जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे यांची प्रयोगशील शेती
बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी बैलचलित सुधारित यंत्राने सोयाबीन टोकण, रब्बी हंगामात शून्य मशागत पध्दतीचा वापर, पाणी व्यवस्थापन, शेडनेटमध्ये संकरित भाजीपाला बिजोत्पादन आदी तंत्रांचा वापर केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी बैलचलित सुधारित यंत्राने सोयाबीन टोकण, रब्बी हंगामात शून्य मशागत पध्दतीचा वापर, पाणी व्यवस्थापन, शेडनेटमध्ये संकरित भाजीपाला बिजोत्पादन आदी तंत्रांचा वापर केला आहे. त्याद्वारे शेतीतील खर्च कमी करणे, वेळ, श्रम, मजुरीत बचत व नफ्यात वाढ या अनुषंगाने किफायतशीर व प्रयोगशील शेतीला चालना दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका सोयाबीन, हरभरा, फलोत्पादन, संकरित भाजीपाला बिजोत्पादनात आघाडीवर आहे. सध्याच्या काळात शेतीत जोखीम वाढली आहे. पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसतो. ती कमी करण्याच्या दृष्टीने अनेक शेतकरी बहुविध पीकपद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. तालुक्यातील माळखेड या छोट्या गावातील उच्चशिक्षित गणेश लक्ष्मणराव लंबे
यांची १८ एकर शेती म्हणजे प्रयोगशाळाच झाली आहे. त्याची भुरळ शेतकऱ्यांसह कृषी खात्यालाही पडली आहे. गणेश आपल्या १८ एकरांत हंगामी, एकवर्षीय पिके आणि संकरित भाजीपाला बीजोत्पादन अशी सांगड घालून शेती करतात. यातून नफ्याच्या शेतीचे सूत्र त्यांना उमगले आहे.
शेतीतील तंत्रांचा वापर
मागील काही वर्षांत विविध कारणांनी सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पादन त्या तुलनेत मिळत नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लंबे कुटुंबाने विचारपूर्वक बदल केले. सोयाबीनची पारंपारिक तिफणीद्वारे किंवा ट्रॅक्टरद्वारे किंवा बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी केली जाते. लंबे दरवर्षी १२ ते १३ एकरांत सोयाबीन घेतात. यंदा १३ एकरांत ठिबकवर त्यांनी केडीएस ७२६ फुले संगम हे वाण घेतले. एकरी सुमारे १३ ते १५ किलो बियाणे लागले. लागवडीचे अंतर दीड फूट बाय सहा इंच ठेवले. मधला पट्टा दीड फुटांचा ठेवला. अर्थात हे सर्व करण्यासाठी स्वतःच्या गरजेनुसार बैलचलीत टोकण यंत्र तयार केले. या यंत्राद्वारे समान अंतरावर दाणे पडतात. शेतात खाडे तयार झालेच तर मजुरांकडून तेथे लावण करून घेण्यात येते. हे यंत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. अनेकजण सोयाबीन लावणीचे हे तंत्र पाहण्यासाठी शेतीला भेट देऊ लागले आहेत. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी देखील सप्टेंबरमध्ये भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
वेळ, श्रम यांच्यात बचत
लंबे सांगतात की प्रचलित पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास एकरी २५ ते ३० किलोपर्यंत बियाणे लागते. परंतु सुधारित बैलचलित टोकण पद्धतीचा वापर केल्याने बियाण्यात एकरी किमान १० किलोची बचत झाली. पिकाची वाढ एकसमान राहिली. खाडे पडले नाहीत. एकरी झाडांची संख्या चांगली राहिली. यंदा एकरी ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. यंदा हवामानाची स्थिती पोषक नव्हती. पर्जन्यमानही चांगले नव्हते. आमच्या भागात अनेकांना एकरी पाच क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळाले नाही. अशा वेळी यंदाचे मला मिळालेले उत्पादन निश्चित चांगले म्हणावे लागेल असेही लंबे यांनी सांगितले.
