agriculture story in marathi, Geetaram Kadam & their associates doing successfully business of vegatable dehydration & its powder. | Page 2 ||| Agrowon

निर्जलीकरण केलेल्या भाज्यांपासून पावडरनिर्मिती

संदीप नवले
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

प्रक्रियायुक्त उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे. त्यातूनच मागणी वाढणार आहे. बदलत्या ‘मार्केटिंग’च्या व्यवस्थेत आम्ही वेगवेगळ्या संकल्पना वापरत आहोत. त्याचे चांगले यश आले असून, चांगला नफाही मिळू लागला आहे.
--गीताराम कदम

विविध भाजीपाला, फळे यांच्यावर तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करून पावडर, फ्लेक्स वा चिप्सद्वारे त्यांचे यशस्वी मूल्यवर्धन करण्यात पुणे जिल्ह्यातील न्हावरे येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत. ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत आनंदघना या ब्रॅंडने त्यांनी विविध मेथी, पालक, शेवगा, बीट रूट, डाळिंब आदी असंख्य घटकांची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारपेठांत सादर केली आहेत. मार्केटिंगच्या विविध प्रभावी पद्धतीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह परराज्यात, परदेशात या उत्पादनांनी बाजारपेठ मिळवत अल्पावधीत एक कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे.

पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यापासून दक्षिणेकडे सुमारे २२ किलोमीटरवर सुमारे चार ते पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी. गावाचा परिसरही माळरान. पाणीटंचाईची परिस्थिती सातत्याने निर्माण होत असल्याने ग्रामस्थ शहराची वाट धरू लागलेले. खरीप हाच गावाचा मुख्य हंगाम. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यास रब्बी हंगामही साधला जातो. गहू, बाजरी, कांदा, हरभरा या पिकांसह गरजेनुसार भाजीपाला, फळपिकेही घेण्यात येतात. मात्र असमाधानकारक दर, बाजारपेठांची शाश्‍वती नसणे, वाढता खर्च, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यावर गावातील प्रगतिशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या गीताराम कदम यांनी यावर तोडगा काढण्याचे ठरविले.

शेतकऱ्यांची गरज ओळखून पुढाकार
कदम यांची एकूण बारा एकर शेती आहे. त्यात आंबा व संत्रा प्रत्येकी दोन एकर, कोथिंबीर, कांदा, पालक, तुळस, अन्य भाज्या अशी विविध पिके आहेत. शेतमालावर प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करून नफ्याचे प्रमाण वाढवणे हाच मुख्य पर्याय त्यांना सापडला. हैदराबाद येथील अन्नप्रक्रिया संस्थेला भेट देऊन त्याविषयी त्यांनी अधिक माहिती घेतली. पूर्ण अभ्यास व विचारांती २०१६ मध्ये उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

असा आहे प्रक्रिया उद्योग
यांत्रिक -

 • शेतातील पाच गुंठे क्षेत्रावर शेडची उभारणी केली.
 • प्रक्रियेसाठी लागणारा यांत्रिक सेटअप उभारला. यात सेग्रेगेशन म्हणजे स्वच्छता व प्रतवारी, त्यानंतर प्री ड्राइंग डोम, मग निर्लजीकरण व पल्वरायझिंग, पॅकिंग या पद्धतीने यंत्रे बसवली.
 • ग्रामीण तंत्रज्ञान संस्था याअंतर्गत उत्पादनांचा ‘आनंदघना’ ब्रॅंड

मालाची उपलब्धता
प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या फळे व भाजीपाल्याचे उत्पादन गटातील शेतकरीच घेतात.
गटात सुमारे १६५ शेतकरी आहेत. कांदा, कोथिंबीर, पालक, तुळस अशा पिकांची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. संत्रा, आंबा या फळांचेही उत्पादन गरजेनुसार घेण्यात येते. पाण्याच्या टंचाईमुळे वर्षभर शेतमाल उपलब्ध होण्यास अडचणी येतात. पर्याय म्हणून शिरूर तालुक्यातील सुमारे ५८० शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे. त्यांच्याकडून मालाची आवश्यकतेनुसार योग्य त्या दरात खरेदी केली जाते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, अडत, हमाली आदी खर्च वाचला असून, दोन पैसे अधिक मिळू लागले आहेत.

अशी होते प्रक्रिया

 • शेतातून काढणी केलेल्या भाज्यांची स्वच्छता व प्रतवारी केली जाते.
 • प्रक्रिया उद्योगातील बारकावे लक्षात येऊ लागले तसतशी प्रक्रियेत सुलभता येऊ लागली.
 • संपूर्ण निर्जलीकरण केल्यानंतर मालाची पावडर तयार केली जाते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिलचा वापर केला जातो.
 • तयार केलेली पावडर प्लॅस्टिक पाऊचमध्ये विविध वजनात पॅक करून विक्रीसाठी तयार केली जाते.

