मुक्त संचार संगोपन पद्धतीमुळे जनावरांवरील ताण कमी होण्यास मदत होते.
मुक्त संचार संगोपन पद्धतीमुळे जनावरांवरील ताण कमी होण्यास मदत होते.

गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रे

जास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध उपपदार्थ बनविण्यासाठी लागणारी गुणवत्ता आपल्या दूध उत्पादनामध्ये आणण्यासाठी व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. यामध्ये जनावरांचे आरोग्य, स्वच्छ व शुद्ध दूध उत्पादन, संतुलित आहार आणि पाणी व्यवस्थापन, जनावरांचा कल्याणकारी सांभाळ आणि पोषक वातावरण इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. दूध उत्पादनवाढीबरोबरच दुधाची गुणवत्ता हा दूध उत्पादकांसाठी चांगला दर मिळण्यासाठी कळीचा मुद्दा आहे. सध्या मिळत असलेल्या फॅट व एसएनएफसोबतच दुधामधील जीवाणू (बॅक्टेरिया), टॉक्सिनस (विषारी पदार्थ), दुधामधील अल्कोहोल (अॅसिडीटी), दुधामधील खनिजे, दूध जास्त काळ टिकण्याची क्षमता, दुधापासून विविध उपपदार्थ बनविण्यासाठी लागणारी गुणवत्ता इत्यादी पातळ्यांवर आपण दुधाची प्रत नियंत्रित करू शकतो. पिशवीबंद दुधासोबतच दुधापासून विविध प्रकारच्या मिठाई व इतर पदार्थ जसे की, लोणी, दही, श्रीखंड, चीज, पनीर, चॉकलेट, लहान मुलांसाठीचे दुग्धजन्य पदार्थांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी लागणारे दूध हे त्या गुणवत्तेचे हवे.

दुभत्या चांगल्या गाई, म्हशींची निवड

  • नवीन दुभत्या गायी-म्हशी विकत घेताना तिचे सुरू असलेले वेत, रक्तातील विदेशी जातीचे प्रमाण, सध्याची आरोग्य स्थिती, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, मागील नोंदीची विश्वसनीय माहिती हवी.
  • जातिवंत गाय, म्हैस दूध धंद्यासाठी फायदेशीर असतात. जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींना संतुलित पशू आहार, बायपास फॅट इत्यादीचा वापर करून त्यांच्याकडून तिच्या क्षमते एवढे दूध उत्पादन मिळवता येऊ शकते. जातिवंत गाई, म्हशी गोठ्यात तयार करण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा तयार करावा.
  • व्यवस्थापन

  • गाई, म्हशींचा गोठा, पाणी पाजण्याची पद्धत, मोकळेपणा व एकूणच आरामदायी वातावरण असावे. गोठ्याची दिशा व उंची, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, शेण व मूत्र साठू न देणे, वेळेवर फवारणी, माशा व इतर कीटक यांचा उपद्रव होऊ न देणे, स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध करून देणे, वेळेवर जंतनाशक पाजणे, आजारी गाई, म्हशींवर पशुवैद्यकाकडून वेळेवर उपचार करावेत.
  • दूध काढण्याच्या वेळा पाळाव्यात. माजावर आलेल्या जनावरांना कृत्रिम रेतन करून घेणे किंवा पाडा दाखवावा. सर्व नोंदी ठेवाव्यात. जागेच्या उपलब्धतेनुसार जनावरांची संख्या ठरवावी. लसीकरण, भटके प्राणी, आगंतुकांना गोठ्यामध्ये येण्यास प्रतिबंध करावा. आजारी जनावरांना वेगळे करावे, त्यांचे दूध वेगळे ठेवावे.
  • स्वच्छ दूध उत्पादन

