गायकवाडवाडी झाली पेरू बागांसाठी प्रसिद्ध

गायकवाडवाडीतील दादा कोळपे यांनी पिकवलेले उत्तम गुणवत्तेचे पेरू
गायकवाडवाडीतील दादा कोळपे यांनी पिकवलेले उत्तम गुणवत्तेचे पेरू

पुणे शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवरील गायकवाडवाडी पेरूच्या बागांसाठी प्रसिद्ध झाली आहे. ठिबक सिंचन, मिडो ऑर्चर्ड, शेततळी, लागवडीचे योग्य नियोजन व विक्री व्यवस्था भक्कम करून येथील शेतकऱ्यांनी हे पीक आर्थिकदृष्ट्या यशस्वी केले आहे.   पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील गायकवाडवाडीची एक ते दीड हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. भौगोलिक क्षेत्र ८०० ते १००० हेक्टर आहे. पैकी ४००-५०० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भौगोलिक हवामान, माती, पाण्याची कमतरता, पुण्याची जवळची बाजारपेठ या बाबी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना पेरू हे फळपीक व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरले आहे. आज हे गाव खास पेरूसाठीच ओळखले जाते. पेरूकडे वाटचाल तसा गावाला पेरू पिकाचा जुना इतिहास आहे. गावातील प्रगतिशील शेतकरी नाथू मोडक यांनी २५ वर्षांपूर्वी सरदार वाणाची एक एकरांत २० बाय २० फुटांवर लागवड केली होती. त्यांनी नेटक्या व्यवस्थापनातून व परिश्रमातून हे पीक फायदेशीर करण्यास सुरुवात केली. उत्पादन व उत्पन्नाचे गणित जुळू लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना त्यांची प्रेरणा मिळाली. हळूहळू २० ते २५ शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला. मागील पाच ते सहा वर्षांत गावात पेरूच्या मोठ्या प्रमाणात बागा फुललेल्या दिसून येतात. पुणे हे त्यासाठी सक्षम मार्केटही त्यांना मिळाले आहे. पेरूचे क्षेत्र वाढले आज कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेद्वारे जलसंधारण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, शेतकरी गट, थेट विक्री असा योजना गावात राबविण्यास सुरुवात झाली. सरपंच ताराबाई केरबा मोडक, उपसरपंच दिलीप सर्जेराव गायकवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य मच्छिंद्र गायकवाड यांच्यासह प्रगतिशील शेतकऱ्यांनी या योजनांना बळ दिले. त्यामुळे गावात सीताफळाबरोबर पेरू क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांनी जवळपास ३० ते ४० एकरांवर पेरूची लागवड केली असावी. यामध्ये नाथू मोडक, हिरामण मोडक, सोमनाथ मोडक, दादासाहेब कोळपे, भाऊसाहेब कोळपे, किसन कोळपे, पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब मोडक आदींकडे पेरूच्या बागा आहेत. वाणांची जपलेली विविधता

  • जे विलास- दिसायला आकर्षक, चवीला कमी गोड, गर कमी व बिया जास्त, टिकवण क्षमता कमी
  • लखनौ सरदार ४९- दिसायला आकर्षक, चवीला गोड, गर जास्त, बिया कमी, टिकवण क्षमता जास्त
  • बाटली गुलाबी- गोडीला कमी, साखरेचे सेवन कमी करणाऱ्या ग्राहकांकडून मागणी, टिकवण क्षमता सर्वसाधारण
  • ललित- गुलाबी, आकर्षक, चवीला गोड, गर जास्त, बिया कमी, टिकवण क्षमता जास्त
  • पेरू बागेतील तंत्रवापर मिडो ऑर्चिड पद्धतीने लागवड अलीकडील वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानात बदल केला आहे. हलक्या जमिनीत अधिक उत्पादन घेण्यासाठी मिडो ऑर्चिड किंवा कमी अंतरावरील लागवड पद्धतीचा वापर ते करीत आहेत. यात १५ बाय १५ फूट, दहा बाय दहा फूट, सात बाय सात फूट अशा विविध अंतरांवर लागवड आहे. मात्र सात बाय सात फूट अंतरावरील झाडांपासून कमी तर १५ बाय १५ फूट अंतरावरील लागवडीच्या झाडांपासून अधिक उत्पादन मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. आंतरपिके

  • साधारणपणे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. या काळात शेतकरी कांदा, मेथी, चुका, मुळा, शेपू, करडई आदी आंतरपिके घेतात.
  • कमी कालावधीच्या (चार ते पाच महिन्यांत) ५० हजार ते एक लाख रूपयांपर्यत उत्पन्न घेतात.
  • ठिबक व शेततळी अलीकडील पाच ते सहा वर्षांपासून पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवू लागली आहे. बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. मात्र बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मागेल त्याला शेततळे व वैयक्तिक शेततळे या योजनांचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यातून गावात पाच ते सहा शेततळ्यांची उभारणी झाली आहे. उन्हाळ्यात त्यांची मोठी मदत होते. आर्थिक उलाढाल झाडांच्या वयांनुसार एकरी ८ ते १२ टनांपर्यंत उत्पादन येथील शेतकरी घेतात. जागेवर विक्री केल्यास सरासरी प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. सर्वाधिक मागणी लखनौ सरदार या वाणाला आहे. मार्केटमध्ये विक्री केल्यास मात्र दरांची शाश्‍वती नसते. तरीही सरासरी किलोला २० ते ८० रुपये असा दर मिळतो. एकरी खर्च वजा जाता तीन ते साडेतीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. गावात पेरू शेतीतून दरवर्षी सव्वा ते दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असावी. त्यामुळे शेतकरी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. शिक्षण, घरबांधणी यासोबतच दुकानांमध्येही गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. विक्री

  • बाजारपेठा व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन बहराचे नियोजन
  • शेवाळवाडी, हडपसर, उरुळी कांचन, सासवड, फुरसुंगी, पुणे येथील व्यापाऱ्यांना विक्री
  • सर्वाधिक मागणी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत. याच काळात दरही चांगले.
  • काही शेतकरी जागेवरच विक्री करतात.
  • प्रतिक्रिया चौदा एकरांपैकी सहा एकरांवर पेरू आहे. उर्वरित सीताफळ व भाजीपाला आहे. पेरूने आमचे अर्थकारण सक्षम केले आहे. -नाथू फकीरराव मोडक ९५२७९४६६०७ बारा ते १५ वर्षांपासून पेरू उत्पादन घेत आहे. सात एकरांपैकी सहा एकरांवर पेरू आहे. दरवर्षी सुमारे एकरी पाच ते सहा टन उत्पादन मिळते. जागेवरच प्रति किलो ३५ रुपये दराने विक्री केली जाते. या पिकाने माझा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली आहे. - सोमनाथ मोडक पेरूचे एकरी सहा ते सात टन उत्पादन घेतो. गुलटेकडी- पुणे येथील मार्केटमध्ये विक्री करतो. - दादा बाबासो कोळपे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com