विक्रीसाठी केला अभ्यास
प्रक्रियायुक्त मालाची विक्री करण्यासाठी सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र फलोत्पादन विभागातील वरिष्ठ तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी दिल्ली येथे भरलेल्या अन्नप्रक्रिया प्रदर्शनात सहभाग घेण्याची संधी मिळाली. या वेळी जगभरातील विविध देशांतून आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा घडली. त्यातून परदेशात असलेल्या मागणीचा अभ्यास केला. त्यातून काही प्रतिनिधींकडून ‘सॅम्पल’ मालाची मागणी पुढे आली. देशांतर्गत मालाच्या बाजारपेठेचाही अभ्यास केला. त्यानुसार मार्केटिंग व विक्रीची दिशा पक्की झाली. त्यानुसार विविध व्यापारी, उद्योजक यांच्याशी चर्चा करून त्यांना मालाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांना मिळते प्रशिक्षण
स्वतःचा उद्योग सांभाळण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सुविधा कदम यांनी उपलब्ध केली आहे. अशा इच्छुकांची फार्मवर राहण्याची सुविधाही केली आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यात येते. आत्तापर्यंत १०० ते १५० हून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आत्माअंतर्गत शेतकऱ्यांचा सहभाग अधिक आहे. याशिवाय अनेक शेतकरी या उद्योगाला भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेतात. कदम न थकता त्यांना प्रतिसाद देतात.

सौर व वायू ऊर्जेचा वापर
प्रक्रिया उद्योगात वीज हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु ग्रामीण भागात असलेल्या ‘लोडशेडिंग’मुळे उद्योग करण्यास अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यावर मात करण्यासाठी कदम यांनी सोलर व विंड पॉवरचा (सौर व वायू ऊर्जा) वापर सुरू केला आहे. त्यासाठी फार्मवर सुमारे सात लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामुळे विजेची मोठी बचत झाली असून, टंचाईवर मोठी मात करणे शक्य झाले आहे.

उत्पादनांची श्रेणी

 • मेथी, कोथिंबीर, बीट, गाजर, लसूण, आले, हिरवी मिरची, पुदीना, कढीपत्ता, भोपळा, टोमॅटो, पालक, तुळस, कांदा, मूग, मटकी पावडर, रताळे, डाळिंब, अंजीर, आवळा, पेरू आदी.
 • पावडर, फ्लेक्स, चिप्स अशी स्वरूपे
 • ५० ते ५०० ग्रँमपर्यंतचे पॅकिंग
 • प्रति किलो ३०० ते ५०० रुपये असे दर. याशिवाय फॅमिली पॅक तयार करून विक्री.
 • डाळिंबाच्या दाण्यांचे पॅकिंग करून विक्री. शंभर ग्रॅम पॅकिंगला १३२ रुपये असा दर.
 • भांडवल- शेडसहीत सुमारे ७० लाख रुपयांपर्यंत.
 • वार्षिक उलाढाल- सुमारे एक कोटी रुपये.
 • सुरुवातीच्या दोन वर्षांत खर्चाचे प्रमाण कमी होऊन उत्पन्न सुरू होते. कच्चा माल, मजूर, वाहतूक खर्च यावर दर महिन्याला सुमारे दोन लाख रुपये खर्च होतो.
 • कंपनीने फूड सेफ्टी क्षेत्रातील संस्थेचा परवाना घेतला आहे.
 • आयएसओ- ९००१ हे प्रमाणपत्रही घेतले आहे.
 • विक्रीपूर्वी सर्व उत्पादनांचे एनएबीएल संमत प्रयोगशाळेतून परीक्षण करून घेण्यात येते.

सक्षम विक्री व्यवस्था
१) थेट विक्री
राज्यात सुमारे १८ तर चेन्नई, पॉंडीचेरी, अहमदाबाद, बंगळूर आदी मिळून
परराज्यात १७ व्यावसायिक सहयोगी तयार केले आहेत. त्यांच्यामार्फत विविध ठिकाणी उत्पादने पोचतात.

२) वेबसाईटचा अवलंब-
आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी आणि मालाची खात्री मिळण्यासाठी www.anadghanaindustries.in या वेबसाईटची सुविधा उपलब्ध केली आहे.त्याद्वारे उत्पादनाचे महत्त्व, वापर, आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे आदी विविध स्वरूपाची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ग्राहकांना वेबसाईटवरून उत्पादने खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे उत्पादनांविषयी ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे शक्य झाले आहे.

३) सोशल मीडियाचा वापर
विक्रीमध्ये सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने यू-ट्यूब, फेसबुक, लिंकडिन, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा आधार घेतला आहे. या माध्यमातून नवे ग्राहक तयार होण्यास तसेच व्यापारीदेखील मिळण्यास व मागणीत वाढ होण्यास मदत मिळत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरद्वारे सुमारे ४७ हजार फॉलोवर्स जोडले गेले आहेत.

४) ई-मार्केटिंगद्वारे विक्री
ॲमेझाॅन, इंडिया मार्ट, इंडिया फार्मा, नाऊ फ्लोट आदींचे व्यासपीठ या हेतूने वापरण्यात येत आहे. औषध निर्मिती उद्योगातील कंपनीला शेवगा पावडर पुरवली जाते.

