तंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेत घडताहेत शेतकरी उद्योजक

अन्नप्रक्रिया उद्योगाचे शिक्षण देणारी देशातील पहिल्या क्रमांकाची ही संस्था आहे. आज शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे आवश्‍यक बनले आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे तंत्रज्ञान व प्रशिक्षण आम्ही देतो. शेतकऱ्यांचा त्यास प्रतिसाद चांगला मिळतो प्रक्रिया उद्योगाशिवाय शेती फायद्याची ठरणार नाही. - डॉ. व्ही. आर. सिरिंजा, प्रमुख, प्रक्रिया उद्योग विभाग, आयआयएफपीटी
धान्यांवर आधारीत पदार्थ, पॅकींग यंत्रणा व स्प्रे ड्रायर
धान्यांवर आधारीत पदार्थ, पॅकींग यंत्रणा व स्प्रे ड्रायर

शेतीमाल दरांतील सातत्याच्या चढ-उतारांमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. मात्र मालाचे मूल्यवर्धन केल्यास त्यास अधिक दर मिळवणे शक्य होऊन नफ्यात वाढ होऊ शकते. मात्र असा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी तांत्रिक ज्ञान व प्रशिक्षण गरजेचे असते. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत तंजावूर (तमिळनाडू) येथील `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी' (आयआयएफपीटी) या संस्थेने ही बाब शक्य केली आहे. विविध तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबरच ९० हून अधिक प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण इथे उपलब्ध केले आहे. त्यातूनच आत्तापर्यंत तीसहून अधिक शेतकरी उद्योजक म्हणून  स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत... अन्नप्रक्रिया उद्योगातील अग्रगण्य संस्था म्हणून तमिळनाडूतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी’ (आयआयएफपीटी) संस्थेची ओळख आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतील प्रमुख पीकपद्धती असलेल्या भात, नाचणी, बाजरी, केळी या पिकांचा विचार करून संस्थेची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. काळानुसार संस्थेच्या कार्यपध्दतीत बदल होत गेले. खऱ्या अर्थाने २००८ मध्ये राष्ट्रीय संस्था म्हणून  ओळख मिळाली. त्यानंतर थेट नऊ वर्षांनी (२०१७) ‘इंडियन इन्स्टिट्यट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी''   अशी नवी ओळख संस्थेला मिळाली. आज प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षणाबरोबरच ‘बी.टेक’, ‘एम.टेक’ आणि ‘पीएचडी’ यांसारख्या कृषी अभियांत्रिकीतील उच्च पदवीचे शिक्षण या संस्थेद्वारे दिले जाते. मात्र संस्थेची प्रमुख ओळख ही प्रक्रिया उद्योगातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि त्यातून शेतकरी उद्योजक म्हणून घडण्यासाठी मार्गदर्शन यासाठीच अधिक आहे.

शेतकरी घेताहेत प्रक्रियेचे प्रशिक्षण  तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशापासून महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, बिहार अशा विविध राज्यांतून तरुण विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास प्रशिक्षणसाठी येतात. त्यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. डॉ. सी. आनंदरामकृष्णन हे सध्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. देशात मूल्यवर्धित पदार्थाचा उत्पादन खर्च वर्षाला जवळपास सव्वादोन लाख कोटी रुपयांपर्यंत आहे, जो शेतीतील उत्पादन खर्चापेक्षाही सर्वाधिक आहे. त्या   व्यतिरिक्त काढणीपश्‍चात तंत्रज्ञान किंवा प्रक्रियेअभावी एकूण फळे आणि भाजीपाला मालाचे केवळ हाताळणीत एकूण २५  ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत तर धान्य आणि तेलबियांचे १५  टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. या सर्व बाबींचा विचार करता नुकसानीचा हा आकडा वार्षिक सुमारे ६० हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यामुळेच काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान घेऊन प्रक्रिया उद्योगाकडे वळणे हा त्यावर उपाय असू शकतो, असे संस्थेचे म्हणणे आहे. त्याच दृष्टीने संस्थेने  विविध तंत्रज्ञान सुविधाही देण्यास सुरवात केली आहे. 

घडवले उद्योजक  संस्थेत सुमारे ९० प्रकारच्या विविध प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. त्या माध्यमातून आत्तापर्यंत ३० हून अधिक उद्योजक तयार झाले आहेत. संस्थेत स्वतंत्र प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण विभाग कार्यरत आहे. प्रा. डॉ. व्ही. आर. सिरिंजा यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ प्राध्यापक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करतात. यात ज्वारी, बाजरीसह दुग्धजन्य पदार्थ, निवडक धान्यपदार्थांचा समावेश आहे. या घटकांचे प्रात्यक्षिक प्रयोगही या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठीचे तंत्रज्ञानही साधे, सोपे आणि कमी खर्चातील आहे. 

