वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघास

टंचाईच्या काळात हिरवा चारा मुरघासच्या स्वरूपात प्राप्त झाल्याने जनावराचे दुग्ध उत्पादन टिकून राहते
टंचाईच्या काळात हिरवा चारा मुरघासच्या स्वरूपात प्राप्त झाल्याने जनावराचे दुग्ध उत्पादन टिकून राहते

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन होते. अतिरिक्त हिरवा चारा वाळवून साठवून ठेवला जातो. वाळवून साठवताना त्यातून मिळणारे पोषक घटक कमी होत जातात व चारा निकृष्ट होतो. चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा मुरघास बनविण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. ज्या पशुपालकांकडे वर्षभर सिंचनाची सुविधा आहे, असे पशुपालक मुद्दाम ठरवूनसुद्धा आपल्या संकरित/देशी जनावरांपासून भरघोस उत्पादन घेण्यासाठी वर्षभर फुलोऱ्यातील चारा किंवा चिकातील मका जनावरांना दररोज देऊ शकत नाहीत. त्यासाठी चिकातील मका/ फुलोऱ्यातील चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवल्यास त्यातील उच्चतम पौष्टिकता जनावरांना वर्षभर दररोज मिळू शकेल व दुग्धव्यवसाय अधिक फायद्याचा करणे शक्य होते. चाऱ्यातील जास्तीत जास्त पौष्टिक घटक आहे, त्या स्थितीत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी चारा हवाबंद करून साठवणूक करण्याच्या प्रक्रियेला मुरघास म्हणतात. मुरघास बनविण्यासाठी चारा पिके मुरघास हा हिरव्या चाऱ्यापासूनच बनविला जातो. मुरघास बनविण्यासाठी मुख्यत्वे एकदल पिकांचा फुलोऱ्यात आल्यावर किंवा त्याच्या दाण्यात चिक तयार झाल्यावर वापर केला जातो. यात मका, ज्वारी (कडवळ), बाजरी, शुगर ग्रेझ, न्यूट्रीफीड, ओट (सातू) किंवा हत्ती गवत यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर द्विदल पिके जसे लसून घास, बरसीम, चवळी, तसेच ॲझोला इ. चा मुरघासातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी एकदल पिकांमध्ये मिसळून वापर केला जातो. मुरघास बनविण्यासाठी चारा पिकांमध्ये आवश्यक घटक

  • चाऱ्यामध्ये ३० ते ३५ टक्के शुष्क घटक असावेत.
  • किण्वन प्रक्रिया होण्यासाठी भरपूर प्रमाणात सहज उपलब्ध होणारे कर्बोदके (शर्करा) असावेत.
  • दाब दिल्यास तो चारा मुरघास बॅग, बेल्स (गासड्या/गठ्ठे) किंवा मुरघास बंकर/हौद यामध्ये घट्ट दबून बसावा.
  • मुरघास बनविण्याची पद्धत

  • चारा फुलोऱ्यात आल्यावर त्याची कापणी एकाच वेळेस करून घ्यावी. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास एक दिवस चारा सुकू द्यावा व दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करून घ्यावी.
  • मुरघास बंकर/हौदाचा दरवाजा लाकडी फळ्या व प्लॅस्टिकचा कागद वापरून बंद करावा. बॅग वापरणार असल्यास सपाट जागेवर बॅग उघडून धरावी व आतील प्लॅस्टिकची बॅग (ईनर) सर्व कोपऱ्यात व्यवस्थित बसवून घ्यावी.
  • बंकर/हौद किंवा बॅग मध्ये कुट्टी केलेला चारा भरण्यास सुरवात करावी. प्रत्येक थर व्यवस्थित दाबून भरावा. प्रत्येक अर्धा फुटाच्या थरानंतर मुरघास कल्चर टाकावे.
  • थरावर थर व्यवस्थित दाबून बंकर/हौद किंवा बॅग भरून घ्यावी. दाब देण्यासाठी पायाने तुडवून किंवा धुम्मसच्या साहाय्याने किंवा बंकरच्या बाबतीत ट्रक्टरच्या साहाय्याने चारा दाबून भरावा जेणेकरून त्यात हवा शिल्लक राहणार नाही.
  • बंकरच्या वरील बाजूस एक ते दीड फूट जास्त चारा भरून त्यावर प्लॅस्टिक कागदाचे हवाबंद अच्छादन करावे. त्यावरून बंकरच्या वरील भागावर वाळूने भरलेल्या गोण्या किंवा विटा यांचे वजन ठेवावे जेणेकरून बंकर हवाबंद होईल.
  • बॅगचे तोंड व्यवस्थित बांधून त्यावरही वजन ठेवावे.
  • नैसर्गिकरीत्या मुरघास ४५ दिवसांत तयार होतो, परंतु मुरघास कल्चरचा वापर केल्यास २१ दिवसांत मुरघास तयार होतो.
  • खाऊ घालण्याची पद्धत

