बोकडांचे वेगवेगळ्या कारणांसाठी विक्रीव्यवस्थापन

फायदेशीर शेळीपालनासाठी
फायदेशीर शेळीपालनासाठी

वेगवेगळ्या कारणानुसार बोकडाची निवड, संगोपन, आहार व व्यवस्थापन वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागते. त्यामुळे विक्रीव्यवस्थापन सुलभ होते व व्यवसायात नफा वाढविणे शक्‍य होते.

शेळीपालन हा व्यवसाय मुख्यत्वेकरून मांसासाठी केला जातो. मटनासाठी केलेल्या शेळीपालनात मादीपासून मिळणाऱ्या मटनापेक्षा बोकडापासून मिळणाऱ्या मटनाला जास्त पसंती आहे. हे बोकडाचे मटण वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे रूढी, परंपरा, वय, जात, धर्म यानुसार बदलते. त्यामुळे वेगवेगळ्या कारणानुसार बोकडाची निवड, निपज, आहार व व्यवस्थापन वेगवेगळ्या पद्धतीने केल्यास विक्रीव्यवस्थापन सुलभ होते व व्यवसायात नफा वाढविणे शक्‍य होते. बोकडांची विक्री पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी करता येते.

१) पैदास करण्यासाठी

  • पैदाशीचा बोकड हा जातिवंत व एका विशिष्ट जातीचा (१०० टक्के गुणधर्म) असणारा असावा. उदा. १०० टक्के उस्मानाबादी.
  • पैदाशीचा बोकड जर दोन जातींचे मिश्रण असणारा असल्यास त्यामध्ये दोन्ही जातींचे प्रमाण किती आहे. (५० टक्के उस्मानाबादी व ५० टक्के सिरोही किंवा ७५ टक्के उस्मानाबादी व २५ टक्के इतर) हे माहिती असणे आवश्‍यक आहे व तो कुठल्या जातीच्या मादीला दाखविल्यास पिलांमध्ये दोन्ही जातींचे प्रमाण किती येईल याची तपासणी करावी.
  • पैदाशीच्या बोकडाची वंशावळ चांगली असावी. त्याच्या आई, वडील, बहीण, भाऊ व इतर रक्ताच्या नात्यातील कुटुंब सदस्यांचे उत्पादन, वजनवाढ व इतर गोष्टी चांगल्या आहेत का हे तपासून त्याची निवड करावी.
  • पैदाशीच्या बोकडाचे जन्मताचे वजन, प्रतिदिन वजनवाढ चांगली असावी.
  • पैदाशीचा बोकड जुळ्यातील एक असल्यास उत्तम.
  • बोकडाची निवड ४-६ महिन्यांचा असताना सर्व आवश्‍यक गुणधर्म तपासून करावी व त्याला इतरांपासून वेगळे करून उत्तम खुराक (वजनाच्या साधारण १ टक्का) ओला चारा व वाळला चारा (चांगल्या प्रतीचा व शक्‍य तेवढा वेगवेगळा) द्यावा.
  • पैदास काळात खुराक वाढवावा तसेच त्याला चांगल्या प्रतीचे क्षारमिश्रण योग्य प्रमाणात द्यावे.
  • बोकड निवडताना त्याची ब्रुसेला, टीबी व जोन्स या रोगांसाठी मुख्यत्वेकरून तपासणी करून घ्यावी.
  • पैदाशीच्या बोकडाच्या दोन वापरांदरम्यानचे अंतर ४ दिवसांपेक्षा कमी व ७ दिवसांपेक्षा जास्त असल्यास वीर्याची प्रतवारी खालावते.
  • बोकडाचे प्रथम पैदाशीसाठी वापराचे वय १.५ ते २ वर्षे असावे.
  • पैदाशीचा बोकड दर तीन वर्षांनी बदलावा.
  • पैदाशीच्या बोकडाची विक्री जिवंत वजनावर प्रचलित दरापेक्षा जास्त दराने करता येते.
  • बकरी ईद

  • विक्री वय ः १ वर्षापेक्षा जास्त.
  • शरीरावर जखम नसावी.
  • जात - सिरोही, जमनापारी (लोकल नावाच्या जाती - सोजत, नागफणी, तोतापारी, बीटल इ.)
  • खच्चीकरण केलेले असल्यास चांगली वजनवाढ मिळते.
  • रोजचा खुराक, ओला चारा (वेगवेगळ्या प्रकारचा असल्यास उत्तम), वाळलेला चारा देणे फायद्याचे ठरते.
  • जन्मतःची वजने जास्त असलेले बोकड वेगळे करून विशेष काळजी घेतल्यास जास्त फायदा होतो.
  • रंगबेरंगी, रुबाबदार, वजनदार, धष्टपुष्ट, देखणा यानुसार किंमत ठरते.
  • वेळेवर जंतनिर्मूलन, खुराकाची व क्षारमिश्रण योग्य प्रमाणात व चांगल्या प्रतीचे दिल्यास चांगली वजनवाढ होते.
  • विक्रीवयापर्यंत बोकडावर जन्मापासून किती खर्च आला, त्यावर विक्री किंमत ठरते.
  • मांसासाठी/ मटणासाठी

  • जे बोकड पैदाशीसाठी व ईदसाठी विकायचे नाहीत, त्यांची विक्री स्थानिक बाजारात मटणाच्या दुकानात करावी.
  • अशा बोकडांची विक्री स्वतः थेट ग्राहकाला वाटेपद्धतीने किंवा स्वतःच्या मटणाच्या दुकानातून केल्यास नफ्यात भरघोस वाढ मिळते.
  • या पद्धतीमध्ये बोकडाची विक्री शासनपुरस्कृत सूत्रांचा वापर करून कमीत कमी तेवढ्या तरी किमतीने करावी. जेणेकरून तोटा होणार नाही.
  • उदा. जर, बोकडाचे वय चार वर्षांपर्यंत असेल तर, बोकडाची किंमत = क्ष x य/२ य = प्रचलित मटणाचा दर व क्ष = बोकडाचे जिवंत वजन
  • स्थानिक किंवा घरगुती स्तरावर खाल्ल्या जाणाऱ्या मटणासाठी बोकडाचे वय साधारण ः ६-८ महिने असते.
  • बोकडाची विक्री जिवंत वजनावर करणे काळाची गरज.
  • निर्यातीसाठी बोकड विक्री

  • बोकडाचे वय निर्यातीच्या नियम निर्देशानुसार असावे.
  • निर्यातक्षम मटनासाठी बोकडाची कत्तल शासन नोंदणीकृत कत्तलखान्यामध्ये सर्व अटी व नियमांना अधिक राहून केलेली असणे अनिवार्य आहे.
  • निर्यातीच्या मटणाची प्रतवारी आयात करणाऱ्या देशाच्या नियमांची पूर्तता करणारी असावी व जनावराचे फिटनेस प्रमाणपत्र नोंदणीकृत पशुवैद्यकामार्फत दिलेले असावे.
  • मटण निर्यातीसंदर्भात सर्व अटी, नियम, निर्णय शासनाच्या APEDA (Agriculture & Processed food Products export development Authority) या संस्थेमार्फत घेतले जातात व याची सर्व महिती APEDA च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जत्रा व यात्रांसाठी बोकडविक्री

  • बोकडांची विक्री स्थानिक जत्रा व यात्रांसाठी करता येते.
  • वय ः ६ ते ८ महिने.
  • जात ः गावरान, स्थानिक, उस्मानाबादी.
  • बोकडांची विक्री करताना आजूबाजूच्या परिसराची चाचपणी करून जत्रेचे नाव, गावाचे नाव, जत्रांचा दिनांक, कुठला बोकड व जात, वय, किती नग लागतात, कुठल्या वयाचे लागतात, सरासरी किंमत किती मिळते या सर्व गोष्टी तपासाव्या व विक्री करावी.
  • संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com