agriculture story in marathi, gram shiwar, water management, khedi khurd, jalgaon | Agrowon

काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द गावात फुलले पिकांचे मळे 
चंद्रकांत जाधव 
गुरुवार, 13 जून 2019

दुष्काळात एकमेकांना साह्य 
दुष्काळी स्थिती लक्षात घेता यंदा जानेवारीत गिरणा नदीच्या आवर्तनाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सहा लाख रुपये वर्गणी गावात गोळा झाली. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. वीस फूट रुंद व १५ फूट उंच वाळू-मातीचा बंधारा साकारला. त्यात पाणी साठून नजीकच्या ७५ ते ८० कूपनलिकांचे जल पुनर्भरण होण्यास मदत झाली

खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून शिवारात विविध पिकांचे मळे फुलवले आहेत. केळीच्या विविध वाणांसह पपई, कलिंगडाचे आंतरपीक तसेच रब्बी ज्वारीच्या उत्पादनासाठी येथील शेतकऱ्यांचा लौकीक आहे. अलीकडे गावातील सुमारे ६५ कुटुंबांनी देशी किंवा गीर गायींच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक युवक नोकरीच्या मागे न लागता शेतीतच करियर घडवत आहेत. शिवारातील जलसंकट लक्षात घेता पाण्याची काटकसर करण्यासह जलसंधारणावरही ग्रामस्थांनी भर दिला आहे. 

जळगाव शहरापासून सुमारे आठ किलोमीटरवर खेडी खुर्द आहे. गिरणा नदीकाठी असल्याने गावाच्या शिवारात कापूस, केळी व अन्य पिकांच्या सिंचनासाठी नदीचा मोठा आधार आहे. लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून शेती व मजुरी हाच गावाचा प्रमुख व्यवसाय आहे. काळी कसदार, पाण्याचा निचरा असलेली, मध्यम प्रकारची जमीन शिवारात आहे. 

खेडी खुर्दची शेती 

 • जवळपास ९० टक्के क्षेत्र ओलिताखाली. 
 • गिरणा नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी कूपनलिका घेतल्या आहेत. 
 • गावचे क्षेत्र- सुमारे पावणेदोनशे हेक्‍टर 
 • बहतांश शेतकरी अल्पभूधारक 
 • भाडेतत्त्वावर (लीज) जमीन कसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही शेतीही नफ्यात राखून समृद्धी मिळविणारे अनेक शेतकरी गावात. 
 • केळीची सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये (कांदेबाग) लागवड अधिक प्रमाणात. तर नवती किंवा मृग बहार केळीही काही शेतकरी जूनअखेरीस किंवा जुलैमध्ये घेतात. 

 केळीत नावाजलेले गाव 
केळी हीच खेडी खुर्दची ओळख आहे. महालक्ष्मी, वसई, बसराई, श्रीमंती अशा विविध वाणांची लागवड येथील केळी उत्पादक करतात. अलीकडे ऊतीसंवर्धित वाणाचेही यशस्वी उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. सन १९९५-९६ पर्यंत पाट पद्धतीने सिंचन केले जायचे. शेती वाढविण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी नजीकच्या वडनगरी, ममुराबाद (ता. जळगाव) शिवारातील शेतकऱ्यांची शेती ‘लीज’वर घेण्यास सुरवात केली. शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष होते. ते दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी गिरणाकाठच्या शेतातून जलवाहिन्या टाकल्या. हा काळ साधारण १९९८ चा. सुमारे सात- आठ किलोमीटरपर्यंत जलवाहिन्या घेऊन आपल्या व नजीकच्या गावांतील शिवार शेतकऱ्यांनी हिरवेगार केले आहे. सुमारे १० हजार ते १३ हजार रुपये प्रति एकर असा मोबदला ‘लीज’संबंधी गावातील शेतकरी देतात. लीजवरची शेतीही परवडते याचे उत्तम उदाहरण या गावाच्या शेतकऱ्यांनी समोर ठेवले आहे. 

