कापसाचा लांबवरचा कल वाढता

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस वगळता सर्व वस्तूंचे भाव उतरले. मक्याचे भाव स्थिर राहिले. मुख्यतः आवक वाढल्याचा हा परिणाम होता. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे, हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनांत या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १,६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यांत बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७२१ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). हमीभावात व बाजारातील किमतीत फारसा फरक नाही. मागणी चांगली आहे.

साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३,१६१ ते रु. ३,०१०). या सप्ताहात त्या रु. २,९९० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९८४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण, एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,५१५ ते रु. ३,३७७). या सप्ताहातसुद्धा त्या ०.६ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,३४३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४०९ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३४३, ३,३८३, ३,४४०, ३,४९७ व ३,६५२ भाव होते.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६,४४८ व रु. ६,७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,५६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०१५ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७८६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पण, सध्या साठा पुरेसा आहे.

गहू गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २,०६४ ते रु. २,१४०). या सप्ताहात त्या रु. २,१०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०८९ वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१५). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६९७ ते रु. ४,३५४). या सप्ताहात त्या रु. ४,४०८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०० वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५१०). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०७७ ते रु. ४,७०४). या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६२१). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या.(रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. २२,४६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,६२५ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,९२० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com