सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या किमतीत वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या किमती वाढल्या, सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हळद यांचे भाव घसरतील. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या माॅन्सून हंगामाचे चित्र देशात बरेच आशादायी आहे. १ जून ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत पडलेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी होता. देशाच्या एकूण ३६ विभागांपैकी २३ विभागांमध्ये तो सरासरीच्या आसपास होता. सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, प. बंगाल, झारखंड, बिहार, प. राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, मराठवाडा, रायलसीमा व उत्तर मध्य कर्नाटक येथे झाला. सरासरीपेक्षा फार कमी पाऊस कोठेच झाला नाही. सरासरीपेक्षा अधिक पाऊस केरळात झाला. या अनुकूल पावसामुळे पीक परिस्थिती चांगली असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. खरीप मक्याचे उत्पादन गेल्या वर्षी २०.२४ दशलक्ष टन होते; ते वाढून या वर्षी २१.४७ लाख टन होईल, अशी अपेक्षा आहे. सोयाबीनसुद्धा १०९.८१ वरून १३४.५९ दश लक्ष टनांपर्यंत वाढेल, असा शासनाचा अंदाज आहे. कापसाचे उत्पादन मात्र गुजरात व सौराष्ट्रमधील कमी पावसामुळे घसरेल, असे दिसते. अर्थात, पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल, असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. रबी पिकांचे हमी भाव अजून प्रकाशित झाले नाहीत. पण, ते वाढीव असतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारत त्याचा फायदा कसा घेईल, यावरसुद्धा पुढील काही महिन्यांतील किमती अवलंबून आहेत.

१ ऑक्टोबरपासून एनसीडिएक्समध्ये फेब्रुवारी २०१९ च्या डिलिवरीसाठी खरीप मका, गहू व गवार बी यांचे, मार्च २०१९ डिलिवरीसाठी सोयाबीन व हरभरा यांचे आणि मे २०१९ डिलिवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्ये मार्च २०१९ डिलिवरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू झाले. पुढील काही दिवस सणामुळे मागणी वाढेल. अजून आवकेचा हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या किमती वाढल्या, सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हळद यांचे भाव घसरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम घसरत होत्या (रु. १,४२४ ते रु. १,३५७). नंतर त्या वाढत महिन्याअखेर रु. १,३९० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या रु. १,३८० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३६७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३८९ वर आहेत. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,४६५ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,०३६ ते रु. ३,१३९). या सप्ताहात त्या रु. ३,१२१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१२९ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,२३३ व रु. ३,३६७ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या घसरून रु. ३,१८४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,१४५ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर रोजी डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,२३३, ३,२९२ व ३,३९३ भाव होते.

हळद हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर)च्या किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ६,९२४ ते रु. ६,६५२). या सप्ताहात त्या रु. ६,७६६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९०० वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५१०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू गव्हाच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम वाढत रु. २,०६० पर्यंत गेल्या; नंतर त्या महिना अखेर रु. २,०४२ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या रु. २,०५१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०१८ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०७७). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४८० ते रु. ४,३२५). या सप्ताहात त्या रु. ४,३२५ वर स्थिर आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४५०).

हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,९७१ व रु. ४,१३६ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,११० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१२६ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.३ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१४०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सणामुळे या पुढील दिवसांत मागणी वाढेल.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. २२,९३० ते रु. २१,८७०). या सप्ताहात त्या रु. २१,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,०९५ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,०२० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीनने भारताकडून होणारी आयात रद्द केली आहे. त्याचप्रमाणे या वर्षी जागतिक उत्पादन आणि वर्ष-अखेर साठा वाढणारा असेल, असा अंदाज सप्टेंबर महिन्याच्या यूएसडीए अहवालात व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे सध्याची घसरण होत आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com