शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार उलाढाल झाली नाही. त्यामुळे एकूणच मंदी होती. याचा परिणाम म्हणून आपल्याकडेसुद्धा या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू वगळता सर्व वस्तूंचे भाव उतरले. मक्याच्या भावात ६ टक्क्यांनी वाढ झाली; ही वाढ स्थानिक मागणीतील वाढीमुळे झाली. गव्हातील वाढ अल्प प्रमाणात व हंगामी स्वरुपाची आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.   सध्या खरीप पिकाची आवक सुरू झालेली आहे. बाजारभाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गम च्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती कमी गेल्या महिन्यात कमी होत होत्या. तोच कल या सप्ताहात दिसत आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १,६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यांत ६.१ टक्क्यांनी वाढून भाव रु. १,६९७ वर पोचले. स्पॉट किमती (सांगली) ६.३ टक्क्यांनी वाढून रु. १,८५७ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रबीचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा आहे. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३,१६१ ते रु. ३,०१०). या सप्ताहात त्या रु. २,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९७९ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण एकूण कल घसरणीचा आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,५१५ ते रु. ३,३७७). या सप्ताहात त्या एक टक्क्यानी घसरून रु. ३,३३० वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४१३ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. २४ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३३०, ३,३७२, ३,४१२, ३,४४० व ३,४६८ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६,४४८ व रु. ६,७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या महिन्यात त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,५५८ वर आल्या आहेत. आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०४० वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,८०८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. गहू गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २,०६४ ते रु. २,१४०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. २,१२८ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२००). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६९७ ते रु. ४,३५४). गेल्या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२६७ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२२९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३४७). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०७७ ते रु. ४,७०४). गेल्या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,४९३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ४३५३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३३२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५२५). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रबीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,९३० ते रु. २१,७१०). गेल्या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.९ टक्क्यांनी घसरून रु. २०,९४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,६३० वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,५४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे.(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठ).   arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com