agriculture story in marathi, The farmers of village Takli of Yavatmail Dist. has raised their income through sericulture. | Agrowon

रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे बंध

विनोद इंगोले
शुक्रवार, 5 जून 2020

यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी वाट शेतकरी चोखाळत आहेत. अशाच परिवर्तनवादी गावांमध्ये टाकळी या जेमतेम लोकवस्तीच्या गावाचाही समावेश होतो. 

यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी वाट शेतकरी चोखाळत आहेत. अशाच परिवर्तनवादी गावांमध्ये टाकळी या जेमतेम लोकवस्तीच्या गावाचाही समावेश होतो. कृषी मेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर तेथे रेशीम शेतीविषयी माहिती मिळाली. उत्पन्नक्षम शेतीचा हा राजमार्ग असल्याचे लक्षात आलेल्या शेतकऱ्यांनी आज 50 हेक्‍टरपर्यंत तूती लागवडीचा विस्तार केला आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यात टाकळी राजापूर गटग्रामपंचायत अंतर्गंत राजापूर (वाडी), जुनी व नवीन टाकळी अशा तीन गावांचा समावेश होतो. तीनही गावांची मिळून जेमतेम तीन हजार लोकसंख्या आहे. ऊस, हळद, सोयाबीन, हरभरा, कापूस यासारखी पिके येथील शेतकरी घेतात. पूर्वी कापसाखालील क्षेत्र अधिक होते. आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच शेतकरी मिळून सात ते दहा एकरांवर कापूस लागवड करीत असावेत.

सिंचनातून समृध्दी
इसापूर प्रकल्पाचा डावा कालवा गावाच्या उत्तरेकडून गेला आहे. सोबतच दक्षीणेकडून पैनगंगा नदी आहे. या दोन्ही सिंचन पर्यायांसोबत बोअरवेल, विहिरीचा पर्यायही शेतकऱ्यांकडे आहे. त्याच माध्यमातून गावशिवारात व्यवसायीक आणि नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

कृषी मेळाव्यातून परिवर्तन
टाकळीपासून काही अंतरावरील भाऊसाहेब माने कृषी महाविद्यालयात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. टाकळीतील बहूतांश शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी रेशीम तंत्र अधिकारी मुकुंद नरवाडे यांनी या पूरक व्यवसायाचे महत्व, फायदे व अर्थकारण समजावून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. इथेच गावातील रेशीम व्यवसायाची बिजे रोवली गेली. सुरूवातीला दहा शेतकरी त्यासाठी पुढे आले. किसनराव गोपाळराव जाधव, विलास शिवराम जाधव, शिलाबाई बाबुराव जाधव, रामराव शिवराम जाधव, अनिल सुभाष शिंदे, कैलास भिमराव निरंतर, रक्षणा अनिल जाधव, देवानंद बुरुकुले यांचा त्यात समावेश होता. उत्साह पाहता नरवाडे यांनी तुती बेणे उपलब्ध करुन दिले. पहिल्या टप्प्यात
प्रत्येकी सात जणांनी एक एकरात लागवड केली. पन्नास अंडीपूंज १०० रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आले.

कारवां बढता गया

 • हळूहळू एक एकरांतील तुतीचे क्षेत्र दोन एकरांपर्यंत गेले. उत्पन्न चांगले मिळू लागल्याने रेशीम शेती गावशिवारातील बहूतांश शेतकऱ्यांना खुणावू लागली. आज २५ ते ३० शेतकरी या व्यवसायात आहेत. सुमारे २५० अंडीपुंजांसाठी सरासरी एक हजार चौरस फूट शेडची गरज भासते. त्यासाठी किमान
 • अडीच लाख रूपये खर्च होतो असे रेशीम उत्पादक अनिल जाधव सांगतात.
 • अर्थात भांडवल उपलब्धीनुसार शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे शेड उभारण्यावर भर दिला.
 • टप्याटप्याने पैशांची उपलब्धता झाल्यानुसार त्यातील सुधारणांवर भर दिला.

कोश विक्री थेट बांधावरुन

बंगळूर जवळलील प्रसिध्द रामनगर बाजारपेठेत (कर्नाटक) कोष विकण्याचा पर्याय होता. गावातील शेतकऱ्यांचा १० ते १२ क्‍विंटल माल एकत्रित करायचा. बसद्वारे नांदेड गाठायचे आणि तेथून रेल्वेने बंगळूरला उतरुन तो माल रामनगरच्या कोष बाजारात नेण्यात येऊ लागला. विक्रीनंतर परतताना रेशीम शेतीला आवश्‍यक साहित्य खरेदी केले जायचे. सध्या भंडारा जिल्हयातील व्यापारी किंवा प्रक्रिया उद्योजकांना टाकळीतील रेशीम शेतीविषयी माहिती मिळाल्याने ते थेट गावात येऊन कोष खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक, हमाली व अन्य बाबींवर होणारा खर्च वाचला आहे. रामनगर भागातील व्यापारी देखील गावात येण्यास सुरुवात झाली आहे. अशाप्रकारे बाजारपेठेची स्पर्धा निर्माण झाल्याने गावातच शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे.