  • गाई, म्हशीपासून उत्पादित झालेले दूध हे जितके स्वच्छ असेल, तितके त्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता उत्तम राहते. रोगप्रतिकार क्षमता उत्तम ठेवावी. त्यासाठी सेलेनियम आणि बायोटीन (जीवनसत्त्व एच) याचा वापर पशुखाद्यात करावा.
  • दूध काढण्या अगोदर व नंतर गाई, म्हशींची कास स्वच्छ करावी. कासेचे निर्जंतुकीकरण करावे. दूध ठेवण्याची भांडी, कॅनसुद्धा स्वच्छ व जीवाणूविरहित असावेत.
  • मुबलक स्वच्छ पाणी

  • दुधामध्ये सुमारे ८३ टक्के (म्हैस) व ८७ टक्के (गाय) इतके पाण्याचे प्रमाण असल्यामुळे स्वच्छ व ताजे पाणी पाजावे. ज्या ठिकाणी गव्हाणीमध्ये पाणी सोडले जाते तिथेही स्वच्छता ठेवावी. २४ तास पाण्यासाठी जे पाइप लावलेले असतात, त्याची स्वच्छता करावी.
  • रोज वासरांना सुमारे १० लिटर, कालवडींना सुमारे २५ लिटर, १५ लिटरपर्यंतच्या दुभत्या गायींना ७० ते ८० लिटर, २५ लिटरपर्यंतच्या दुभत्या गायींना ९० ते १०० लिटर व भाकड गायीला रोज सुमारे ४० लिटर पाण्याची गरज असते.
  • वासरू ते गाय

  • दुभत्या जातिवंत गाई, म्हशींची नवीन पिढी आपल्या गोठ्यावरच तयार करावी. कालवडीचे वजन जितक्या लवकर २४० ते २५० किलो होईल तितक्या लवकर आपण ती माजावर आल्यावर कृत्रिम रेतन करू शकतो. त्यासाठी गाय विल्यानंतर वासराला लगेच चीक पाजावा. वजनाच्या १० टक्के दूध दररोज दोन वेळेस विभागून द्यावे. त्यामुळे वासराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • युरिया युक्त पशुखाद्य किंवा चारा वासरांना वयाच्या सहा महिन्यांपर्यंत देऊ नये. तोपर्यंत त्यांना काल्फ स्टार्टर पशुखाद्य देता येईल, कालवडीचे वजन लवकर वाढावे यासाठी रोज पशुखाद्य, हिरवा व कोरडा चारा, खनिजांचे योग्य प्रमाणात द्यावे.
  • मुक्त संचार पद्धती

  • जनावरांवरील ताण कमी होण्यास मदत होते. माज ओळखणे सोपे जाते. जनावरे कमी आजारी पडतात, कासदाह व इतर आजारांचे प्रमाण कमी होते.
  • दुधामध्ये आनंदी संप्रेरकांचे (हॅपी हार्मोन्स) प्रमाण हे बांधून ठेवलेल्या गाई, म्हशींपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
  • पूर्ण वेळ एकाच जागेवर बांधून ठेवलेल्या गाई, म्हशींच्या दुधामध्ये ताणासाठी कारणीभूत असण्याऱ्या संप्रेरकांचे (स्ट्रेस हार्मोन्स)चे प्रमाण जास्त असल्याचे दिसले आहे.
  • दुभत्या गाई, म्हशींचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

