केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना

आंबा मोहोराच्या विविध अवस्था.
आंबा मोहोराच्या विविध अवस्था.
  • सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी चांगले आहे. बहुतांश आंबा बागांमध्ये फळधारणा चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्ण वाढलेल्या केसर आंबा झाडास एक हजारापर्यंत मोहोरतुरे असतात, तर प्रत्येक तुऱ्याला ५००-६०० फुले असतात. यामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण २७ टक्के असते. संयुक्त फुलापासूनच फलन होऊन इतर नरफुले गळून पडतात.
  • * यावर्षी अधुनमधून येणाऱ्या थंडीचे प्रमाण जादा राहिल्याने केसर आंबा झाडांमध्ये पुनर्मोहराची प्रक्रिया वेगाने सुरू राहिली. पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोहोरामुळे झाडाकडून पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचे विभाजन होते. त्याचा प्रवाह नवीन मोहोराकडे अधिक होते. परिणामी, आधीच्या मोहराची फळे गळून पडतात. यावर्षी फळगळ होण्याचे हेही मुख्य कारण दिसते.
  • यावर्षी आंबा झाडांना उशिरा मोहोर आला. त्यात तापमानामध्ये वाढ झाल्याने केसर आंबा झाडामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. परिणामी, उत्पादन जास्त येण्याची शक्‍यता दिसते. भविष्यात हवामान संतुलित राहिल्यास निश्‍चितच उत्पादन वाढीस हातभार लागेल.
  • आंबा फळपिकात परपरागीकरण होते. ४०-५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण न होता फक्त अंडाशय वाढून गळ होताना दिसून येत आहे. यामुळे अनावश्‍यक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. मधमाश्यांसह मित्र कीटकांचे संवर्धन केल्यास परपरागीकरण चांगले होईल. त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होईल.
  • आंबा फळपिकात आवश्‍यकतेपेक्षा जास्त फळधारणा झाल्यास संपूर्ण फळांना पोसण्याची क्षमता झाडामध्ये नसते. यामुळेही फळगळ होत असते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) ची फवारणी फळे वाटाणा, गोटी, अंडा अवस्थेत असताना करावी.
  • बहुतांश ठिकाणी सद्यःस्थितीत आंबा फळे वाटाणा ते गोटी आकाराची आहेत. त्यांची वाढ होण्यासाठी व गळ थांबविण्यासाठी पाण्याची गरज असेल. दर पंधरवड्यातून पाण्याची पाळी योग्य प्रमाणात द्यावी. पाण्याचे संतुलन साधले गेल्यास फळ गळ टाळता येईल.
  • आंबा फळे दोन-तीन आठवड्यांची असताना फळांमध्ये इथिलीनचे प्रमाण जादा असते. त्यामुळेही सुरवातीच्या काळात फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. तीन आठवड्यानंतर निसर्गतः फळातील इथिलीनचे प्रमाण कमी कमी होत गेल्याने फळगळ कमी होत थांबल्याचे दिसून येते.
  • कुठल्याही फळझाडांमध्ये फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्याची गरज असते. अन्नद्रव्यांची मात्रा कमी पडल्यास फळांची वाढ खुंटते. परिणामी फळगळ होण्यास सुरवात होते. म्हणून कीटकनाशकांच्या फवारणीसोबत २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी झाडास वाटाणा आकाराची फळे असताना करावी.
  • आंबा फळपिकात फळांच्या वाढीसाठी ऑक्‍झीन या गटातील संजीवकांची गरज असते. जर झाडामध्ये संजीवकांची कमतरता असेल तर मोठ्या प्रमाणावर फळांची गळ होते. म्हणून फळे वाटाणा आकाराची असताना २० पीपीएम (२० मिलीग्रॅम प्रतिलिटर पाणी) नॅप्थॅलिक ॲसेटिक ॲसिड (एनएए) या संजीवकाची फवारणी करावी.
  • आंबा या फळपिकास फळधारणा झाल्यानंतर तापमानात अचानक जास्त वाढ झाल्यास फळगळीचे प्रमाण वाढते. अशावेळी बागेस पाण्याची व्यवस्था करावी. बागेचे तापमान कमी होऊन फळगळ टाळण्यास मदत होते.
  • बऱ्याच वेळी कीड रोगामुळेही फळगळ होते. भुरी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव त्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाण इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मिली अधिक सल्फर (८० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम. (प्रखर सुर्यप्रकाशात सल्फऱचा वापर टाळावा.)
  • टीप ः  इमिडाक्लोप्रीड चा वापर फुलोरा अवस्थेत करु नये.
  • डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२ (केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com