ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापन

 झाडावर ४ पाने राहतील अशा बेताने ग्लॅडिओलस फुलांची काढणी करावी.
झाडावर ४ पाने राहतील अशा बेताने ग्लॅडिओलस फुलांची काढणी करावी.

ग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे योग्य पोषण व उत्पादन मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय व रासायनिक खतांची मात्रा वापरणे अत्यंत गरजेचे असते. ग्लॅडिओलस पिकामध्ये   हेक्‍टरी ६० ते १०० टन शेणखत जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३००-४०० किलो नत्र, १५०-२०० किलो पालाश आणि १५०-२०० किलो स्फुरद खते द्यावीत. शेणखत लागवडीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे.

  • पालाश व स्फुरदची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यातून पिकाला २,४ व ६ पाने आल्यावर म्हणजेच लागवडीनंतर ३,५ व ७ आठवड्यांनी द्यावी.
  • लागवडीनंतर पिकाला नियमितपणे परंतु योग्य पाण्याचा आवश्‍यक तेवढा पाणीपुरवठा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन पाळ्यातील अंतर ७ ते ८ दिवसांचे असावे.
  • फुले काढून घेतल्यावरही कंदाच्या वाढीसाठी पुढे एक ते दीड महिना नियमित पाणी देण्याची आवश्‍यकता असते. लागवडीनंतर एक ते दोन खुरपण्या व महिन्यातून एकदा हलकीशी खणणी करून पिकाला मातीची भर द्यावी. अशा पद्धतीने पिकास भर दिली असता फुलदांडे सरळ येण्यास, जमिनीतील कंदांचे चांगले पोषण होण्यास मदत होते.
  • फुलांची काढणी व उत्पादन

  • लागवडीनंतर निवडलेल्या जातीनुसार आणि कंदांना दिलेल्या विश्रांतीच्या काळानुसार ६० ते ९० दिवसांत फुले फुलू लागतात.
  • पुढे महिनाभर काढणी चालू राहते. फुलांच्या दांड्यावरील पहिले फुल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागते. अशा अवस्थेत झाडाची खालची पाने शाबूत ठेवून फुलांचे दांडे छाटून घ्यावेत.
  • फुलदांड्यांच्या लांबीनुसार प्रतवारी करून १२ फुलांच्या दांड्यांची एक याप्रमाणे जुड्या बांधून त्याभोवती वर्तमानपत्राचा कागद बांधून लांबच्या अथवा कागदाच्या खोक्‍यात १५ ते २० जुड्या भरून विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत पाठवावे.
  • एक हेक्‍टर क्षेत्रातून दीड ते दोन लाख फुलदांडे मिळतात.
  • फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी कंदांची काढणी आणि साठवण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
  • फुलदांडे काढताना झाडावर चार पाने ठेवलेली असतात. या चार पानांच्या अन्नांशावर जमिनीत कंदांचे पोषण होत असते. सुमारे दीड ते दोन महिन्यांत झाडाची ही हिरवी पाने पिवळी पडून सुकू लागतात. अशा वेळी पिकास पाणी देणे बंद करावे.
  • पाणी देणे बंद केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जमिनीतील कंद काळजीपूर्वक त्यांना इजा न होता काढावेत.
  • - काढलेले मोठे कंद व लहान कंद कॅप्टन या बुरशीनाशक एक लिटर पाण्यात 2.5 ग्रॅम या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे भिजत ठेवून मग ३ ते ४ आठवडे सावलीत सुकवून पोत्यात भरून हवेशीर जागी ठेवावेत.
  • - शक्‍य असल्यास कंद शीतगृहात साठवून ठेवावेत. शीतगृहात साठवण केली असता पुढील पिकाची वाढ एकसारखी होऊन फुले येण्याचे प्रमाण देखील वाढते. आणि साठवणुकीत कंदाचे कंदकुज या रोगापासून बचाव होतो. हेक्‍टरी सुमारे दीड ते दोन लाख कंद देखील मिळतात.
  • संपर्क ः डाॅ. मोहन शेटे ः ०२०-२५६९३७५० (सहयोगी संशोधन संचालक (मैदानी प्रदेश), गणेशखिंड, पुणे)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com