  • जनावरांच्या व्यवस्थापनावरील एकूण खर्चापैकी सुमारे ७० ते ७५ टक्के खर्च हा खाद्य आणि चाऱ्यावर होतो.
  • गाई, म्हशींना त्यांचे वजन, दूध उत्पादनाप्रमाणे व दूध उत्पादनाच्या स्थितीप्रमाणे सर्व खाद्य घटक मिळाले पाहिजेत. पशुखाद्यातील प्रथिने (प्रोटिन्स), तेल (फॅट), वसा (फायबर), कर्बोदके (कार्बो हायड्रेटस), एकूण खनिजे ( टोटल अॅश) ई घटकांचे प्रमाण दूध उत्पादनानुसार ठेवावे. यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरांचे विभाजन करावे.
  • सर्व जनावरांना सारखेच पशुखाद्य दिल्यास खर्चही वाढतो. पोषण व्यवस्थित मिळणार नाही म्हणून गोठ्यातील जनावरांचे गट पाडावेत. यामध्ये १. ताज्या विलेल्या (पहिले ३ महिने), २. मधील काळातील (विल्यानंतर ३ ते ६ महिने व नुकत्याच गाभण झालेल्या) ३. उशिरापर्यंतच्या काळातील (विल्या नंतर ६ ते ९ महिने व गाभण) ४. भाकड (विण्यासाठी शेवटचे ३ महिने बाकी असलेल्या) अशा पद्धतीने विभाजन करावे.
  • संतुलित पशुखाद्य तयार करण्यासाठी पशुआहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. जनावरांना त्यांच्या वजनाच्या ३ ते ३.५ टक्के चारा व खाद्य (कोरड्या पदार्थ स्वरूपात) द्यावे. सुमारे ४०० ते ५०० किलो वजन व १५ते २० लिटर दूध देणाऱ्या गाईला सुमारे ६ ते ७ किलो पशुखाद्य किंवा आंबोण (घरगुती प्रकारचे सरकी, मकाचुनी व इतर कच्चा माल एकत्र करून तयार केलेले पशुखाद्य) विभागून दोन वेळेस द्यावे.
  • चारा (हिरवा व कोरडा)/सायलेज

  • गाई, म्हशींच्या आहारातील चारा किंवा सायलेजचे एकूण प्रमाण सुमारे २०ते २२ किलो व कोरड्या चाऱ्याचे प्रमाण ५ ते ६ किलो इतके ठेवावे. हिरव्या चाऱ्यामधून जनावरांना जीवनसत्त्व ए व ई मिळते. यासाठी मका, डी. एच. एन. ६, नेपिअर, हत्ती गवत यांचा वापर करावा.
  • कोरडा चारा कुट्टी करून द्यावा. कोरड्या चाऱ्यामुळे जनावरे व्यवस्थित रवंथ करतात. दुधामधील फॅट वाढ होण्यासाठी मदत होते. हिरव्या वैरणीचे प्रमाण वाढल्यास काही वेळा शेण पातळ होण्याची तक्रार वाढते.
  • पशुखाद्य पुरके ऊर्जेसाठी बायपास फॅट तसेच प्रजननासाठी कॅल्शियम व इतर नैसर्गिक खनिजे, योग्य पचनासाठी रुमेन बफर व यिस्ट कल्चर, अॅसिडीटी रेगुलेटर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन तसेच दूध वाढ आणि पान्हा सुटण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचे अर्काचा समावेश होतो. पशुतज्ज्ञांच्या सल्यानुसार या पुराकांचे मिश्रण विण्याअगोदर व विल्यानंतर पशुआहारात केल्यास दुभत्या गाई, म्हशी वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास, प्रकृती अंक उत्तम राहण्यास, दिलेल्या चारा व खाद्याचे योग्य पचन होण्यास तसेच दूध व फॅट वाढण्यास मदत होते.

    गाभण आणि भाकड गाई, म्हशींची काळजी

  • गाभण काळातील शेवटच्या महिन्यात गाय, म्हैस दूध देत नाही, या वेळेस ती पुढील वेताची तयारी करीत असते. त्यामुळे या काळातच जर योग्य आहार दिला गेला, तर तिची प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते. शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाशयातील वासराची जास्त वाढ होते, त्यामुळे गाभण काळात प्रथिनांबरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करणेसाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे. यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते.
  • गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते. विल्यानंतर मिल्क फिवर, किटोसीस इत्यादी आजार होत नाहीत. शेवटच्या महिन्यात गाभण गायीला सरासरी ४ ते ५ किलो पशुखाद्य व १०० ग्रॅम बायपास फॅट द्यावे.
  • विल्यानंतर होणारी ऊर्जेची कमतरता

  • विल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत गायी-म्हशींचे दूध वाढत जाते, या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते. या काळातच जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो. कारण दुधावाटे पोषकद्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते, कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते.
  • ऊर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरूपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन गाय, म्हैस वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.
  • संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९६७३९९८१७६ (लेखक ब वर्ग + श्मिट (इंडिया) प्रा. लि., पुणे येथे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com