agriculture story in marathi, farming efforts in drought condition, vagholi, chakur, latur | Agrowon

दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे प्रयत्न
रवींद्र भताने 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

विकतच्या पाण्याने जगवली बाग 
फळबाग लागवडीनंतर काही काळातच (२०१५) परिसरात भीषण दुष्काळ पडला. झाडे वाळून जाण्याच्या मार्गावर असताना लातूरहून टँकर मागविला. तब्बल चार महिने टँकरने पाणी दिले. त्यासाठी ८३ हजार रुपयांचा खर्च आला. विकतचे पाणी विहिरीत साठवित असत. ठिबकद्वारे काटकसरीने ते झाडांना देऊन फळबाग जगवली. 

लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सातत्याने सामना करीत आहे. तरीही पाच एकरांवरील विविध फळपिकांचे नंदनवन फुलविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे ३५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारून, प्रसगी पाणी विकत घेऊन त्यांनी बाग सुकू दिलेली नाही. त्यांच्या कष्टाला आता गोड फळे येण्यास सुरवात झाली आहे. दुष्काळातही माळरानावर हिरवाई दृष्टीस पडू लागली आहे. 

लातूर जिल्ह्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने सहन करावा लागत आहे. चाकूर तालुक्यातील वाघोली परिसरात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. मात्र ऐन भरात पीक असताना पावसाने पाठ फिरवून शेतकऱ्यांच्या आशाआकाक्षांवर पाणी फिरवल्याचे दृश्य अलीकडील वर्षांत पाहावयास मिळाले आहे. 

दुष्काळाची परिसीमा 
वाघोलीचे पंढरीनाथ सोनवणे व त्यांचा उच्च शिक्षित मुलगा सुधीर सोनवणे दुष्काळाशी संघर्ष करीत आपली पाच एकर शेती जिद्दीने फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सात एकरांपैकी पाच एकरांवर त्यांची फळबाग आहे. पंढरीनाथ हे लातूर येथील एका डेअरी संस्थेत गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी कार्यरत होते. सन २०११ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरवात झाली. सुधीर यांचा वकिली व्यवसाय आहे. सुटीचे दिवस तसेच अत्यंत जरुरीच्या काळात ते पूर्ण वेळ शेतीत असतात. 

संघर्षातून वाटचाल 
सन २०१५ च्या भीषण दुष्काळात या भागातील विहिरी व कूपनलिका यांना पाण्याचा थेंबही नव्हता. परिणामी अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच सोनवणे यांना आपल्याकडील पाच जनावरांची विक्री करावी लागली. एकतर माळरान व त्यात पावसाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्षे शेतीत फक्त नुकसान सोसावे लागत होते. लागवड केलेल्या फळबागेलाही विकतचे पाणी देऊन खर्चात वाढ होत होती. तरीही हार न मानता जिद्दीने परिस्थितीला तोंड देत शेती जगवण्याचा प्रयत्न सोनावणे करीत राहिले. 

शेततळे उभारले 
सोनवणे साधारण चार-पाच वर्षांपासून दुष्काळ सहन करीत आहेत. यंदाही फार तर दोन पाऊस झाले. शाश्वत पाणी उपलब्ध असेल तरच शेतीत काही घडू शकते हे त्यांनी ओळखले. त्यानुसार मागील वर्षी २०१७ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ३५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. शेतपरिसरात नाला आहे. त्याचे पाणी बंधारा घालून अडवले. एका विहीर आहे. या जोरावर यंदा शेततळे भरलेले आहे. पाच एकर फळबागेला त्याचा मोठा आधार झाला आहे. 

माळरानावर फुलतेय नंदनवन 
पारंपरिक शेती सुरू असताना घरच्यापुरती आंब्यांची दहा झाडे लावली. त्यानंतर लिंबू, जांभूळ, चिकू, पेरू, अॅपलबेर आदींची विविधता जोपासत माळरानावर नंदनवन फुलविण्यास सुरवात केली. रोप लागवडीसाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च आला. वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सर्व क्षेत्राला कुंपण केले. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला. फळबाग फुलविताना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही. फळबाग लावल्यानंतर सुमारे चार वर्षे सोयाबीन व तुरीच्या आंतरपिकातून उत्पादन खर्च कमी केला. 

