हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ - उतार

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढले. हरभरा ४.१ टक्क्याने घसरला. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत हळद व हरभरा यांचे भाव घसरतील. इतर शेतमालाचे भाव वाढतील.

नोव्हेंबरपासून खरीप पिकांची आवक सुरू होईल. सध्या सणामुळे सर्वच वस्तूंची मागणी वाढत आहे.आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीत सुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारतास त्याचा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. हरभऱ्याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम घसरत होत्या (रु. १,४२४ ते रु. १,३५७). नंतर त्या वाढत महिन्याअखेर रु. १,३९० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्याने वाढून रु. १,४८४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,४७७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४९३ वर आहेत. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव ०.२ टक्क्यांनी वाढून रु. १,५३८ वर आला आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). मागणी चांगली आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.

साखर साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,०३६ ते रु. ३,१३९). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने वाढून रु. ३,१६० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१२८ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१६० वर आल्या आहेत. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,२३३ व रु. ३,३६७ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घटून रु. ३,२४५ वर आल्या होत्यां. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,३३३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,३४० वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ३० ऑक्टोबर रोजी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३७८, ३,४२२, ३,४७७ व ३,५२२ भाव होते. पुढील काही दिवस भाव वाढण्याची शक्यता आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर)च्या किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ६,९२४ ते रु. ६,६५२). गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,६०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ६,८१२ वर आल्या आहेत. आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०६६ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५९८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पुढील काही दिवस भाव वाढण्याची शक्यता आहे.

गहू गव्हाच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम वाढत रु. २,०६० पर्यंत गेल्या; नंतर त्या महिनाअखेर रु. २,०४२ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या रु. २,०४१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०३२ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०९८). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४८० ते रु. ४,३२५). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी घटून रु. ४,६२० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,६२७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपर) किमतींपेक्षा जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,८०७). किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,९७१ व रु. ४,१३६ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,१३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घटून रु. ३,९६० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०३६ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.१ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. ४,०५७). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किंमतीत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किंमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. २२,९३० ते रु. २१,८७०). गेल्या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. २२,७१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घटून रु. २२,३९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,४४८ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,७७० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी चीन भारतावर अधिक अवलंबून असेल असा अंदाज आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोच्या गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com