जनावरांच्या खाद्यात टाळा बुरशीचा प्रादुर्भाव

जनावरांच्या खाद्यात टाळा बुरशीचा प्रादुर्भाव
जनावरांच्या खाद्यात टाळा बुरशीचा प्रादुर्भाव

बऱ्याच वेळेस डोळ्यांना न दिसणारी बुरशी किंवा अफ्लाटाॅक्सीन युक्त चारा अनावधानाने जनावरांना खायला दिला जातो. त्यामुळे जनावराचे आरोग्य धोक्यात येते. अशा गाईचे दूध आहारात वापरणाऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा याचे घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या बुरशीयुक्त आहारापासून जनावराचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल व चांगल्या दर्जाच्या दुधाचे उत्पादन कसे घेता येईल याबाबत माहिती असायला हवी.   दुधाळ जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळावे यासाठी जनावरांना चांगल्या गुणवत्तेचा चारा व पशुआहार दिला जातो. असा आहार देत असताना त्यामध्ये जनावरांना अपायकारक असा कोणताही घटक जात नाही याची आपण सातत्याने काळजी घेत असतो. परंतु बरेच असे घटक आहेत जे आहारातून जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात ज्याची आपल्याला माहिती नसते. यामध्ये प्रामुख्याने बुरशीयुक्त आहार हा महत्वाचा घटक आहे.

अफ्लाटाॅक्सीन म्हणजे काय?

  • जनावरांचा चारा किंवा पशुखाद्याचा कच्चा माल किंवा पशुखाद्यामध्ये जास्त आर्द्रता असेल व जास्त तापमानामुळे खाद्यामध्ये जास्त प्रमाणात बुरशी निर्माण होते. यामध्ये बऱ्याच प्रकारच्या बुरशीचा समावेश असतो परंतु अॅस्परजीलस फ्लेवस व अॅस्परजीलस पेरासीटीकस या जातीच्या बुरशी जास्त प्रमाणात असतात ज्या मायकोटोक्सीन नावाचा विषारी पदार्थ तयार करतात.
  • मायकोटाॅक्सीन मुळे मायकोटाॅक्सीकोसिस नावाचा आजार होतो. या मायकोटाॅक्सीन एक प्रकार म्हणजे अफ्लाटाॅक्सीन होय.
  • मायकोटाॅक्सीन बरेच प्रकार असून त्यात प्रामुख्याने अफ्लाटाॅक्सीन, झियारेलेनोन, ट्राइकोथेक्नेस, फ्यूमोनिसिन, ओचराटॉक्सिन ए आणि एर्गोटा ऍलॅलॉइड असे प्रकार आहेत.
  • वरीलपैकी आपल्याकडे आढळणाऱ्या बुरशीमध्ये अफ्लाटाॅक्सीन बुरशी जास्त प्रमाणात दिसून येते. अफ्लाटाॅक्सीन बुरशीचे बी-१ ,बी-२, जी-१, अाणि जी-२ असे चार प्रकार अाहेत यापैकी अफ्लाटाॅक्सीन बी-१ प्रकारची बुरशी महत्वाची आहे.
  • खाद्यामध्ये बुरशी कशी तयार होते ? १) पेंड

  • जनावरांच्या अाहारात शेंगदाणा पेंड, सरकी पेंड , सोयाबीन पेंड अशा विविध प्रकारच्या पेंडी वापरल्या जातात.
  • पेंडीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने, पेंड तयार करत असताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालामध्ये बुरशी असेल तर पेंडीमध्येही बुरशी तयार होते.
  • कच्च्या मालावर प्रक्रिया झाल्याने व टायचे पेंडीत रुपांतर झाल्याने डोळ्याने बुरशी दिसत नाही. परंतु प्रयोग शाळेत असे नमुने तपासले तर त्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीपासून तयार होणारे आफ्ला-टोक्सीन हे जास्त प्रमाणात असू शकते.
  • २) मका भरडा

  • पशुखाद्याबरोबर जनावरांना भुसा किंवा मक्याचा भरडा दिला जातो.
  • मका चांगल्याप्रकारे वळवलेला नसेल किंवा मक्यामध्ये १३ ते १४ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास अशा मक्याच्या देठाकडील भागाकडे बुरशीची वाढ होते काही दिवसाने हा भाग काळा पडतो. या काळ्या भागामध्ये अफ्लाटाॅक्सीनचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारचा मका भरडून जनावरांना आहार दिला जातो.
  • ३) सुका चारा

