नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची बिनकाटेरी हिरवी वांगी

सावळीच्या वांग्यांना मागणी सावळी येथील महावीर सोनटक्के म्हणाले की नागपूरच्या बाजारपेठेत आमच्या वांग्यांना मोठी मागणी असते. घरगुती ग्राहकांबरोबरच तेथील होटेल्समधूनही भाजीसाठी आमच्या वांग्यांनाच अधिक पसंती असते. हे वांगे हिरवे, बिनकाटेरी आहे. ते मध्यम आकाराचे लांबोळके आहे. त्याची भाजी तर केली जातेच. शिवाय भरीतासाठीही देखील त्याचा वापर होतो. नागपूरची बाजारपेठ मोठी आहे. तेथूनही अन्य राज्यात वा भागांत आमची वांगी पाठवली जातात.
 बाजारात पाठविण्यापूर्वी वांग्यांची अशी प्रतवारी होते.
बाजारात पाठविण्यापूर्वी वांग्यांची अशी प्रतवारी होते.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध प्रयोगांत मग्न असतात. याच तालुक्यातील धाड, सावळी, चांडोळ गाव परिसरातील हिरव्या बिनकाटेरी हिरव्या वांग्याने नागपूर बाजारपेठेत आपली तगडी ओळख तयार केली आहे. सावळी, चांडोळ मिळून सुमारे १०० एकर या पिकाखाली असावे. खरिपात कमी कालावधीत अर्थकारणाला चालना देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी त्यास जवळ केले आहे.   बुलडाणा जिल्ह्यातील धाड, सावळी, चांडोळ आदी गावे वांगी पिकासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. चांगली मागणी असल्यानेच पाच-सात वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी य पिकात सातत्य ठेवले आहे. मे महिना सुरू झाला की या भागातील शेतकऱ्यांची लागवडीची तयारी सुरू होते. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी मेच्या अखेरच्या टप्प्यात तर अन्य शेतकरी जूनमध्ये पहिला पाऊस पडताच लागवडीची तयारी सुरू करतात. सावळी, चांडोळ या दोन गावांत मिळून वांग्याचे १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असावे असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. वांगे लागवडीचे नियोजन अनेक शेतकरी वांग्याची रोपे तयार करण्यावर भर देतात. प्रथम चांगली जमीन तयार करून घेतात. त्यात चांगले कुजलेले शेणखत मिसळले जाते. गादीवाफे तयार करून बियाणे टाकले जाते. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पॉली मल्चिंगचा वापरही करण्यात येतो. त्यामुळे तणांवरही नियंत्रण राहते. रासायनिक खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खतांचा एकात्मीक पध्दतीने वापर केल्याने वांग्यांची गुणवत्ता टिकून राहते. उत्पादनात सातत्य राहते असे शेतकरी सांगतात. वांग्यात फळ पोखरणाऱ्या अळीची मुख्य समस्या असते. मात्र फवारण्यांबरोबरच गंध सापळे लावण्यावरही शेतकऱ्यांचा भर असतो. कृषी विभागाचे अधिकारी त्यासाठी मार्गदर्शन करतात. यंदा लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झाली. मागील वर्षी प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाल्याने काही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणून पीक फुलवले होते. यंदा दरांचा मिळाला फायदा यावर्षी राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा महापूराची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भाजीपाल्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला होता. अशा काळात नागपूरच्या बाजारपेठेत सावळी भागातील हिरव्या वांग्यांना संधी मिळाली. दरवर्षी किलोला २० ते २२ रुपयांच्या दरम्यान असलेले दर यंदा ४० ते ४५ रुपयांपर्यंत मिळाले. साहजिकच वांगे उत्पादकांसाठी ही मोठी समाधानाची बाब होती. श्रावण महिन्यात वांग्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. याकाळात किलोला साधारणपणे १० ते १५ रुपये दर मिळत असतो. मात्र यंदा सलग तीन महिने बाजारात दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले. रोजगार निर्मिती वांगे उत्पादकांचा हा भाग प्रामुख्याने सोयाबीन व मका पिकासाठी ओळखला जातो. या पिकांची काढणी येईपर्यंत तितकासा रोजगार उपलब्ध असत नाही. परंतु सावळी परिसरात वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत वांगे तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. त्यातून शेकडोंसाठी रोजगार उत्पन्न होत असतो. नागपूर बाजारपेठेत वांग्यांची भुरळ या भागात पिकवले जाणारे वांगे नागपूरच्या बाजारपेठेत जाते. सावळी येथील महावीर सोनटक्के म्हणाले की नागपूरच्या बाजारपेठेत आमच्या वांग्यांना मोठी मागणी असते. घरगुती ग्राहकांबरोबरच तेथील होटेल्समधूनही भाजीसाठी आमच्या वांग्यांनाच अधिक पसंती असते. हे वांगे हिरवे, बिनकाटेरी आहे. ते मध्यम आकाराचे लांबोळके आहे. त्याची भाजी तर केली जातेच. शिवाय भरीतासाठीही देखील त्याचा वापर होतो. नागपूरची बाजारपेठ मोठी आहे. तेथूनही अन्य राज्यात वा भागांत आमची वांगी पाठवली जातात. त्यामुळे सावळी परिसरातील शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक हे पीक टिकवून ठेवले. हंगामात दररोज एक ते दोन ट्रक भरून आमच्या गावाहून ही वांगी नागपूरला रवाना होतात. ट्रकचालक जागेवरून वांग्यांचे पोते भरून नेतो. माल विक्रीनंतर तोच पैसे घेऊन येतो. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आता बाजारपेठेत जाण्याची गरज राहिलेली नाही. सावळी भागातील वांग्याविषयी

  • लागवड मे-जून महिन्यात
  • बहुतांश शेतकरी बी लावून गादीवाफ्यावर रोपनिर्मिती करतात.
  • पावसाळ्यात पिकावर किडी-रोग अधिक येत असल्याने नियमित निरीक्षण
  • सोयाबीन पट्ट्यातील शेकडो मजुरांना मिळाला रोजगार
  • प्रतिक्रिया मी पाच ते सहा वर्षांपासून खरिपात वांगे घेतो. दरवर्षी एक एकरापर्यंत क्षेत्र असतो. यंदा ते दोन एकर आहे. यंदा पावसामुळे अन्य भागातून आवक न झाल्याने आमच्या वांग्याला किलोला ४० रुपये दर मिळाला. साधारण दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. दरवर्षी देखील किलोला १५ रुपये दर राहिला तरी वांगे नफ्यात राहते. बिनकाटेरी वाण असल्याने मजुरीची समस्यादेखील आम्हाला भेडसावत नाही. दर चार दिवसांनी तोडा होतो. आठ दिवसांमागे सुमारे ३० ते ५० क्विंटलपर्यंत माल नागपूरला पाठवतो. - महावीर सोनटक्के, शेतकरी, सावळी, मो. ९०११६२४१४७ बाजारातील मागणीप्रमाणे वांग्यांची आकारमानानुसार प्रतवारी करतो. वीस किलोच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून माल बाजारात पाठवितो. यामुळे माझ्या मालाला अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत पाच टक्के अधिक दर मिळतो. मालाची त्वरित उचल होते. - वासुदेव वाघ, सावळी, ता. जि. बुलडाणा शेतातून वांगे तोडल्यानंतर व्यवस्थित प्रतवारी होते. लहान आणि मध्यम आकाराची वांगी वेगवेगळ्या बॅगमध्ये भरूनच पाठवतो. त्यामुळे त्यास चांगला दर मिळण्यास मदत होते. -विशाल वाघ, सावळी संपर्क - महावीर सोनटक्के - ९०११६२४१४७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com