शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

सोयाबीन, हळदीमध्ये वाढीचा कल

गेल्या सप्ताहात सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव चढले होते. याही सप्ताहात त्यांनी हा वाढीचा आलेख कायम ठेवला. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रबी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात २३ तारखेपासून घसरत होत्या.(रु. १,४०४ ते रु. १,३७८). या सप्ताहात त्या किंचित ०.१ टक्क्यांनी घसरून रु. १,३६३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३५८ वर स्थिर आहेत. फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती रु. १,३७८ वर आल्या आहेत. हमी भाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता.

या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी चांगली आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती १७ ऑक्टोबरपासून घसरत होत्या. (रु. ३,४१० ते रु. ३,३१०). या सप्ताहात त्या पुन्हा १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,२३१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,४६५ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२३१ वर आल्या आहेत.

सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३०६.७ दशलक्ष टन).

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ३ ऑक्टोबरपासून सतत घसरत आहेत. (रु. ३,०४९ ते रु. २,८२३). गेल्या सप्ताहात मात्र त्या ३.१ टक्क्यांनी वाढल्या होत्या. याही सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु. २,९९२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,९७९ वर वाढल्या आहेत. मार्च २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,१८७ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे.

खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेंटिनामधील कोरडी हवा तेथील उत्पादनावर विपरीत परिणाम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. सोया पेंडीच्या निर्यातीतसुद्धा वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात सतत घसरत होत्या (रु. ७,४०९ ते ७,०५६). गेल्या सप्ताहात मात्र त्या ३.४ टक्क्यांनी वाढल्या होत्या. याही सप्ताहात त्या ७.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,७०८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,७०९ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,७००). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र निर्यात्त व देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

गहू ऑक्टोबर महिन्यात गव्हाच्या (डिसेंबर २०१७) किमती वाढत होत्या. (रु. १,६५६ ते रु. १,७५६). या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी घसरून रु. १,६७४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८३७ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,७४२). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५० ते रु. ३,६१३). या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,८७३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,९३१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०१८). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे. किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा ऑक्टोबर महिन्यात हरभ-याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती सतत घसरत होत्या (रु. ५,४१७ ते ४,७०६). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,८९७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,८०० वर उतरल्या आहेत. उत्पादन वाढीच्या अपेक्षेने मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा १४.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,२५१). एप्रिल डिलिवरीचा सध्याचा भाव रु. रु. ४,२८० आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात रु. १७,९५० व रु. १८,५३० या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १८,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,०६६ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.१९,०००).

प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती मर्यादित प्रमाणात घसरण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com