agriculture story in marathi, farmers of Vashim Dist. has set up farm lab & started to produce bio inputs. | Agrowon

वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची प्रयोगशाळा

गोपाल हागे
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021

वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी गटाने बांधावर प्रयोगशाळा उभारली आहे. ट्रायकोडर्मा, विविध जैविक स्लरी, गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन त्यांचे उत्पादन त्या माध्यमातून सुरू केले आहे. 

वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी गटाने बांधावर प्रयोगशाळा उभारली आहे. ट्रायकोडर्मा, विविध जैविक स्लरी, गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन त्यांचे उत्पादन त्या माध्यमातून सुरू केले आहे. गटातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, हरभरा, गहू व फळपिकांत त्याचा वापर करून उत्पादन व गुणवत्तेत वाढ करण्यास सुरवात केली आहे.
 
वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील एरंडा गावची सोयाबीन, मूग, उडीद ही मुख्य पिके आहेत. काही शेतकरी हंगामी भाजीपाला पिकवतात. फळबागाही उभ्या राहात आहेत.याच गावातील १६ शेतकऱ्यांनी एकत्र येत २०१४ मध्ये जयकिसान शेतकरी गटाची स्थापना केली.

दीपक भीमराव घुगे हे गटाचे अध्यक्ष झाले. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, मातीची सुपीकता जपण्यासाठी त्यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून जैविक, सेंद्रिय शेतीवर भर दिला. सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ व मूळ मालेगाव येथील डॉ. संतोष चव्हाण यांचे मार्गदर्शन त्यांना लाभू लागले.

उत्पादनात वाढ
जेव्हापासून गटाने सेंद्रिय पद्धतीवर भर देऊन शेती सुरू केली तेव्हापासून सर्व नोंदी ठेवल्या असल्याचे अध्यक्ष घुगे यांनी सांगितले. त्यानुसार पूर्वी सोयाबीन पिकात एकरी ९०० ग्रॅमपर्यंत कीडनाशकांचा वापर व्हायचा. आता तो १३८ ग्रॅमपर्यंत खाली आणल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ७० ते ८० टक्के जैविक- सेंद्रिय तर २० ते ३० टक्केच रसायनांचा वापर होतो. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे मातीची पोत, सुपीकता यात वाढ झाली आहे. सन २०१३ च्या दरम्यान रासायनिक पद्धतीत
सोयाबीनचे एकरी ५ क्विंटल, तुरीचे दोन क्विंटल, हरभरा चार तर गव्हाचे आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. आता सोयाबीनचे एकरी १० क्विंटल, हरभऱ्याचे ५ ते १० क्विंटल, तुरीचे ५ ते ६ क्विंटल, गव्हाचे १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे.

प्रयोगशाळेची उभारणी
डॉ. चव्हाण यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी फार्मलॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना गटासमोर मांडली. गटाने ती त्वरित स्वीकारली. त्यानुसार प्रशिक्षण घेत भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत कामास सुरवातही झाली. रोटरी शेकर, ॲटोक्लेव्ह, मिक्सर, ग्लास, पेट्रीडिश आदी विविध साहित्य घेतले आहे. प्रयोगशाळेत कडधान्य स्लरी, डिकंपोस्ट कल्चर, ट्रायकोडर्मा, सेंद्रिय व गांडूळखत आदींची निर्मिती केली जाते. सर्व शेतकऱ्यांनी मिळून पैसा उभारीत प्रयोगशाळेसाठी दीड लाख रुपये गुंतवले आहेत. केवळ गटातील नव्हे तर अन्य ५०० ते ८०० शेतकरी देखील गटाला जोडले जात आहेत. हे सर्व शेतकरी हंगामी पिकांसह हळद, डाळिंब, संत्रा, लिंबू आदी पिकांत या जैविक निविष्ठांचा वापर करतात. गटातील काहींनी पुण्यातही प्रशिक्षण घेतले आहे.

युरियाचा वापर थांबवला
गटातील विजय घुगे २७ एकर शेती कसतात. ते म्हणाले की मागील सहा वर्षांपासून कोणत्याच पिकाला युरिया देत नाही. आम्ही प्रयोगशाळेत तयार करीत असलेल्या घटकांद्वारे नत्राची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी कीडनाशक फवारणीचा एकरी खर्च १२०० ते १५०० रुपये यायचा. जैविक निविष्ठांच्या वापरातून तो १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

मान्यवरांच्या भेटी
परम महासंगणकाचे निर्माते व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी गटाच्या प्रयोगशाळेला भेट देत त्यांना प्रोत्साहित केले आहे. वाशीमचे तत्कालीन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी संवाद साधला. तर सध्याचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी भेटी दिल्या आहेत

बांधावरील प्रयोगशाळा उभारण्याचा उद्देश

  • आपल्या पिकांसाठी लागणाऱ्या जैविक, सेंद्रिय निविष्ठा स्वतःच्या शेतात स्वतः बनविण्यास शिकणे.
  • त्यांचा शेतात त्वरित वापर करणे शक्य होतो. त्यामुळे परिणामही चांगले मिळतात
  • उत्पादन खर्चात मोठी बचत करणे. मातीची सुपीकता वाढवणे.

याविषयी डॉ. संतोष चव्हाण म्हणाले की अशा प्रकारे प्रयोगशाळा उभारून शेतकरी निविष्ठा निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ शकतात. विक्रीचा कोणता उद्देश यात ठेवण्यात आलेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे, अशांना या प्रशिक्षणचा विशेष फायदा होऊन तेच पुढे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात. पुढील काळात सूक्ष्मजीवावर आधारित अन्य कीडनाशके निर्मिती शेतकरी स्वतः करू शकतील असा प्रयत्न आहे.

प्रयोगशाळेत तयार केलेले घटक

  • ट्रायकोडर्मा-४०० लिटर
  • बायोगॅस स्लरी- १५ हजार लिटर
  • कडधान्य स्लरी- १०हजार लिटर
  • ग्रॅन्युल्स खते- २ क्विंटल
  • गांडूळखत-१० क्विंटल

संपर्क- दीपक घुगे- ७७९८८४९८२१
अध्यक्ष, ‘जयकिसान’ गट
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...