कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे संकेत..

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.   यापुढे खरीप पिकाची आवक कमी होत राहील. रब्बीचे उत्पादन समाधानकारक असेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात साखर, हळद, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. मका व सोयाबीनचे भाव वाढत होते. चालू वर्षी सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उन्हाळा वाढल्यामुळे तेथील पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने व अमेरिका-चीन वादात अजून फारशी प्रगती नव्हती. फेब्रुवारी महिन्यात मात्र सोयाबीनचे भाव काहीसे उतरते आहेत. सोयाबीन असोसिएशनने या वर्षी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्क्यांनी अधिक असेल, असा अंदाज केला आहे. हरभ-याचा व्यापा-यांकडील साठा कमी होत आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र, शासनाचा साठा भाववाढीवर नियंत्रण करेल. पशुखाद्याची मागणी वाढती आहे. जागतिक अंदाजानुसार या वर्षी जागतिक पातळीवर गहू व कापूस यांचे उत्पादन कमी होईल, तर तेलबिया, मका व सोयाबीन यांचे उत्पादन वाढेल. भारतात गहू आणि सोयाबीन खेरीज इतर सर्वांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे उत्पादन ३१ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या रु. १,५०५ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,११९ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,००८ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७४८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७९५ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १२ फेब्रुवारी रोजी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,७८६, ३,८१५, ३,८५०, ३,८८५, ३,९२० व ३,९५५ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,३३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५७९ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.८ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५२८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे. गहू गव्हाच्या (मार्च २०१९) किमती १७ जानेवारीपर्यंत घसरत रु. २,०७७ पर्यंत आल्या. नंतर त्या काहीशा वाढत होत्या. मात्र, या सप्ताहात त्या ७.२ टक्क्यांनी घसरून रु. १,९६० वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ११.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८५०). रबी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा जवळ असतील. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१ व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२३१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४३). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). या सप्ताहात त्या रु. ४,२०९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४८). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या.(रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या रु. २०,५४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,३४० वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र, निर्यात मागणी वाढली, तर ही घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com