कापूस, हरभऱ्याची मागणी वाढती

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हरभरा यांचे भाव उतरले. इतर शेतमालाचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील निवडणुका संपल्यावर तिचा जोर वाढेल, अशी अपेक्षा आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सप्ताहात अमेरिकेचे व चीनचे अध्यक्ष यांच्यात ९० दिवसांसाठी तह झाला. या कालावधीत ही दोन्ही राष्ट्रे आयातीवर अधिक कर लादणार नाहीत, असे ठरले आहे. चीननेही अमेरिकेकडून या ३ महिन्यांत आयात करण्याचे कबूल केले आहे. यामुळे सोयाबीन व इतर वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय किमतींत वाढ होण्याची शक्यता आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनात या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. १ डिसेंबरपासून एप्रिल २०१९ डिलिवरीसाठी रबी मका, खरीप मका, गहू व गवार बी यांचे, मे डिलिवरीसाठी कापूस, सोयाबीन व हरभरा यांचे आणि जुलै डिलिवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका नवीन रब्बी मक्यासाठी (एप्रिल २०१९) १ नोव्हेंबरपासून व्यवहार चालू झाले आहे. खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १,६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यात बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७१५ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). हमी भावात व बाजारातील किमतीत फारसा फरक नाही. मागणी चांगली आहे.

साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३,१६१ ते रु. ३,०१०). या सप्ताहात त्या रु. ३,००० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९९० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण, एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,५१५ ते रु. ३,३७७). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,३६२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४२३ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे.(गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ४ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३६२, ३,४१०, ३,४६५ व ३,५२० भाव होते.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६,४४८ व रु. ६,७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,४२८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०६९ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७८६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पण, सध्या साठा पुरेसा आहे.

गहू गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २,०६४ ते रु. २,१४०). या सप्ताहात त्या रु. २,११३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०९३ वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१४). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६९७ ते रु. ४,३५४). या सप्ताहात त्या रु. ४,४५१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५४६). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०७७ ते रु. ४,७०४). या सप्ताहात त्या रु. ४,६३३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६९०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या रु. २२,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,२९५ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,५५० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल, असा अंदाज आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com