दृष्टिक्षेपात फळबाग 

  • आंबा-केशर, दशहरी, मलगोबा जातीच्या एकूण १६० झाडांची लागवड. गेल्या वर्षीच्या हंगामात 
  • व्यापाऱ्याला जागेवरूनच विक्री केली. त्यातून ७० ते ७२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा 
  • थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन आहे. 
  • लिंबू- सुमारे १११ झाडे. मागील वर्षी जागेवरूनच विक्री करून २८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. 
  • चिंच– शेताच्या सर्व बांधांवर ४२ झाडे. पुढील वर्षापासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. 
  • जांभूळ- दापोली येथून १८ झाडे आणून लागवड. मागील हंगामात उत्पन्न घेतले नाही. मात्र पुढील हंगामापासून ते घेण्याचे नियोजन 
  • चिकू- सुमारे ३४ झाडे. मागील वर्षी जागेवरच विक्री. सुमारे १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 
  • पेरू व अॅपलबेर- पेरूची ३५ व अॅपलबेरची १० झाडे. आजपर्यंत उत्पन्न न घेता वाटप केले. पुढील हंगामापासून बाजारात विक्रीचे नियोजन. 

सेंद्रिय घटकांचा वापर 
शेतात सेंद्रिय घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आवश्यकतेनुसार शेणखत, गांडूळखत, निंबोळी अर्क आदी विकत घेतात. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे फळे चवदार बनतात. जमिनीची सुपीकताही टिकून राहते, असा अनुभव सोनवणे सांगतात. 

विकतच्या पाण्याने जगवली बाग 
फळबाग लागवडीनंतर काही काळातच (२०१५) परिसरात भीषण दुष्काळ पडला. त्या वेळी विहीर कोरडी पडली. कूपनलिकेचे पाणीही गेले. झाडे वाळून जाण्याच्या मार्गावर असताना लातूरहून टँकर मागविला. तब्बल चार महिने टँकरने पाणी दिले. त्यासाठी ८३ हजार रुपयांचा खर्च आला. विकतचे पाणी विहिरीत साठवित असत. ठिबकद्वारे काटकसरीने ते झाडांना देऊन फळबाग जगवली. 

सेंद्रिय भाजीपाला 
उर्वरित माळरानावरील क्षेत्रात मल्चिंग व ठिबकद्वारे पाण्याचा काटकसरीने वापर करून हंगामानुसार भाजीपाला लागवड करण्यात येते. जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करीत असल्याने दर्जा चांगला मिळत आहे. मागील वर्षी मे महिन्यात एक एकरवर मिरची लागवड केली. त्याचे २० क्विंटलपर्यंत उत्पादन व सरासरी २० रुपये प्रति किलो दर मिळाला. कोथिंबिरीची अर्धा एकरवर मागील मेमध्ये लागवड केली. व्यापाऱ्याला जागेवरच विक्री केली. चाळीस रुपये प्रति किलो दर मिळाला. कोथिंबीर निघाल्यानंतर एक एकरवर जूनच्या सुमारास वरणाची लागवड केली. त्यापासून ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशा रितीने दुष्काळी स्थितीतही उत्पन्नाचे स्रोत सुरू ठेवले. 

कृषी विभागाची मदत 
फळबाग व्यवस्थापनेचा कुठला अनुभव नसल्याने सुरुवातीला काही अडचणींना तोंड द्यावे लागले. त्या वेळी कृषी सहायक सचिन पंडगे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच २०१५ च्या दुष्काळात फळबाग पुनरुज्जीवन योजनेतून शासकीय मदतही मिळाली. 

संपर्क -सुधीर सोनवणे- ९४२२७४३७३८  

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...