लोकवस्तीची ही वाडी पाण्यापासून वंचित राहायची. गावातील अडचणी सोडविण्यासाठी येथील माजी पोलिस पाटील वासुदेव निंबरे यांच्या त्यांच्या प्रयत्नांतून २००३ मध्ये श्री चंडीकादेवी बचत गटाची (अ गट) स्थापना झाली. आज परिसरातील बचत गटांचे ते संघटक आहेत. माजी शिक्षण व अर्थ सभापती शरद बोरकर त्यांच्या मदतीला धावले.

परसबाग सिंचन योजना
पाणी योजनेसाठी कोणती बँक कर्ज देणार नाही हे लक्षात घेऊन या परसबाग सिंचन योजना राबविण्याचे ठरवले. त्यासाठी आणखी तीन बचत गटांची स्थापना केली. यात श्री चंडिकादेवी गट ब, भगवान स्वयंसाह्य व गजानन स्वयंसाह्य गट यांचा समावेश राहिला. संपूर्ण वाडी यामध्ये एकवटली. खंडाळा येथील बँकेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. विहिरीजवळ पाच एचपी क्षमतेचा पंप बसविण्यात आला. उंच भागात ४५ हजार लिटर साठवणक्षमता असलेली टाकी उभारण्यात आली. परिसरात चार किलोमीटर क्षेत्रात पाइपलाइन फिरवण्यात आली. प्रत्येकाच्या घराजवळ पाणी पोचवण्यात आले.

पाण्याचे नियोजन
गावात सुमारे ४५ घरांना पुरेल व प्रत्येकाला एक हजार लिटर पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाळी हंगामात पुरेल या पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जाते. एप्रिलपर्यंत व्यवस्थित पाणी मिळते. मे महिन्यात एक दिवसाआड पाणी पुरवले जाते. पाणी पट्टीपोटी १०० रुपये शुल्क महिन्याला घेतले जाते. पाणी सोडण्यासाठी प्रत्येक घराला जबाबदारी दिली आहे. हे काम वाडीतील पुरुष मंडळी करतात. निराधार महिलांकडून मात्र कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

भाजीपाला लागवड
घराजवळ पाणी आल्याने कुणी भाजीपाला तर कुणी नारळ, पोफळीसह केळीची झाडे लावली. त्यामधून प्रत्येकाला महिन्याला ठरावीक उत्पन्न मिळणे शक्य झाले. मुळा, पडवळ, वांगी, टोमॅटो, मेथी आदी पिकांची थोड्या थोड्या गुंठ्यात लागवड झाली. उत्पादित शेतीमाल गावातच विकला जाते. मुख्य मार्गापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावरच वाडी आहे. गावातच भाजी मिळत असल्याने ग्रामस्थ घरी येऊन भाजी घेऊन जातात.

‘डायबेटिक फूड’ची संकल्पना
लोणची, पापड यांसारख्या पदार्थांची विक्री करण्यासाठी बचत गट नेहमीच सरसावतात. परंतु चंडिकादेवी बचत गटाने मधुमेहाबाबत जागरूक असलेल्या व्यक्तींची गरज ओळखली. गणपतीपुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अनेकांकडून ‘डायबेटिक फूड’ची मागणी होत असते. त्यांच्यासाठी या बचत गटाने नाचणीच्या भाकऱ्या, तुळशीची भजी, मेथीची भाजी आणि मेथीचा लाडू असा मेन्यू सादर केला. गणपतीपुळे येथे दरवर्षी सरस प्रदर्शन भरते.
त्या माध्यमातून गटातील महिलांना ५० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. गटातर्फे एक एकर जमिनीत नाचणीची लागवड केली जाते.
त्यामुळे नाचणी उपलब्ध होते. दरवर्षी गावातील जत्रेच्या ठिकाणी देखील उत्पन्नाचा मार्ग खुला झाला आहे. चार गटांनी एकत्र येऊन कलिंगडसह मिरची, घेवडा यांचीही लागवड केली. बाजारातून शेतमाल आणण्यापेक्षा घरीच माल उपलब्ध होऊ लागला. शिवाय विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागले.

पाखाडी बांधकाम, गाळ उपसाची कामे
पाणी योजनेसाठी घेतलेले कर्ज फेडावे यासाठी गावातील सहा पाखाड्यांची कामे बचत गटाने हाती घेतली. एका पाखाडीसाठी ५० ते ६० हजार रुपये मिळायचे. यामध्ये पुरुष मंडळींचा सहभाग होता. कळझोंडी धरणात गाळ काढण्याचे कामही रोजगार हमी योजनेतून हाती घेण्यात आले. गणेशवाडीतील चारही गटांनी यात पुढाकार घेतला. त्यातून महिलांना रोजगारही मिळाला. गावात दरवर्षी स्वच्छता अभियानही राबविले जात आहे.

नवी पाणी टाकी
पाण्यासाठी बांधलेल्या जुन्या टाकीचे कर्ज फेडले. वाडीतील लोकांना अधिकचे पाणी मिळावे यासाठी नवीन टाकी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वाटद-खंडाळा शाखेकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना मिळून सुमारे दोन एकरांत भाजीपाला लागवडही करणे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया 
गावाजवळ धरण असूनही वाडीत पाणी नव्हते. विहिरीवरून हंडा वाहून ग्रामस्थांना पाणी आणावे लागे. नळपाणी योजनेमुळे हे कष्ट संपले आहेत. रोजगारासाठी पुरुष मंडळी मोलमजुरीवर भर देत होते. बचत गट चळवळ उभारून आता भाजीपाला शेती व महिलांनाही रोजगार संधीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

-वासुदेव निंबरे, ९६८९८८५०२१
गणेशवाडी, कळझोंडी

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...