agriculture story in marathi, Gavalipada village of Nasik Dist, has made appreciable progress through agro forestry programmes. | Agrowon

आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले गवळीपाडा

मुकूंद पिंगळे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

वनविकासाच्या वाटा 
संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत गावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती कार्यरत आहे. स्थानिक ग्रामस्थांसह १४ सदस्यांची समिती आहे. ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. उन्हाळ्यात जंगलतोड व वणवा होऊ नये, यासाठी १० जणांचे पथक नेमले आहे.

वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्याद्वारे गाव संघटीत झाले.
 
नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटेसे गाव. पूर्वी गावची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. वनक्षेत्रावर अतिक्रमणे होती. पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. शेतीचीही दुरवस्था झाली होती. पण सर्वजण एकत्र आले तर परिवर्तन करणे शक्य होते. आणि तसेच घडले. सन २०११-१२ मध्ये वन विभागाच्या पुढाकाराने गावात संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना झाली. त्याद्वारे गाव संघटीत झाले. या माध्यमातून ग्रामस्थांकडे ३६७ हेक्टर वनक्षेत्र वर्ग करण्यात आले. याच माध्यमातून २०१३- १४ मध्ये वनविकास यंत्रणेमार्फत ७५ हेक्टर क्षेत्रावर तर २०१६-१७ मध्ये २५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन झाले. वनसंवर्धन हे आपल्या सर्वांचे वैभव असल्याची भावना मनात ठेऊन येथील आदिवासी बांधव जबाबदारीने काम करतात.

वनक्षेत्राचे देखरेख व व्यवस्थापन
संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत गावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती कार्यरत आहे. अध्यक्ष म्हणून विष्णू ठाकरे, उपाध्यक्ष भास्कर गवळी तर सचिव म्हणून वनपाल रामकृष्ण देवकर जबाबदारी पाहतात.
ननाशीचे वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे आणि वनरक्षक हिरामण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक ग्रामस्थांसह १४ सदस्यांची समिती आहे. दर महिन्याला मासिक बैठक असते. त्यात पुढील नियोजन व कार्यवाही होते. ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. उन्हाळ्यात जंगलतोड व वणवा होऊ नये, यासाठी १० जणांचे पथक नेमले आहे. दररोज नवीन १० ग्रामस्थ यात सहभागी होतात. एरवी तीन सदस्य दैनंदिन देखरेख करतात. वनक्षेत्रावर ठरविल्याप्रमाणे कुणीही अतिक्रमण करीत नाही.
वनक्षेत्रावर जनावरांनाही चराईसाठी बंदी असून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होते.

निधीचा विनियोग
संयुक्त वनव्यवस्थापन समिती शासनाच्या धोरणाप्रमाणे कार्य करते. विविध दंडात्मक स्वरूपाच्या रकमा खात्यावर जमा केल्या जातात. या माध्यमातून आवश्यक कामांवर रक्कम खर्च केली जाते. वनखात्याच्या विद्यमाने मिळालेले साहित्य, कामकाजाचा आढावा, केलेली कामे यांच्या नोंदी वनव्यवस्थापन समितीकडून अद्ययावत ठेवल्या जातात.

वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थांद्वारे होणारे कामकाज

 • वनामध्ये अवैध चराईस प्रतिबंध.
 • नियमांचे उल्लंघन झाल्यास वा चुकीच्या बाबी आढळल्यास दंड आकारणी वा त्वरित कार्यवाही व धोरणात्मक बदल
 • कुऱ्हाड बंदी असल्याने लक्षपूर्वक देखरेख
 • गावाच्या बाहेरील व्यक्ती जंगलात गेल्यास त्यावरही समितीच्या सदस्यांचे विशेष लक्ष
 • वन क्षेत्रात अतिक्रमणास विरोध
 • दरवर्षी हजारो रोपांची लागवड. त्यासह व्यक्तिनिहाय संवर्धनाची जबाबदारी
 • जंगल परिसरात समतल चर खोदून जलसंधारण
 • लोकसहभागातून वनसंवर्धनविषयक जनजागृती

श्रमदानातून गावाचा कायापालट :
गाव संघटीत झाल्यानंतर पूर्वी होणारा नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर थांबविला.
यातून श्रमदानाचे महत्त्व पटवून दिल्याने ग्रामविकासाच्या कामाला वेग आला. माध्यमातून विहिरीतील गाळ काढणी, घरनिहाय शोषखड्डा निर्मिती, पाणवठ्याची निर्मिती, जलसंधारण कामे, ग्रामस्वच्छता अभियान ही कामे श्रमदानाच्या माध्यमातून झाली. त्यातून गावच्या प्रगतीत चालना मिळाली.

सागाच्या जंगलाचे संवर्धन
वनक्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आली. सागाचे फुटवे निदर्शनास येताच वनसंपत्तीचे संवर्धन होऊ शकते हे उमगले. सुमारे ७५ हेक्टर वन क्षेत्रात सागाचे जंगल विस्तीर्णपणे उभे राहिले आहे. आता गवळीपाडाची 'सागाचे जंगल' ही नवी ओळख निर्माण झाली आहे.