शून्य मशागत तंत्राचा वापर
लंबे गेल्या तीन वर्षांपासून शून्य मशागत तंत्राचा वापर करतात. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर
विना मशागतीद्वारे रब्बीतले पीक ते घेत आहेत. यंदा त्यांनी रब्बी कांदा बिजोत्पादन व काबुली हरभरा घेतला आहे. या पद्धतीमुळे रब्बीतील पिकाची लवकर लावण करता येते. शिवाय मशागतीचा एकरी किमान २५०० ते ३००० रुपये वाचतो. तसेच वेळ, श्रम व मजुरी यात मोठी बचत करता येते. यंदा बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली असल्याने या संधीचा फायदा घेण्याचा लंबे यांचा विचार आहे. काबुली हरभऱ्याचे त्यांना एकरी साडेनऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला क्विंटलला
साडेसात हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.
पाण्याचे महत्त्व जाणले
जिल्ह्यात काही भागांत लहरी स्वरूपाचा पाऊस होतो. त्यातच पाणी पातळी सातत्याने खोल जात आहे. गणेश यांनी म्हणूनच संरक्षित सिंचनाची व्यवस्था शेततळ्यांच्या माध्यमातून केली आहे.
पन्नास लाख लिटर, १० लाख लिटर क्षमतेची दोन शेततळी व तीन विहिरी आहेत. सोबत तीन किलोमीटरवरील मोहखेड लघुप्रकल्पाला लागून शेतात विहीर खोदली. तेथून जलवाहिनी उभारत पाणी शेतापर्यंत आणले. हे पाणी २५ लाख लिटर क्षमतेच्या सिमेंटच्या टाकीत साठविण्यात येते. वीजपुरवठा सुरू असेल त्यावेळी ही टाकी भरण्याचे काम सुरू असते. दाब प्रणालीचा वापर करून हेच पाणी ठिबकच्या साह्याने पिकांना देण्यात येते.
बिजोत्पादन, फळबागेकडेही लक्ष
गणेश यांनी तीन शेडनेटस उभारले आहेत. पैकी दोन शेडनेटस खासगी कंपनीला करार करून भाडेतत्वावर दिले आहेत. कंपनी त्यात संकरित भाजीपाला बिजोत्पादनाचे प्रयोग घेते. आपल्या एका शेडनेटमध्ये लंबे मिरची, टोमॅटो आदींचे बीजोत्पादन घेतात. ढोबळी मिरचीचे दहा गुंठ्यात १५ किलो तर लांबट मिरचीचे ३० ते ३५ किलो उत्पादन मिळते. किलोला साडेसात हजार ते दहाहजार रुपयांपर्यंत दर त्यांना मिळतो.
फळबाग लागवड
लंबे आता फळबागेकडेही वळले आहेत. दोन वर्षांपूर्वी दोन एकरांत संत्र्याची लागवड केली.
काही आंब्यांची झाडेही लावली आहेत. छाटणी केलेल्या आंब्याच्या झाडावर चांगली फळधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. हळद तसेच खरिपात काही क्षेत्रावर भुईमुगाची आवर्जून ते लागवड करतात.
उच्चशिक्षित कुटुंब
गणेश बीएबीपीएड तसेच अर्थशास्त्रात एमए प्रथमवर्षापर्यंत शिकले आहेत.
त्यांचे मोठे भाऊ दिनेश नोकरीस आहेत. कुटुंबाची संपूर्ण शेती गणेशच सांभाळतात. या कामात पत्नी शीला समर्थपणे साथ देतात. दररोज पाच ते सहा मजूर कार्यरत असतात. शेतात गोदाम, चारा
कुट्टी यंत्र, मशागत, पेरणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर ते करतात.
संपर्क- गणेश लंबे- ८७६६७९०८४०
फोटो गॅलरी
- 1 of 653
- ››