'हायब्रीड’ पवनचक्कीच्या निर्मितीतून वीजसमस्येवर कायमस्वरूपी उपाय

शेतीला चोवीस तास वीज मिळावी, रात्रीचे भारनियमन कमी व्हावे हीच सध्या समस्त शेतकऱ्यांची इच्छा आहे. न्हावरे (जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी गीताराम कदम यांनी आपल्या स्तरावर ही इच्छा पूर्ण केली आहे. पवन व सौरऊर्जा यापासून त्यांनी आधुनिक तंत्राची ‘हायब्रीड’ पवनचक्की कमी खर्चात तयार केली आहे.
गीताराम कदम यांनी उभारलेली पवनचक्की
गीताराम कदम यांनी उभारलेली पवनचक्की

शेतीला चोवीस तास वीज मिळावी, रात्रीचे भारनियमन कमी व्हावे हीच सध्या समस्त शेतकऱ्यांची इच्छा आहे. न्हावरे (जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी गीताराम कदम यांनी आपल्या स्तरावर ही इच्छा पूर्ण केली आहे. पवन व सौरऊर्जा यापासून त्यांनी आधुनिक तंत्राची ‘हायब्रीड’ पवनचक्की कमी खर्चात तयार केली आहे. पाच एकरांत त्याचा वापर सुरूही केला आहे. घरातील वीजही त्यांना याच तंत्रापासून मिळू लागली आहे.   सध्या समस्त शेतकऱ्यांना भेडसवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वीजभारनियमन. रात्री आठ व दिवसा आठ दिवस वीज अशी स्थिती असल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय शोधला आहे. पवनचक्की व सौर ऊर्जेचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचे त्यांनी ठरवले. याच तालुक्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमातील २२ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची सोय केली. अमेरिकेतील मित्र जॉर्ज यांनाही तांत्रिक मदतीसाठी बोलावून घेतले. यात लाकूड व अन्य असे ९० टक्के जुने साहित्य वापरले. असा प्रकल्प म्हणजे जगातील ‘वॉटर पंपिंग’ साठी बनविलेला पवन व सौर ऊर्जा यांचे एकत्रीकरण केलेला पहिला प्रयोग होता. तांबे (कॉपर) व मॅग्नेट यांचा मुख्य वापर केला. पवनचक्की तयार करण्यासाठी २२ विद्यार्थी काही दिवस मेहनत उपसत होते. यंत्रणेच्या एक ते दोन प्राथमिक चाचण्याही घेण्यात आल्या.    पवनचक्की व त्यातील तंत्रज्ञान

  • पवन व सौर ऊर्जा यांचा एकत्रित वापर (हायब्रीड)
  • ॲनेमोमीट र (वाऱ्याचा वेग) आणि एमपीपीटी (मॅक्झिमम पॉवर पीक पॉइंट) यांचा वापर. 
  • याद्वारे वाऱ्याची उच्च कार्यक्षमता वापरली जाते.
  • वाऱ्याची दिशा बदलण्यासाठी यंत्रणा.
  • पवनचक्की उभारण्यासाठी दहा मीटरचा परीघ आवश्‍यक. जमिनीपासूनची उंची किमान २० मीटर किंवा ६० फूट. शेजारी त्या उंचीची अन्य इमारत किंवा झाडे नसावेत.
  • पवनचक्कीसाठी लागणारी पातीही टिकाऊ लाकडापासून. त्यावर इपॉक्सी कोटिंग. जलरोधक बनवले. -घर्षण पेलण्यासाठी बेअरिग, शाफ्ट व अन्य फिटिंग्ज.
  • वाऱ्याचा वेग व दिशा नियंत्रित करणारा ‘टेलपोस्ट बँलन्सिंग गव्हर्नर’
  • खर्च एक किलो वॅट क्षमतेच्या पवनचक्कीसाठी सव्वालाख रुपये, तीन किलो वॅट क्षमतेसाठी अडीच लाख रुपये तर हायब्रीड यंत्रणेसाठी (पवन व सौर) साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च दोन ते तीन वर्षाच्या वीजबिलातून वसूल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अत्यंत माफक पैशांमध्ये वीज मिळू शकेल.   प्रत्यक्ष वापर व फायदे