मृद व जलसंधारणाची कामे :

 • पर्यावरण रक्षणाबरोबर मृद व जलसंधारणावर वनविभागाने विशेष जनजागृती केली.
 • वनक्षेत्रात खोल सलग समतोल चार, दगडी नाला बांध, बांध बंदिस्ती व वन तळ्यांची निर्मिती झाली.
 • पुढे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली. पाणी टंचाई मिटली. वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध झाले. विशेष म्हणजे पारंपरिक शेती करणारे आदिवासी बांधव व्यावसायिक शेतीकडे वळाले. जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत पाणीसाठा उपलब्ध झाला.

जैवविविधता टिकविण्यासाठी प्रयत्न
गवळीपाडा वनक्षेत्रात बिबटे, तरस, रानमांजर, रानडुक्कर, मोर, ससे, पारवे, पोपट, भारद्वाज, खंड्या, हळद्या तितर, लावरी, नाग, धामण, मण्यार, घोणस हे वन्यजीव आढळतात. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी उचलली आहे. साहजिकच वन्यजीवांचा अधिवास टिकून राहिला आहे.
यासह साग, सादडा, बेहडा, पळस, शिवण, खैर, आंबा, जांभूळ, करंज, मोह, पापडा, हिरडा, शिंद, कांचन, आपटा, पांगारा, बिवला, पिंपळ, वड, काकडा, विळीग, बोर, भोकर, करवंद आदी झाडे संवर्धित केली आहेत्त. औषधी वनस्पती व रानभाज्यामध्ये करटूल, शतावरी, चाईचा मोर, गुळवेल, कडूकंद, कोकंदी, रान शेवळा अशी विविधता जतन केली आहे.

शेतीचे अर्थकारण उंचावले
सन २००९ सालापर्यंत येथे वरई, नागली, भात ही पारंपरिक पिके होती. हंगाम संपल्यानंतर येथील शेतकरी रोजंदारीने अन्य कामाला जायचे. आता मात्र जलसंधारणाची कामे झाले. शेततळे, ददडी नाला बांध तयार झाले. ग्रामस्थ आता भोपळा, वांगी, टोमॅटो, घेवडा, कारले, दोडका, सिमला मिरची, यांसह गहू, हरभरा, भात, वराई, नागली, ऊस अशी पिके घेऊ लागले आहेत. घरासमोरील मोकळ्या जागेत तुळस, अडुळसा, गवती चहा, कोरफड आदी औषधी वनस्पतींची लागवड होते. शेतीत बदल होत गेल्याने यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, सेंद्रिय शेतीतही गाव विशेष प्रावीण्य मिळवित आहे. त्यातून अर्थकारण सुधारण्यासह जीवनमानात बदल घडतो आहे.

विकासाभिमुख लोकसहभाग :
वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध बैठका, उपक्रम व नियोजित कामांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो. महिला जंगलातून गवत कापून आणतात. लाकूडतोड टाळून आधुनिक निर्धूर चुली व पाणी गरम करण्यासाठी सौरबंबाचा वापर करतात. त्यातून पर्यायी इंधनाचा स्त्रोत तयार झाला आहे. विद्यार्थीही जनजागृती कार्यक्रमात नेहमी सहभाग घेतात. जागतीक पर्यावरण दिन, वनदिन, वसुंधरा दिन, सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा विविध कार्यक्रमांतून जागृती करण्यात येते.

गवळीपाडा दृष्टिक्षेपात :

 • एकूण भौगोलिक क्षेत्र - ६१४.७१५ हेक्टर
 • राखीव वनक्षेत्र : ३६७ हेक्टर
 • एकूण लोकसंख्या : ४९५
 • वनविकासांतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रात सागाचे जंगल
 • सागाच्या सुमारे दीड लाख वृक्षाचे संवर्धन
 • २० हेक्टर क्षेत्रात रोपवन
 • १२ वनतळी
 • सुमारे ६०० घनमीटर दगडी नाला बांध
 • दारूबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी
 • १०० टक्के हागणदारीमुक्त व प्रदूषणविरहित गाव
 • आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार
 • महिला बचत गट कामकाज सुरू
 • पूरक व्यवसायांमध्ये शेळीपालन, पशुपालन
 •  दरवर्षी वैचारिक प्रबोधनासाठी हरीनाम सप्ताह

राज्यात नावलौकिक
शासनाच्या वन विभागातर्फे संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत ९९.५० गुण मिळवत गवळीपाडा गावाने राज्यात द्वितीय तसेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

संपर्क : रामकृष्ण देवकर
सचिव, संयुक्त वन व्यवस्थापन समिती
गवळीपाडा तथा वनपाल, महाजे वन परिक्षेत्र, ता. दिंडोरी
संपर्क - ९८९०२१३५३४

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...
लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशासप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गतीपरभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील...
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे...
वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या...नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती...
लोकसहभागातून पुणतांब्याची  विकासाकडे...नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक...
ग्रामपंचायत कायद्यात ‘दुरुस्ती’ करतानाच...पुणे : पंचायतराज सक्षमीकरणासाठी राज्यघटनेत ७३ वी...
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची...महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर...
शेती, ग्रामविकास अन् स्वच्छतेचा जागरअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जागर फाउंडेशनच्या...
शेती, ग्रामविकासात नांगनूर अग्रेसरमहाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील नांगनूर (ता....
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
पर्यावरण, जलसंवर्धन, व्यावसायिक शेतीचा...वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी...