वर्षभर मागणी असलेला घेवडा...

यंदा पाऊस जास्त झाल्याने बहुतांश भागातील घेवड्याचे पीक वाया गेल्याने मार्केटमध्ये पहिल्यांदाच ५० ते ७० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. त्यामुळे घेवडा असणाऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची संधी चालून आली आहे. -महादेव निखोटे कशाळ, ता. मावळ, जि. पुणे
पुणे गुलटेकडी बाजार समितीत घेवड्याची झालेली आवक
पुणे गुलटेकडी बाजार समितीत घेवड्याची झालेली आवक

घेवड्याला वर्षभर चांगली मागणी असते. त्यामुळे विविध हंगामांत शेतकरी हे पीक घेतात. पुणे जिल्हा घेवड्याचे आगर आहे. येथील अनेक गावे घेवड्याची शेती करतात. यंदा अनेक ठिकाणच्या पूरस्थितीमुळे घेवड्याचे मोठे नुकसान होऊन पुणे मार्केटला आवक घटली आहे. त्यामुळे दर मात्र अत्यंत चांगले आहेत. याच अनुषंगाने घेवड्याच्या वर्षभराच्या मार्केटचा घेतलेला हा आढावा...  काही दिवसांपूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर यासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नद्यांना पूर परिस्थिती तयार झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुणे शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाला व फळभाज्यांची आवक कमी होऊन दरांत वाढ झाली. श्रावणात होणारी घेवड्याची आवकदेखील याला अपवाद ठरली नाही. दरवर्षी घेवड्याला श्रावणात तुलनेने मध्यम ते कमी दर मिळत असले तरी पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच हे दर प्रतिकिलो ५०-६० रुपयांपर्यत पोचल्याचे तेथील व्यापारी सांगतात.  पुणे जिल्हा घेवड्याचे आगार  पुणे जिल्हा घेवड्याचे आगर आहे. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागात घेवड्याला जमीन आणि हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. मावळ, मुळशी भागात मे-जूनमध्ये त्याची लागवड होते. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. सुमारे पाच ते सहा तोडे होतात. एकूण एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते.  घेवड्याचे मार्केट  १)पुण्यातील गुलटेकडी बाजार समितीत अनेक शेतकरी माल घेऊन येतात. मात्र, जिल्ह्याच्या उत्तर भागातील आंबेगाव, जुन्नर या भागातील शेतकऱ्यांना मंचर मार्केट जवळ असल्याने ते तेथील व्यापाऱ्यांना विक्री करतात. हे व्यापारी परराज्यात तसेच पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये माल पाठवतात.  मंचर येथील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून घेवडा घेऊन परराज्यातही पाठवितात. याशिवाय काही शेतकरीदेखील थेट परराज्यात घेवडा पाठवितात. त्यातून त्यांना चांगले दर मिळतात.  २) खेड, सासवड, मावळ (लोणावळा), मुळशी भागातील शेतकऱ्यांनाही गुलटेकडी हेच मार्केट जवळ आहे. मे, जूनमध्ये या भागातून मोठी आवक असते.  ३) परराज्यातूनही आवक-कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर, धारवाड येथूनही पुण्यात घेवड्याची आवक जुलै, ऑगस्टमध्ये होते. त्यामुळे स्थानिक बाजारातील घेवड्याचे दरही कमी होतात.   

प्रकारानुसार घेवड्याचे दर  प्रकार व वैशिष्ट्यानुसार घेवड्याला दर मिळतात. ते असे (रुपये प्रतिकिलो)
प्रकार दर वैशिष्ट्य 
काश्मिरी ३०-४० आकार मोठा, चमक कमी, तोडे कमी, मागणी कमी  
गोल्डन (फाल्गुनी) ४०-५० आकार लहान, चमक अधिक, तोडे जास्त, मागणी जास्त    
चपटा घेवडा (गावरान) २० -२५ शिरा असतात,  चवीला चांगला, आकार चपटा, मागणी जास्त 

यंदा चढे दर 

  • जूनमध्ये बहुतांश शेतकरी लागवड करतात. उत्पादन जुलै, ऑगस्टमध्ये सुरू होते. या कालावधीत 
  • एकाच वेळी माल विक्रीसाठी येतो. गुलटेकडी मार्केटमध्ये सुमारे ६० ते ७० टन आवक होते. साहजिकच जुलै ते सप्टेंबर कालावधीत दर कमी म्हणजे प्रति किलो १५ ते २० रुपये असतात. यंदा गंभीर पावसाळी परिस्थितीमुळे मार्केटमध्ये १०० -१५० क्विंटल आवक होत असल्याने 
  • प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दर शेतकऱ्यांना मिळतो आहे. असा चढा तर अनेक वर्षांनंतर मिळालेला असावा. 
  • वर्षभराचे दर 
    कालावधी आवक सरासरी दर  
    जुलै ते जानेवारी सर्वाधिक १५  ते २० रू.  
    फेब्रुवारी ते मे कमी आवक ५०-६० रू.  
    जून सर्वात कमी आवक ६० -७० रू.    

    वर्षभर मागणी  घेवडा काढणीनंतर तीन-चार दिवस टिकतो. साधी भाजी, मिक्स व्हेज व पुलाव आदी कारणांसाठी घरगुती ग्राहकांबरोबरच होटेल व्यावसायिकांकडूनही वर्षभर चांगली मागणी राहते.  उलाढाल  पुणे मार्केटमध्ये घेवड्याला वर्षभराचा सरासरी दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये राहतो. जुलै ते जानेवारी कालावधीत महिन्याला पाच ते सहा लाख रुपये तर फेब्रुवारी-जून कालावधीत ती चार ते पाच लाख रुपयांपर्यंत असते.   

    अलीकडील वर्षांतील उलाढाल पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, गुलटेकडी, पुणे  
    वर्ष आवक क्विंटल उलाढाल रु. 
     २०१६-१७ ४७,३३५ १९ कोटी १ लाख ४० हजार 
    २०१७-१८ ७०,५१८ २९ कोटी ६१ लाख ७५ हजार 
    २०१८-१९ ७७, ४९८ २३ कोटी २४ लाख ९४ हजार

    व्यापारी प्रतिक्रिया  घेवड्याला वर्षभर मागणी असते. पुणे मार्केटमध्ये जिल्ह्यासह परराज्यातून घेवडा येतो. दहा ते पंधरा टन आवक रोजची होते.  -अजित नवले, व्यापारी, ९८९०८६३१३१  घेवड्याला सर्वाधिक मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून असते. त्यामुळे वर्षभर चांगले  दर मिळत असले तरी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यास अधिक दर मिळू शकतील.  -विकास ठोंबरे, व्यापारी, ९८६०३५२७७२   मार्केटमध्ये तीन प्रकारचा घेवडा विक्रीस येतो. फाल्गुनी घेवड्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याने दरही चांगले मिळतात. उन्हाळ्यात दर वाढलेले असतात. त्याचा फायदा अनेक शेतकरी घेतात.  -राम पिंगळे, व्यापारी  शेतकरी प्रतिक्रिया  माझी पावणेचार एकर शेती आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त असल्याने भात हेच मुख्य पीक घेतो. त्यासोबतच योग्य नियोजनानुसार दरवर्षी तीन गुंठ्यांत घेवडा घेतो. त्यासाठी सुमारे दहा किलो बियाणे लागते. पीक घेताना प्रामुख्याने साखळी पद्धतीचा अवलंब करतो. जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर केल्याने रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी होऊन घेवड्याची प्रत व दर्जा सुधारून तो चवीलाही चांगला लागतो. त्यामुळे मार्केटमध्ये अन्य घेवड्याच्या तुलनेत चांगले दर मिळतात. प्रति गुंठ्यात एक क्विंटलपर्यंत माल मिळतो. पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवितो.  विविध हंगामात दर वेगवेगळे असले तरी किलोला सरासरी ७० ते ८० रुपये दर मिळतात. त्यामुळे नियमित पैसे मिळत राहतात. तीस गुंठ्यांत ३० ते ४० हजार रुपये मिळतात. यंदा पाऊस जास्त झाल्याने बहुतांश भागातील घेवड्याचे पीक वाया गेल्याने मार्केटमध्ये पहिल्यांदाच ५० ते ७० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. त्यामुळे घेवडा असणाऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची संधी चालून आली आहे.  -महादेव निखोटे-८९७५६९६८४५  कशाळ, ता. मावळ, जि. पुणे   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com