मशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन

पहारीच्या सहाय्याने खोडवा उसाला खते द्यावीत
पहारीच्या सहाय्याने खोडवा उसाला खते द्यावीत

खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये. सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सान्निध्यात खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीतकमी खर्चात खोडवा पीक घेता येते. पट्टापद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे म्हणजे पाण्याची बचत होते.   मशागतीशिवाय खोडवा उसाचे किफायतशीर उत्पादन घेणे शक्य आहे. या पद्धतीत ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सलग सर्व सऱ्यात आहे तसेच पडू द्यावे. खोडक्यावर पडलेले पाचट बाजूला सारून खोडक्या मोकळ्या कराव्यात. जमिनीच्या वर दिसणाऱ्या खोडक्या धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्याव्यात. २.५ लिटर द्रवरूप पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी पाचटावर फवारावे. याचबरोबरीने हेक्टरी १२५ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे. त्यानंतर सर्व सऱ्यांना पाणी द्यावे.

  • रासायनिक खताची मात्रा ही पहारीने उसाच्या जवळ पहारीने छिद्रे पाडून मुळांच्या सान्निध्यात द्यावी. ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांत शिफारशीत खतमात्रेच्या निम्मी मात्रा उसाच्या ओळीच्या एका बाजूला एक फूट अंतरावर १० सें.मी. खोलीची भोके पहारीने घेऊन द्यावी.
  • बाळ बांधणी, मोठी बांधणी यांसारखी कोणतीही आंतरमशागत करू नये. कोणत्याही मशागतीशिवाय सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सानिध्यात खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीतकमी खर्चात खोडवा पीक घेता येते.
  • नत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत मात्रा युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतामधून एकत्रित दिल्यास प्रतिछिद्रामध्ये साधारण २० ते २५ ग्रॅम खत द्यावे.
  • अवर्षण परिस्थितीत खोडवा पीक व्यवस्थापन 

  • पारंपरिक लागवड पद्धतीने लागवड केलेल्या खोडव्यात सरी आड सरी पाचटाचे आच्छादन करावे. बगला फोडू नयेत यामुळे पाण्याची बचत होते.
  • जोडओळ पट्टा पद्धती (३ फूट बाय ६ फूट पट्टा) मध्ये पट्ट्यात पाचटाचे आच्छादन करावे किंवा रुंद सरी (४ फूट ते ५ फूट) पद्धतीमध्ये सर्व सऱ्यात पाचटाचे आच्छादन करावे. बुडख्यावरील पाचट बाजूला सारावे.
  • नेहमीच्या व रुंद सरीतील लागणीच्या खोडव्यात एक आड एक सरी पाणी देण्याचे नियोजन करावे. पट्टा पद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे म्हणजे पाण्याची बचत होते.
  • खोडवा पिकास पाण्याचा ताण असेल त्या वेळी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी (२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिलिटर पाणी). एकवीस दिवसांचे अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते.
  • खोडवा पिकास जेव्हा पाण्याचा ताण बसतो त्या वेळी हेक्टरी १२५ किलो म्युरेट ऑफ पोटॅशची जादा मात्रा मुळाच्या सान्निध्यात द्यावी. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते. खर्च थोडा वाढतो पण पीक जगते.
  • म्युरेट ऑफ पोटॅश फवारणीला दुसरा पर्याय म्हणून ६ टक्के केओलीनची फवारणी फायद्याची ठरते. यासाठी ६० ग्रॅम केओलीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हेक्टरी १००० लिटर पाणी लागते. १५ दिवसाचे अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
  • पाचट जाळलेले असल्यास हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. याचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस तुटल्यावर एक महिन्यांनी हिरवळीच्या पिकाची टोकण पध्दतीने लागवड करुन पीक दीड महिन्याचे झाल्यावर आच्छादनासाठी वापर करावा.
  • पाचट आच्छादन न केलेल्या शेतकऱ्यांनी एक आड एक सरी पाण्याचे नियोजन करावे आणि पुढच्या पाण्याच्या वेळी सरी बदलावी.
  • पाणी उपलब्ध असल्यास खतांचा पहिला व दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. एकाच वेळी पाणी देणे शक्य असल्यास फक्त खतांचा पहिला हप्ता देऊनच पाणी द्यावे.
  • पाणी उपलब्ध नसल्यास रासायनिक खते जमिनीत देऊ नयेत, खते फवारणीद्वारे द्यावीत. बगला फोडू नयेत.
  • पावसाळा सुरू झाल्यावर खताचा शेवटचा हप्ता देऊन पाणी द्यावे.
  • खोडवा उसाच्या शेता भोवती दाट शेवरीची लागवड असल्यास गरम हवेचा झोत अडविला जाऊन उसाच्या पानातील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पीक वाळत नाही.
  • पी. व्ही. घोडके, ९८२२०१३४८२ (कृषिविद्या विभाग(कृषिशास्त्र व तंत्रज्ञान)वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.),जि. पुणे) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com