स्वतंत्र यंत्रे विकसित विविध प्रकारच्या उद्योगांसाठी संस्थेने खास यंत्रे विकसित केली आहेत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडू शकतील व हाताळणीही सोपी होईल अशी ही यंत्रे आहेत. त्यात दूध व्यवसायासाठी आवश्‍यक स्प्रे डायर, ट्रे डायर, दूध पावडर, नारळाची पावडर करणारी यंत्रे, याशिवाय केळीचे चिप्स, पालेभाज्या, कांदा सुकवणे यासाठी खास सोलर ड्रायरही आहेत. त्याशिवाय पॅकिंगसाठी खास बॅंड सेलिंग मशिन, फिल सिल मशिन आहेत. 

प्रशिक्षण आणि सल्लाही देशच्या काना-कोपऱ्यातून शेतकरी, महिला बचत गट  वा अन्य इच्छुकांना या ठिकाणी प्रशिक्षण घेता येते. एक, दोन, तीन आणि पाच दिवसांपर्यंत कालावधी असलेली प्रशिक्षणे इथे आयोजित करण्यात येतात. त्यासाठी    वर्षभराचे  वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आपापल्या सोईनुसार त्याचा लाभ घेता येतो. प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक पद्धतीने उद्योगाच्या उभारणीपर्यंतचे मार्गदर्शनही संस्थेतील तज्ज्ञांद्वारे होते. अर्थात त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागते.

ज्वारीचे आइस्क्रीम ज्वारी, नाचणी यांसारख्या धान्यापासून संस्थेने नॉन डेअरी-आइस्क्रीम युनिट तयार केले आहे. त्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा विकसित केली आहे. ज्वारी हे सामान्याच्या आहारातील महत्त्वाचे आणि पौष्टिक घटक असलेले धान्य आहे. त्यामुळे त्याच्या आइस्क्रीमची कल्पनाच वेगळी आहे. अलीकडेच संस्थेने त्याचे पेटंट घेतले आहे. एका खासगी संस्थेशी करार करून हे यंत्र बाजारात आणण्याच्या हालचालीही संस्थेकडून सुरू आहेत. नुकतेच बंगळूर येथील राष्ट्रीय प्रदर्शनात या तंत्रज्ञानाचे सादरीकरण संस्थेने केले.  ज्वारी, बाजरीच्या चकल्या, नूडल्स, बॉल्स ज्वारीच्या आइस्क्रीसह ज्वारी, बाजरीच्या चकल्या, नूडल्स, बॉल्स, ‘एक्‍सट्रूडेड फॉक्‍सटेल’, रागी मॅकारोनी, आदी प्रक्रिया पदार्थांचे प्रशिक्षण इथे खास करून दिले जाते. विशेषतः महिला बचत गट, शेतकऱ्यांसाठी ही प्रशिक्षणे उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी आहेत. या पदार्थांची चव, वैशिष्ट्ये आणि आकर्षक पॅकिंग नक्कीच भरळ पाडणारे आहे. 

कांदा, कोथिंबिरीची पावडर कांदा, कोथिंबीर, मेथी अशा भाजीपाला   आणि फळभाज्यांचे खास ‘ड्रायर’ तयार करण्यात आले आहेत. भाजीपाल्याचे निर्जलीकरण व पावडर तयार करून पॅकिंग करून विक्रीस सज्ज करण्यापर्यंतचे प्रशिक्षण या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाते. शेतकऱ्यांना पडत्या दरांसोबत अनेक वेळा सामना करावा लागतो. हाती काहीच पडत नाही. अशा प्रतिकूल वेळी मूल्यवर्धित भाजीपाल्याला चांगली बाजारपेठ शोधणे शक्य होते. त्यासाठीचे तंत्रज्ञान किंवा यंत्रेही कमी खर्चिक आणि हाताळणीसाठी सुलभ आहेत. भारनिमयमनाची समस्या लक्षात घेऊन सौरऊर्जेचा वापरही करण्यात आला आहे. 

‘आत्मा’च्या पुढाकाराने ज्वारी, बाजरी उत्पादकांना संधी  सोलापूर येथील ‘कृषी विभाग-आत्मा’ यांच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तंजावूरच्या या आयआयएफटी संस्थेला अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी एस. बी. जेटगी, कृषी अधिकारी आर. डी. जाधव यांच्यासह शेतकरी कंपन्या, शेतकरी गट यांच्या प्रतिनिधींसह ३० जणांच्या चमूचा यात समावेश होता. संस्थेतील ज्वारी आणि बाजरीवरील प्रक्रिया उद्योगाची दौऱ्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्र ज्वारी पिकाखाली असते. बाजरीतेही क्षेत्र चांगले असते. या दोन्ही पिकांतील विविध प्रक्रिया उद्योगातील तांत्रिक माहिती, त्याची प्रक्रिया, यंत्रे आदींच्या माहितीमुळे उद्योगातील संधी या निमित्ताने पुढे आल्या.  संपर्क- : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी, ०४३६२-२२६६७६

