संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणे

संत्रा बागेत फळगळीचे कारण ओळखून वेळीच उपाय योजना करावी
संत्रा बागेत फळगळीचे कारण ओळखून वेळीच उपाय योजना करावी

संत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती, पाण्याची आणि मूलद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, किडी व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे फळांची गळ होते. खत, पाणी आणि कीडरोगाचे योग्यरीत्या व्यवस्थापन केले तर ही फळगळ थांबविणे शक्य होते.   संत्रा, मोसंबी फळझाडांना विशिष्ट वेळी बहार येण्याकरिता बहार धरण्यापूर्वीची आणि बहार टिकविण्याकरिता नंतरची परिस्थिती कारणीभूत असते. आपल्याकडील हवामानाचा विचार केल्यास संत्रा, मोसंबीला तीन वेळा बहार येतो. परंतु संत्रा, मोसंबीचे मुख्यतः दोनच बहार घेण्यात येतात. १. मृग बहार २. आंबिया बहार. मृग बहारात साधारणतः जून-जुलै तर आंबिया बहारात जानेवारी – फेब्रुवारी महिन्यामध्ये फूलधारणा होते. फूलधारणेपासून फळ काढणीचा कालावधी साधारणतः नऊ महिन्यांचा असतो. संत्रा, मोसंबी मध्ये अंदाजे ६० टक्के फुले आंबिया बहारात, ३० टक्के फुले मृग बहारात तर १० टक्के फुले सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात हस्त बहारात झाडावर येतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, आंबिया बहारात एका झाडावर सरासरी ३०,००० फुलांपैकी ७८ टक्के फुलांची फळधारणा झाली व यापैकी शेवटपर्यंत फक्त ४ टक्के फळे टिकून राहिली. मृग बहारात आलेल्या १५,००० फुलांपैकी फक्त ७६ टक्के फुलांची फळ धारणा झाली व यापैकी शेवटपर्यंत ५ ते ५.५ टक्के फळे झाडावर टिकून राहिली. यावरून असे दिसून येते की, आंबिया बहारात जरी मृग बहारापेक्षा दुप्पट फुले येत असली तरी शेवटी फारच कमी फळे झाडावर टिकून राहतात. नैसर्गिक फळगळ आंबिया बहारामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्णतामानात एकदम वाढ होऊन फळे गळतात. शिवाय दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात या काळात जास्त फरक असल्यामुळे फळांची गळ जास्त होते. -संत्रा, मोसंबी झाडावर निसर्गतः आवश्यकतेपेक्षा जास्त फुले येतात व फळे टिकून राहण्याकरिता त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते. जेवढ्या फळांना झाडावर पोसण्याची क्षमता त्या झाडात असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या फुलांची व फळांची गळ होत असते. वातावरणाचा परिणाम संत्रा, मोसंबी मध्ये तापमान, आर्द्रता आणि वारा ह्या बाबी फळगळीस कारणीभूत ठरतात. मागील काही वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आंबिया बहाराच्या फळांची गळ होते. तापमानासोबतच हवेतील आर्द्रता सुद्धा फळ गळीस कारणीभूत ठरते. अनियमित पाणीपुरवठा फळ धारणा झाल्यानंतर झाडांना नियमित पाणी न दिल्यास फळांची गळ होते. आंबिया बहाराची फळे टिकविण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असली तर फळगळ होऊ शकते. तसेच जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्यास सुद्धा फळगळ होते. बागेचे व्यवस्थापन संत्रा, मोसंबी बागेस पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते. त्याचप्रमाणे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात तसेच चुकीच्या पद्धतीने झाडाला पाणी दिल्यास फळगळ होते. बऱ्याच बागांमध्ये सल काढण्यात येत नाही. सल न काढल्यास त्यावर बुरशीची वाढ होऊन फळ गळीस कारणीभूत ठरते. अशा बागेत फळे काढल्यानंतर फळांची सड लवकर होते. किडी व रोग किडी व रोगांमुळे खूप मोठ्या प्रमाणात फळगळ आढळून येते. आंबिया बहाराची फळे, रस शोषण करणाऱ्या पतंगांमुळे ऑगस्ट – ऑक्टोबर या महिन्यात गळतात. हि फळे दाबून पाहिल्यास त्याला छिद्र पडलेले दिसते आणि त्यातून रसाची चिरकांडी उडते. काही फळे बुरशीमुळे (उदा. फायटोप्थोरा, कोलोटोट्रीकम, अल्टरनेरीया) गळतात. अल्टरनेरीया बुरशीची फुलांच्या बिजांडावर लागण होऊन फळ काढणीच्या अवस्थेत आल्यावर फळांची गळ होते. अशा फळांचे दोन भाग केल्यास फोडीजवळ काळा पट्टा आढळतो. अन्नद्रव्यांची कमतरता काही बागांमध्ये फळधारणा चांगली झाल्यानंतर सुद्धा फळांची गळ होते. खूप कमी फळे झाडावर शिल्लक राहतात व फळांची प्रत चांगली राहत नाही. झाडांची फळधारणा व ती टिकून ठेवण्याची क्षमता या बाबी जमिनीचा मगदूर आणि अन्न द्रव्यांची उपलब्धता यावर अवलंबून असते. जमिनीत चुना व जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणावर फळगळ होते. संजीवकांचा अभाव झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळगळीमुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. ही फळगळ वेळीच उपाय योजना करून थांबविणे आवश्यक असते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com