लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक

 जनावराचा गोठा स्वच्छ व कोरडा राहील याची काळजी घ्यावी.
जनावराचा गोठा स्वच्छ व कोरडा राहील याची काळजी घ्यावी.

‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर निश्चित रामबाण उपचार नाही. उपचार हे फक्त तोंडातील व पायातील जखमा वाढून या रोगाची गुंतागुंत वाढणार नाही यासाठी केले जातात. त्यामुळे रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नियंत्रण मिळवता येते. लाळ्या-खुरकुत हा रोग ‘पिकोर्ना’ नावाच्या विषाणूमुळे होतो. पिकोर्ना विषाणूच्या ओ, ए, सी, आशिया -१, सॅट-१, सॅट-२ व सॅट ३ अशा सात प्रमुख जाती आहेत. या विषाणूच्या साठपेक्षा अधिक उपजाती आहेत. भारतात खुरी रोग ओ, ए , सी व आशिया-१ या विषाणूच्या जातीमुळे होतो. हा विषाणू प्रखर सूर्य प्रकाशात अकार्यकक्षम होतो आणि आम्ल व अल्कलीमुळे नष्ट होतात. हा विषाणू थंड वातावरणात अधिक काळ जिवंत राहतो. रोगाट हवामानात एक वर्षापर्यंत जिवंत राहतो. जनावरांच्या चाऱ्यामध्ये अडीच ते तीन महिने जिवंत राहतो. रोगाचा प्रसार

  • प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो.
  • रोगी जनावरांची लाळ, मल-मूत्र याने दूषित झालेला चारा, पाणी याद्वारे प्रसार होतो
  • दूषित हवा व रोगी जनावरांच्या संपर्कातील माणसांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
  • सर्व जनावरे एकाच ठिकाणी चारा खात असतील, पाणी पीत असतील तर आजारी जनावरापासून इतर जनावरांमध्ये प्रसार होतो
  • लक्षणे

  • या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास साधारणत: ४-६ दिवसांत जनावरास खूप ताप येतो.
  • चारा खाणे व रवंथ करणे बंद होते.
  • दुधाळ जनावरात दूध बंद अथवा कमी होते.
  • जनावर मलूल बनते व सुस्त बसते.
  • दोन ते तीन दिवसात ताप कमी होतो.
  • तोंडात, जिभेवर, टाळूवर, गालाच्या व ओठाच्या आतील बाजूस छोटे पुरळ येतात. नंतर ते मोठे होतात व फटतात आणि तेथे लाल रंगाचे चट्टे दिसतात व व्रण पडतात
  • तोंडातील जखमांमुळे वेदना झाल्याने जनावर चारा खाऊ शकत नाही.
  • तोंडातून लाळ गळते तसेच एक किंवा चारही खुरांच्या आत पुरळ येऊन फुटतात.
  • जनावर लंगडते, खंगत जाते
  • कासेवर पुरळ येतात त्यामुळे काही वेळा कासदाह होतो.
  • कधी कधी जनावरात गर्भपात होतो .
  • शेळ्या मेंढ्यात लक्षणे कमी तीव्रतेची असतात.
  • शेळ्या मेंढ्यात तोंडात पुरळ हे शक्यतो टाळूवर येतात तसेच तोंडापेक्षा पायात जास्त प्रमाणात पुरळ येतात.
  • रोगाचे दुष्परिणाम

  • रोगातून बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागतो.
  • कासेवर पुरळ येतात.
  • जिवाणूंचा प्रादुर्भाव कासेत झाला तर ‘कासदाह’ रोग होतो.
  • गाभण जनावरात गर्भपात होतो.
  • तात्पुरता किंवा दीर्घकाळ वांझपणा येतो.
  • खुरांची जखम चिघळली किंवा त्यात आळ्या पडल्या तर बऱ्याच वेळा पूर्ण खूर गळून जाते व जनावराला कायमचा लांगडेपणा येतो.
  • कालवडी व गोऱ्ह्यांची वाढ खुंटते.
  • जनावरे उष्णता सहन न झाल्याने धापा टाकतात.
  • त्वचा शुष्क व खडबडीत होते व त्यावर खूप केस वाढतात.
  • -हृदयाचे कार्य कमकुवत होते किंवा रक्तक्षय होतो.
  • उपचार हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर निश्चित रामबाण उपचार नाही. उपचार हे फक्त तोंडातील व पायातील जखमा वाढून या रोगाची गुंतागुंत वाढणार नाही यासाठी केले जातात.पशुवैद्यकाकडून खालील उपचार करावेत

  • प्रथम या आजारात तोंड व पाय २-४ टक्के खाण्याचा सोड्याने (साधारण : २५ ग्रॅम सोडा प्रतिलिटर पाण्यात ) धुऊन घ्यावेत.
  • पायातील खुरावर जखमांवर पातळ डांबर बसवावे.
  • पशुवैदयकाकडून पायातील जखमेत अळ्या पडल्या असतील तर थोडेसे टर्पेनटाईन तेल टाकून अळ्या काढाव्यात व नंतर जंतुनाशक मलम लावावे.
  • पायातील व तोंडातील जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी पशुवैद्यकाकडून प्रतिजैविकाचे व व्हिटॅमिनचे इंजेक्शन देऊन घ्यावीत.
  • आजारी बैलांना आराम द्यावा.
  • वाळलेल्या कडब्या ऐवजी मऊ हिरवा चारा खाऊ घालावा.
  • खुराक कोरडा न देता भिजवून द्यावा.
  • ज्वारीच्या पिठाची कांजी पाजवावी.
  • जनावराचा गोठा स्वच्छ व कोरडा राहील याची काळजी घ्यावी.
  • प्रतिबंध या रोगाचे दूरगामी गंभीर परिणाम होत असल्याने व त्यावर योग्य उपचारपद्धती नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत

  • आजारी जनावरांना वेगळे बांधावे.
  • आजारी जनावराची बाजारात ने-आण बंद करावी.
  • आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये.
  • जनावरांचा गोठा ४ टक्के धुण्याच्या सोड्याच्या द्रावणाने धुऊन घ्यावा.
  • रोगाची साथ आलेल्या गावाच्या नजीकच्या गावात लस दिली नसेल तर ती देऊन घ्यावी.
  • या रोगावरील लस सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात देऊन घ्यावी.
  • ही लस चार महिने किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वासरास देता येते. ही लस विकत घेतली तर औषधाच्या दुकानातून नेताना ती बर्फावर ठेवून न्यावी.
  • लसीकरण केल्यानंतर एक ते दोन आठवड्यात जनावरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व ती जवळपास ६ महिने टिकते
  • या रोगाची लस सर्व सरकारी पशुवैद्यक दवाखान्यात मिळते.
  • संपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६ (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com