मिळालेले दर
सन २०१६-१७ मध्ये कमाल दर किलोला ६५० ते ७०० रुपये मिळाला होता. त्यापुढील दोन वर्षी ३५० ते ४५० रूपये व आता घसरण होत ते सरासरी २५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कोरोना संकटामुळे प्रक्रिया उद्योग ठप्प झाल्याचा हा परिणाम आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या दिवसात हे दर ५५० ते ६०० रुपयांपर्यंत गेले असते असे शेतकरी अनिल शिंदे सांगतात.

उत्पादन व उत्पन्न
प्रति बॅचमध्ये २०० ते २५० अंडीपूंजाचे संगोपन होते. एका एकरातील तुती पाल्यापासून तेवढ्या अंडीपुंजांसाठी खाद्याची सोय होते. सर्व खर्च विचारात घेतल्यास प्रति २०० अंडीपुंंजांच्या व्यवस्थापनावर किमान १५ ते २० हजार रूपये खर्च होतात असे अनिल शिंदे सांगतात. प्रातिनिधीक सांगायचे तर वर्षभरात सुमारे ९ बॅचेस घेतल्या जातात. साधारण ३० दिवसांत बॅच संपते. त्यातून ताजा पैसा मिळतो. तापमान या त्यातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे बॅचचा कालावधी कमी जास्त होत राहतो. प्रति बॅच सरासरी दोनशे किलो कोष उत्पादन मिळते. शंभर अंडीपुंजांमागे १०७ किलोपर्यंत म्हणजेच सव्वादोनशे क्‍विंटलपर्यंतही उत्पादनाचा पल्ला गाठता आला आहे.

काही रेशीम उत्पादकांनी केलेल्या सुविधा

 • उन्हाळ्यात विदर्भात तापमान वाढते. त्यावर उपाय म्हणून शेडच्या आजूबाजूला हिरवी जाळी (ग्रीन नेट),
 • शेडच्या वरील बाजूस मायक्रो स्प्रिंकलर अशी सुविधा
 • वीज गेल्यानंतरही ते सुरू ठेवता यावेत यासाठी बॅटरी ऑपरेटेड यंत्रणेचाही वापरही. त्यासाठी इंक्जेक्‍टर यंत्रणेसाठी तीन हजार रुपये खर्च.
 • शेडमध्ये वातावरण थंड ठेवण्यासाठी दोन कुलर्स.
 • अशा विविध पर्यायांतून शेडमधील वातावरण नियंत्रित ठेवत उन्हाळ्यात देखील कोश उत्पादनात सातत्यय
 • कोष उत्पादनासाठी २५ ते २७ अंश से. तापमानाची गरज राहते.

चॉकी सेंटरमध्ये वाढ

सुरूवातीच्यादहा दिवसांतील बाल्यावस्थेतील अळ्यांचे (चॉकी) संगोपन अत्यंत जिकीरीचे राहते. योग्य व्यवस्थापन न केल्यास मरतुकीचा धोका अधिक राहतो. त्यामुळे चॉकी सेंटरमधून थेट दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या अळ्यांची खरेदी करण्यावर शेतकरी भर देत आहेत. पूर्वी १०० अंडीपुंंजांमागे प्रत्येकी ८०० रुपयांची आकारणी केली जायची. यात वाढ करुन हा दर
एकहजार रूपये करण्यात आला आहे. टाकळीपासून पाच किलोमीटरवरील विडूळ येथे सिध्देश्‍वर बिचेवार यांनी चॉकी सेंटर सुरू केले आहे. मागणी वाढल्याने दिग्रस येथेही रवींद्र राऊत यांनी तशी उभारणी केली आहे. दोघांकडून दर एकच आकारला जातो. दोघेही रेशीम उत्पादक असल्याने गुणवत्तेबाबत तडजोड केली जात नाही.

रेशीम विभागाने दिली दिशा
रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी पंडीत चौगुले यांच्यासह तत्कालीन तंत्र अधिकारी मुकुंद नरवाडे यांनी गावाला रेशीम शेतीत दिशा देण्याचे काम केले. विडूळ येथील रेशीम उत्पादक महेश्‍वर बिचेवार, सिध्देश्‍वर बिचेवार यांचेही गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. सामुहिक निर्णय प्रक्रियेव्दारा हे शेतकरी चर्चेतून रेशीम व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे वाटचाल करीत आहेत.

 •  संपर्क- अनिल शिंदे- ९४२३५४५३५५
 • अनिल जाधव- ७६२०८४८९१२
 • कैलासराव निरंतर- ९७६४६५५४७९

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...