  • वाळलेला चारा पावसाळ्यात पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून झाकून ठेवला जातो. परंतु चारा पूर्णपणे झाकून ठेवला जात नाही त्यामुळे बाजूने चारा भिजतो व अशा भिजलेल्या चाऱ्यामध्ये नंतर बुरशी तयार होते.
  • बुरशीची वाढ झाल्यानंतर आफ्ला-टोक्सीन नावाचा विषारी पदार्थ तयार होतो त्यामुळे चारा काळा पडतो.
  • काहीवेळा चाऱ्याचा काळपट भाग वेगळा करून चांगला भागच जनावरांना खायला दिला जातो. परंतु काळपट भाग काढून टाकला तरी चाऱ्याच्या आतील बाजूस सुद्धा पाणी गेले असल्यामुळे या बाहेरून न दिसणाऱ्या भागात सुद्धा अफ्लाटाॅक्सीन असते.
  • ४) ओला चारा

  • २ ते ४ दिवसाचा हिरवा चारा साठवून ठेवला असेल तर अशा चाऱ्याच्या आतील भाग हा उष्ण होऊन काही वेळाने त्यात बुरशी तयार होते.
  • यातून जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
  • बुरशीचे जनावरांवर होणारे घातक परिणाम

  • बुरशीपासू तयार होणारे अफ्लाटाॅक्सीन हे जनावराच्या तसेच मानवी आरोग्यास सुद्धा घातक आहे. यामुळे बऱ्याच प्रकारचे आजार जनावरांना होत असतात.
  • घातक विषारी पदार्थाचे अंश दुधात येऊन असे दूध सेवन करणाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो.
  • अफ्लाटाॅक्सीन च्या सततच्या आहारात येण्याने जनावरे आजाराला बळी पडतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जनावराचे दूध उत्पादन घटते व दुधाची गुणवत्ता घसरते.
  • जनावराच्या आहारातून अफ्लाटाॅक्सीन जास्त प्रमाणात गेल्यास जनावराच्या पचनक्रीयेवर ताण येतो. पचनाचे काम मंदावते. जनावर चारा खात नाही. त्यामुळे पुढील समस्या उद्भवतात.
  • अ. दूध उत्पादन घटते

  • आहाराचे प्रमाण कमी झाल्याने दूध उत्पादन कमी होते. दूध उत्पादन क्षमता असतानाही जनावरे फक्त अफ्लाटाॅक्सीनचे आहारातील प्रमाण वाढल्याने आवश्यक ते दूध उत्पादन देऊ शकत नाहीत.
  • अफ्लाटाॅक्सीन निर्माण करणारी बुरशी बऱ्याच वेळेस डोळ्याने दिसत नसल्याने नेमके दूध उत्पादन कशाने घटले आहे याचे निदान पशुपालकांना लवकर होत नाही.
  • ब. दूध गुणवत्ता खालावते

  • ज्याप्रमाणे दूध उत्पादन कमी होते त्याप्रमाणे दुधाची गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक खुराक उपलब्ध न झाल्याने दुधाची गुणवत्ता सुद्धा हळूहळू खालावते.
  • जनावरास सर्व आवश्यक घटक नियमितपणे देऊन सुद्धा अपेक्षित दुधाची गुणवत्ता मिळत नाही.
  • अफ्लाटाॅक्सीनचे आहारातून जाणारे प्रमाण जर वाढले तर आतड्याच्या आतील बाजूस सौम्य प्रमाणात रक्तस्राव होतो. त्यामुळे आहारातून आलेल्या महत्त्वाच्या अन्नघटकाचे शोषण होण्यास अडचण निर्माण होते.
  • चांगले खाद्य जनावरास खायला घालून सुद्धा त्याचे शोषण व्यवस्थितपणे न झाल्याने आपणास पुरेपूर अपेक्षीत दूध उत्पादन मिळत नाही.
  • मज्जासंस्थावेर परिणाम होतात. जनावराच्या शरीराचे तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा ही व्यवस्थित कार्य करत नाही. काही जनावरांना फिट सुद्धा येऊ शकते.
  • जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. त्यामुळे जनावर वारंवार इतर घातक जीवजंतूना बळी पडून आजारी पडण्याचा धोका वाढतो.
  • वातावरणातील कमी अधिक बदल सहन करण्याची त्यांची शक्ती कमी होते. यामुळे प्रामुख्याने कासेचे आजार वाढतात.
  • जनावरे शक्यतो अनियमित माज दाखवतात. माज दाखवलाच तर तो जास्त वेळ दाखवतात व उलटण्याचे प्रमाण वाढते.
  • मादी जनावराच्या बीज कोषात गाठी तयार होतात. गाभण जनावराचा गर्भपात होण्याची शक्यता असते. नर जनावरांपासून कमी वीर्य निर्मिती होते.
  • खुरांचे आजार जडतात व जनावरांना लंगडेपणा येऊ शकते.
  • संपर्क ः धर्मेंद्र भल्ला, ०२१६६- २२१३०२ (गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्ट्स, फलटण, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com