मुरगेश्‍वरन यांनी उभारली ‘बिस्किटाची फॅक्‍टरी’

संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि उद्योग उभा राहिला अशी उदाहरणे पाहण्यास मिळणे हीच खरी तंत्रज्ञान यशस्वी होण्याची खरी पावती असते. तंजावूरच्या दक्षिणेला दीड ते दोन किलोमीटरवर वल्लम परिसरात एन. मुरगेश्‍वरन यांनी ‘आयआयएफपीटी’मध्ये धान्यावर आधारित बिस्किटे तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांचे हे प्रत्यक्ष उदाहरण शेतकऱ्यांसाठी निश्‍चित पथदर्शक आहे.  मुरगेश्‍वरन यांची वल्लम येथे पाच एकर शेती आहे. नाचणी, भात अशी पिके त्यांच्याकडे होतात. बीएस्सी. बीपीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. पूर्वी ते केवळ  शेती करायचे. त्यानंतर आवळा प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यांनी आपल्यातील उद्योजक जागा केला. काही वर्षे त्यात अनुभव घेतला. मात्र त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा होता. पाच वर्षांपूर्वी ‘आयआयएफपीटी’ मध्ये त्यांना धान्यांवर आधारित बिस्किटे बनवण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. मग त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले. स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर केला. त्यातून बिस्किटनिर्मितीचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला अनेक आर्थिक अडचणी आल्या. पण जिद्दी व चिकाटी मुगरेश्‍वरन यांनी त्यातून मार्ग काढत हा प्रकल्प पूर्ण केलाच. इमारत उभारणी, यंत्रसामग्री असा ४० लाख रुपयांचा खर्च आला.

आरोग्यदायी बिस्किटे  बिस्किटे तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतासह परिसरातील शेतकऱ्यांकडून बाजरी, नाचणी खरेदी केली जाते. या दोन्ही धान्यांतील पौष्टिक घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांचे स्वरूप ठेवले. उत्पादन प्रक्रियेत मैदा किंवा साखर यांचा वापर केला जात नाही. त्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला गूळ वापरला जातो. त्यामुळे बिस्किटांची पौष्टीकता वाढतेच, शिवाय त्याची नैसर्गिक चवही  मिळते. 

‘निवीगोल्ड’ ब्रॅंड मुरगेश्‍वरन यांनी बाजारपेठ मिळवण्यासाठीही प्रयत्न केले. त्यातूनच या व्यवसायात पाय रोवणे त्यांना शक्य झाले. बिस्किटांची वैशिष्ट्यपूर्ण चव, त्यातील पौष्टिक घटक, ब्रॅंडिंग, पॅकिंग यात नावीन्यता ठेवल्याने ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. ‘दी टेस्ट ऑफ हेल्थी...या स्लोगनद्वारे ‘निवीगोल्ड’ रागी कुकीज, मिलेट कुकीज, कोडो कुकीज अशा ब्रॅंडनेमने त्यांची बिस्किटे संपूर्ण तामिळनाडूत पोचली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात खास विक्रेते नेमले आहेत. उत्पादकतेपेक्षा गुणवत्ता जास्त महत्वाची आहे, असे मुरगेश्‍वरन मानतात. त्यामुळे उत्पादनाच्या दर्जात कोणतीही तडजोड करायची नाही असे त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच बाजारपेठेत चांगला उठाव मिळण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. 

दिवसाला तीनशे किलो उत्पादन अवघ्या पाच वर्षांतच मुरगेश्‍वरन यांची ‘बिस्किट फॅक्‍टरी’ सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. वाढती मागणी आणि उपलब्ध यंत्रणा यांचा विचार करता दिवसाला ३०० किलो उत्पादन होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा अनेक वेळा कमी पडतो एवढी मागणी ग्राहकांकडून असल्याचे ते  सांगतात.  रोजगारनिर्मिती केली सुरवातीला छोटा प्रकल्प असलेल्या या उद्योगाची चांगली वाढ झाली आहे. त्यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान वा कर्ज घेतलेले नाही. स्वतःच्या हिमतीवरच व स्वउत्पन्नातील गुंतवणुकीतूनच प्रकल्पाची उभारणी शक्य झाली आहे. घरातील मंडळींचा त्यांना मोठा सहभाग मिळतो. महिन्याला सुमारे पाच ते सात लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे. परिसरातील सुमारे १५ जणांना रोजगार देण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

 संपर्क- एन. मुरगेश्‍वरन, ९७८६४२१७७२  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com