५) स्थानिक विक्रेते
स्थानिक विक्रेत्यांची मदतही घेतली आहे. यामध्ये पुण्यातील बिबवेवाडीतील श्री रविशंकर टी अँड टी हर्बल शाॅप, कल्याणीनगर येथील चितळे स्वीट होम, अग्रज फूड, आर्या कार्पोरेशन
आदींचा समावेश आहे.

६) फिटनेस क्लबचा वापर
‘मार्केटिंग’साठी दहा ते बारा तरुणांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई येथे ग्राहकांत जागरूकता निर्माण करण्याचे काम त्याद्वारे केले जाते. याशिवाय २० फिटनेस
क्लब जोडले आहेत. २० ते २५ ठिकाणचे योगा क्लासेस, ४० ते ५० ठिकाणची उद्याने
येथे व्यायामासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्येही उत्पादनांचा प्रचार केला जातो.

७) डॉक्टरांमार्फत प्रसार
- मुंबई, पुणे येथे सुमारे २८० डॉक्टरांची मदत उत्पादनाचे महत्त्व सांगण्यासाठी घेतली जाते.
यामध्ये प्रामुख्याने आयुर्वेदिक डॉक्टर्सचा सहभाग अधिक आहे.

८) शासनाच्या प्रदर्शनात सहभाग
महाराष्ट्र शासनामार्फत भरत असलेल्या अन्नप्रक्रिया प्रदर्शनात उत्पादनांची थेट विक्री करण्यात येते.
याशिवाय पुणे फूड फेस्टिव्हल, इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल या माध्यमांचाही आधार घेण्यात येतो. सर्व प्रकारांच्या माध्यमातून ग्राहकांची मागणी हळूहळू वाढत आहे. ‘सेलिब्रिटी व्यक्ती, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, कृषी महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांची मदतही घेण्यात येते.

९) परदेशात विक्री
उत्पादनांची व्याप्ती राज्य, परराज्यासह अमेरिका, युरोप, कॅनडा, इस्त्राईलपर्यंत पोचली आहे.
भारतातून परदेशात जाणाऱ्या अनेक व्यक्तींच्या माध्यमातून परदेशातील सुमारे २६ ते २७ ग्राहक जोडले गेले असून ही मागणी वाढत असल्याचे कदम सांगतात.
 
कराराचा फायदा
या उद्योगाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांनाही हळूहळू होऊ लागला आहे. परराज्यातील शेतकऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये आंध्र प्रदेश सरकारसोबत शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कदम यांच्या गटाने करार केला आहे. चालू वर्षी हा प्रक्रिया उद्योग आंध्र प्रदेशमधील चिंत्तूर येथे उभा करण्यात येणार आहे. त्याचा फायदा दोन्ही
राज्यातील शेतकऱ्यांना होईल. प्रत्येक जिल्ह्यात आनंदघना ब्रॅंडसाठी फ्रँचाईजी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तरुण उद्योजकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्योगातील ठळक वैशिष्ट्ये

 • हैदराबाद येथील अन्नप्रक्रिया विषयातील संस्थेसोबत तंत्रज्ञान देवाणघेवाण करार केला आहे. त्यानुसार तेथील तंत्रज्ञानही वापरण्यास मिळतेच. शिवाय संस्थेच्या इडली रवा उत्पादनात शेवगा पावडर, बीटरूट यांचा फ्लेवर आम्ही समाविष्ट करून देतो, असे कदम यांनी सांगितले.
 • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या उद्योगाचे प्रशिक्षण घेण्याची सोय करण्यात आली आहे. त्या माध्यमातून उद्योजक घडविणे हा हेतू ठेवला आहे. शासनाच्या नेहरू युवा केंद्राच्या मदतीनेही युवकांची मदत उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी होत आहे.

महिला केंद्रित उद्योग
कदम म्हणाले की, आमच्या उद्योगात महिलांना सर्वोच्च स्थान दिले आहे. महिला सक्षमीकरण ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. निर्मिती प्रक्रियेपासून मार्केटिंगपर्यंत महिलांची संख्या आमच्याकडे अधिक म्हणजे १५ पर्यंत आहे. मार्केटिंगमध्ये तीन महिला काम करतात. आम्ही जो कच्चा माल घेतो तोदेखील महिला शेतकऱ्यांकडूनच घेत असल्याचे कदम यांनी सांगितले.
 
ॲग्रोवनमुळेच झाली प्रगती
कदम ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. यापूर्वी त्यांच्या गटाने उभारलेल्या धान्य ग्रेडिंग विषयाची यशकथा प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी विविध भागातून सुमारे २५० ते ३०० पर्यंत व्यक्तींनी संपर्क केला होता. त्यातून नेटवर्क आणखी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे आजच्या भाजीपाला प्रक्रिया उद्योगात ॲग्रोवनचा वाटा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क- गीताराम कदम - ९९२२९४६५४० 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...