  • ज्यावेळेस चाऱ्याची गरज असेल त्या वेळेस मुरघास उघडावा. एकदा मुरघास उघडल्यावर रोज त्यातील कमीत कमी १ ते १.५ फूट जाडीचा थर मुरघास संपेपर्यंत वापरला पाहिजे व काढून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा.
  • सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांना मुरघास खाऊ घालू नये. मोठ्या जनावरांना १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालता येतो. -मुरघासाला येणाऱ्या आंबट गोड वासामुळे जनावरे मुरघास आवडीने खातात.
  • त्यावर बुरशी आली असल्यास किंवा रंग काळपट झाला असल्यास असा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
  • मुरघासचे फायदे

  • वर्षभर एकाच प्रतीचा व अधिक पौष्टिकतेचा चारा मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. वेळेवर माजावर येउन गाभण राहण्यास मदत होते.
  • कालवडी / रेड्यांची चांगली वाढ होऊन, त्यांच्यापासून भरपूर दुग्धोत्पादन देणाऱ्या गाई-म्हशी तयार होतात.
  • पावसाळ्यात कमी खर्चात तयार होणारा अतिरिक्त हिरवा चारा त्याच्या पौष्टिकतेसह १ ते १.५ वर्षे साठवता येतो.
  • सर्व चारा एकाच वेळेस काढल्याने शेत जमीन लवकर मोकळी होते व पुन्हा चारा उत्पादनासाठी वापरता येते.
  • रोज चारा आणणे व कुट्टी करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. त्यामुळे मजूरही कमी लागतात.
  • कमी जागेत जास्त चाऱ्याची साठवणूक करता येते. एका घनमीटर जागेत ५५० ते ६०० किलो मुरघास साठविता येतो.
  • टंचाईच्या काळात हिरवा चारा मुरघासच्या स्वरूपात प्राप्त झाल्याने दुग्ध उत्पादन टिकून राहते.
  • मुरघास आवडीने व संपूर्णपणे खाल्ला जात असल्याने चाऱ्याची नासाडी होत नाही.
  • एकूणच मुरघासामुळे दुग्धव्यवसाय फायद्याचा होतो.
  • हे लक्षात ठेवा

  • फक्त हिरव्या चाऱ्याचाच मुरघास तयार होतो.
  • मका हे मुरघास बनविण्यासाठीचे सर्वोत्तम पीक आहे.
  • पहिल्यांदा मुरघास बॅगमध्ये थोड्या प्रमाणात मुरघास बनवून अनुभव घ्यावा.
  • मुरघास उत्तम बनण्यासाठी वापरावयाचे संवर्धके तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच वापरावेत.
  • बुरशी वाढलेला व काळा पडलेला मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
  • एकदा मुरघास उघडल्यावर त्यातील वरील कमीत कमी १ ते १.५ फुटाचा थर रोज काढावाच.
  • संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ डॉ संतोष वाकचौरे, ७०८३६३९५५३ (पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com