  • न्हावरे येथे कदम यांच्या शेतात साठ फूट उंचीचा टॉवर उभारून त्यावर यंत्रणा बसवली आहे. तयार होणारी ऊर्जा पंपाला पुरविण्यासाठी बहुउद्देशीय कंट्रोलर बसविला. कंट्रोलरचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून शिकवण्यात येत आहे.
  • पवनचक्कीच्या उर्जेद्वारे शेतीपंप चालवून कदम यांना पाच एकरांत संत्रा, आंबा, कांदा, पेरू, शेवगा, भाजीपाला आदी पिकांना हव्या त्या वेळी व गरजेनुसार पाणी देणे शक्य झाले आहे.
  • घरातील वीजही चोवीस तास त्यावर चालते आहे.
  • रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतात जाण्याची गरज पडत नाही.
  • विविध पिकांचे नियोजन करता येऊ लागले आहे.
  • 'ग्राईन्डर’, ‘वेल्डिंग मशिन देखील वापरता येऊ लागले आहे.
  • आता शासकीय विजेवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे वीजबिलात मोठी बचत होत आहे.
  • आत्तापर्यंत एकूण पाच ते सहा लाख रुपयांची बचत झाल्याचे कदम सांगतात.
  • पवनचक्कीबाबत ठळक बाबी

  • क्षमता तीन किलो वॅट. च्या क्षमतेपर्यंत कोणतेही काम करणे शक्य
  • -वाऱ्याचा वेग फार कमी असतो तेव्हा तयार होणारी वीजही कमी असते. ही कमी झालेली क्षमता पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त दोन किलो वॅटची गरज असते. हे अभ्यास करूनच त्याला
  • सौर ऊर्जेचा ‘बॅक अप’ दिला. त्यामुळे प्रथम पवनचक्कीची ऊर्जा व ती कमी पडली तर सौरऊर्जा
  • वापरली जाते.
  • पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसतो तेव्हा पवनचक्कीच्या ऊर्जेवर तर उन्हाळ्यामध्ये वारा कमी असतो तेव्हा सौर ऊर्जेची मदत घेण्यात येते.
  • घर्षण करणारे भाग, बॅटरी व इनव्हर्टर नसल्याने देखभाल व दुरुस्तीची गरज कमी आहे. वर्षातून एकदा टर्बाइनच्या बेअरिंगला ‘ग्रिसींग’ (वंगण) करण्याची गरज असते. पाच वर्षातून पात्यांना गरजेनुसार रंग द्यावा लागतो.
  • या प्रयोगाची दखल ॲग्रोवनने दोन वर्षांपूर्वी घेतली. त्यातून सांगली, सातारा, उस्मानाबाद, खडकवासला, लोणी, पाबळ, चेन्नई, अहमदाबाद, हरियाना अशा अनेक ठिकाणांहून मागणी आली. त्यानुसार पवनचक्क्या उभारून दिल्या.
  • जीपीएस यंत्रणेचा वापर पवनचक्कीच्या माध्यमातून रोज ताशी किती वीज तयार होते त्याची माहिती तत्काळ मोबाईलवर उपलब्ध होण्यासाठी टॉवरवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. यावरून पवनचक्कीची क्षमता तसेच पवनचक्की सुरू की बंद आहे याची तत्काळ माहिती समजते. शासनाचे अनुदान हवे नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगीकी संशोधन विभागाकडे यंत्रणा चाचणीसाठी पाठवून त्यांची दोन वर्षांपूर्वी मान्यता घेतली आहे. भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. या पवनचक्क्यांचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनुदान देणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा अखंडित वापर करणे शक्य होऊ शकेल. पर्यावरणही दूषित होणार नाही. घरामध्येही वीज राहील असे गीताराम कदम यांचे म्हणणे आहे.   असे होतील पवनचक्कीचे फायदे

  • हरित ऊर्जा म्हणून चालना देता येईल.
  • स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्तम पर्याय
  • -शासनाकडून मिळणाऱ्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम कमी होतील.
  • शासनाच्या विजेच्या चोरीवर पायबंद होईल.
  • आपत्कालीन परिस्थितीत वापर शक्य
  • डिझेलचा वापर कमी होऊन पर्यावरण दूषित होण्याचे प्रमाण कमी होईल.
  • वीज जोडणीसाठी लागणारा खर्च व वेळ टाळणे शक्य
  • संपर्क- गीताराम कदम - ९९२२९४६५४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com