घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’

हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता.कळमनुरी) व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनीरब्बी हंगामासाठी कांदा पिकाला पसंती दिली आहे. कांद्याचे अर्थकारण त्यांच्यासाठी अन्य पिकांच्या तुलनेत सक्षम ठरत आहे. क्षेत्र विस्तारल्यामुळे घोळवा व परिसरातील गावांत कांद्याचे क्लस्टर तयार झाले आहे.
प्रसाद अंभुरे यांच्याकडे कांदा लागवड.
प्रसाद अंभुरे यांच्याकडे कांदा लागवड.

हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता.कळमनुरी) व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी अलीकडील वर्षांत रब्बी हंगामासाठी कांदा पिकाला पसंती दिली आहे. या पिकाचे अर्थकारण त्यांच्यासाठी अन्य पिकांच्या तुलनेत सक्षम ठरत आहे. साहजिकच क्षेत्र विस्तारल्यामुळे घोळवा व परिसरातील गावांत कांद्याचे क्लस्टर तयार झाले आहे.   हिंगोली- कळमनुरी- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव रस्त्यानजीक तीन किलोमीटरवर डोंगररांगांमध्ये घोळवा (जि. हिंगोली) हे छोटे गाव वसले आहे. जिरायती बहुल या क्षेत्रातील शेतकरी सिंचनस्रोत निर्माण करून हळद, भाजीपाला, कांदा आदी पिकांकडे वळत आहेत. गावशिवारात सुमारे ४० टक्के जमीन हलकी, माळरानाची आहे. उर्वरित क्षेत्र मध्यम व काळी मातीचे आहे. काही वर्षांपूर्वी कापूस आणि करडई ही गावची प्रमुख पिके होती. मात्र अर्थकारण उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी सलग सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर पीक पद्धती स्वीकारली. रब्बीत करडईची जागा हरभऱ्याने घेतली आहे. गरजेपुरता गहू घेतला जातो. गावालगत डोंगरउताराजवळ पाझर तलाव आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. भागात फेब्रुवारी- मार्चपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध राहाते. त्यावर हळद, भाजीपाला होतो. कांदा क्लस्टर घोळवा भागातील शेतकरी पूर्वी कुटुंबापुरतीच कांदा लागवड करायचे. परंतु हरभरा पिकाच्या तुलनेत कांदा हे पीक त्यांच्यासाठी अधिक उत्पादन देणारे ठरत आहे. परस्परांच्या अनुभवातून शेतकरी उत्पादनाचे तंत्र अवगत करत आहेत. उत्पादन खर्च एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत येतो. आजवर प्रति क्विंटल ५०० ते १२०० रुपये तर गेल्या वर्षी ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले. तीन- चार वर्षांत गावात कांद्याखालील क्षेत्र सव्वाशे ते दीडशे एकरावर पोहोचले आहे. परिसरातील साळवा, माळेगाव, बाबडी, नवखा, नरवाडी,आमदरी आदी गावांत मिळून क्षेत्र सुमारे पाचशे एकरांपर्यंत गेले आहे. साहजिकच घोळवा व परिसर पट्टा कांद्याचे ‘क्लस्टर’ म्हणून ओळखला जात आहे.   थेट शेतातून विक्री परिसरात मोठे भाजीपाला मार्केट नाही. नांदेड आणि हैदराबाद येथील व्यापारी घोळवा भागातून थेट बांधावरून खरेदी करतात. शेतातच वजन करून ५० किलो बॅगेत पॅकिंग करून कांदा ट्रकमध्ये भरून बाजारपेठांमध्ये नेला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो. बीजोत्पादनही कांद्याचे बियाणे विकत घेऊन लागवड करणे खर्चिक ठरते. शिवाय उगवण व्यवस्थित न झाल्यास नुकसान होते. त्यामुळे सात वर्षांपासून येथील शेतकरी स्वतःपुरते पाच ते दहा गुंठे क्षेत्रावर बीजोत्पादन देखील करतात. शिल्लक बियाण्याची विक्रीही होते.   क्षेत्रविस्तार व विपणन साखळी गावातील शेतकरी सुमारे दहा वर्षांपासून कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. परंतु गावात कांदा चाळ नसल्यामुळे बाजारातील मंदीच्या काळात साठवणूक करता येत नाही. तेजीचा फायदा घेता येत नाही. तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. अनेक शेतकरी खरिपातही कांदा घेतात. आगामी काळात कळमनुरी तालुक्यात विविध गावांमध्ये मिळून कांदा लागवड क्षेत्राचा विस्तार दोन हजार एकरांपर्यंत करण्याचे नियोजन केले जात आहे. सोबत विक्रीसाठी सक्षम विपणन साखळी उभी करण्याचे नियोजन आहे.   कांद्यामुळे अर्थकारण भक्कम घोळवा येथील गजानन गणेशराव मगर यांची दहा एकर माळरान जमीन आहे. तूर, हळद, सात एकर सलग सोयाबीन, रब्बीत गहू, हरभरा ते घेतात. पारंपरिक पीक पद्धतीतून अर्थकारणाचा मेळ बसत नव्हता. बोअर, विहिरीव्दारे हंगामी सिंचन सुविधा होती. मग २००९ च्या रब्बी हंगामात दोन एकरांत कांदा लागवड केली. हा प्रयोग आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला. तेव्हापासून दरवर्षी चार ते पाच एकरांत कांदा असतो. पुणे फुरसुंगी वाणाची निवड करतात. सुरवातीची काही वर्षे बाजारातून बियाणे आणायचे. अलीकडील वर्षांत घरचे बियाणे वापरतात. सप्टेंबरमध्ये गादीवाफ्यावर बियाणे टाकून रोपे तयार करतात. ऑक्टोबरच्या अखेरच्या ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन फूट रुंद सरीत पाणी सोडून दोन रोपांत चार इंच अंतर ठेवून लागवड होते. मुख्य अन्नद्रव्यांसह एकरी दहा किलो गंधकाची मात्राही देतात. दरवर्षी एकरी १५ टन व त्यापुढे उत्पादन त्यांना मिळते. घोळवा येथील शिवाजी अंभुरे सांगतात, की आमची तीन एकर शेती आहे. पूर्वी कापूस लागवड करायचो. गेल्या नऊ वर्षांपासून खरिपात सोयाबीन तर रब्बीमध्ये कांदा उत्पादन घेत आहोत. कुटुंबातील सहा सदस्य पूर्णवेळ शेतीत राबतात. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत केली आहे. कांद्यातून अर्थकारण सक्षम केले. गावात पक्क्या घराचे बांधकाम केले. भारत शिंदे म्हणतात, की पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञानातून चांगले उत्पादन घेत आहोत. एकरी सरासरी ७५ हजार व त्यापुढे उत्पन्न कांदा पीक देते. गावातील तरुणही या शेतीकडे वळले आहेत. प्रसाद अंभुरे म्हणतात, की घरातील सदस्य लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांची समस्या कमी केली आहे. गजानन मगर म्हणाले, की कांदा पिकामुळे गावातील शेतकरी समृद्ध होत आहेत. तुऱ्हाट्याच्या तात्पुरत्या कांदा चाळी उभारून दोन ते तीन महिने साठवणूक करता येते. शासकीय योजनेतून चाळी मंजूर केल्यास शेतकऱ्यांना दीर्घकाळ साठवणूक करता येईल. बाजारभावातील तेजीचा फायदा घेता येईल. संपर्क-  गजानन मगर- ९५२७३१५८६५ प्रसाद अंभुरे-९९७५७६९०५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com