सुधारित तंत्राचा अवलंब 
केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता १९९६-९७ मध्ये ठिबकचे तंत्रज्ञान गावातील शेतकऱ्यांनी आत्मसात केले. त्याचा झपाट्याने प्रसार झाला. पुढे अन्य शेतकऱ्यांचे अनुकरण केले. सरासरी २२ किलोची रास अशी उत्पादकता गावाने टिकवली आहे. काहींनी मार्केटिंगमध्ये स्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांचाही फायदा व्हावा यासाठी केळीचा व्यापार सुरू केला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलेही कमिशन घेतले जात नाही. निर्यातक्षम केळी पिकविली जात असल्याने जागेवरच विक्री अनेक वर्षे केली जाते. 
पॉली मल्चिंगचा वापर वाढत असतानाच गावातील अनिल छगन चौधरी यांनी बैलजोडीचलित मल्चिंग पेपर शेतात अंथरण्याचे यंत्र विकसित केले. त्याबद्दल कृषी विभागासह अन्य यंत्रणांनी त्यांचा गौरवही केला. 

कलिंगडातही यश 

 • उन्हाळ्यात ४८ अंश सेल्सिअस तापमान जात असल्याने सहा ते सात महिन्यांच्या केळी बागांत जानेवारीत कलिंगड लागवड सुरू झाली. यंदाच्या हंगामात सुमारे ७० एकरात हा प्रयोग असावा. दीपक चौधरी, अतुल पाटील, कैलास चौधरी, सचिन पाटील, संतोष भागवत चौधरी, संजय प्रल्हाद पाटील, हिरालाल पुंडलिक चौधरी, विजय चौधरी अशी या प्रयोगशील शेतकऱ्यांची नावे सांगता येतील. एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेताना कलिंगडातून एकरी ७५ हजार रुपयांपर्यंतचा नफाही मिळविला. 
 • या प्रयोगात मेपर्यंत केळीचे उष्णतेपासून संरक्षण झालेच. शिवाय पिकाला कमी पाणी द्यावे लागले आणि आंतरपिकामुळे नफा वाढविताही आला. 

अन्य पिकांतही उल्लेखनीय 
केळीनंतर खेडी खुर्दचे शेतकरी मेमध्ये कापसाची तयारी सुरू करतात. ठिबकचा वापर अर्थातच अनिवार्य झाला आहे. डिसेंबरअखेरीस कापूस काढून वेलवर्गीय पिके घेण्याची पद्धतही येथील शेतकऱ्यांनी तयार केला आहे. रब्बी ज्वारीचे एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादन ग्रामस्थ घेतात. पारंपरिक वाणांचे जतन अनेक ज्वारी उत्पादकांनी वर्षे केले आहे. पपईची लागवडही सुमारे २० ते २५ एकरांत डिसेंबर-जानेवारीत होते. त्यातही कलिंगडाचे आंतरपीक साध्य केले जाते. विजय चौधरी, अनिल छगन चौधरी, कैलास छगन चौधरी आदींचा पपई उत्पादनात चांगला हातखंडा असून व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. मागील हंगामात कमाल १३ व किमान साडेचार रुपये प्रति किलोचे दर जागेवर मिळाले. एकरी ४० टन उत्पादनापर्यंत शेतकरी पोचले आहेत. गावातील पदवीधर शेतकऱ्यांची संख्या चांगली असून अभ्यासवृती व प्रयोगशील वृत्ती त्यांनी जोपासली आहे. 

दुष्काळात एकमेकांना साह्य 
दुष्काळी स्थिती लक्षात घेता यंदा जानेवारीत गिरणा नदीच्या आवर्तनाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सहा लाख रुपये वर्गणी गावात गोळा झाली. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. वीस फूट रुंद व १५ फूट उंच वाळू-मातीचा बंधारा साकारला. त्यात पाणी साठून नजीकच्या ७५ ते ८० कूपनलिकांचे जल पुनर्भरण होण्यास मदत झाली. आठ शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्‍टर वाळू व मातीच्या वाहतुकीसाठी दिले. इंधनावरील खर्चही त्यांनीच केला. देशी गायींचे महत्त्व लक्षात घेता सुमारे ६५ कुटुंबांनी प्रत्येकी किमान एक याप्रमाणे गीर गायीचे संगोपन, संवर्धन करण्यास सुरवात केली आहे. शिवारात पावसाळ्यातील वाहतूक सुकर होण्यासाठी गावातील पाच प्रमुख रस्त्यांचे खडीकरण शासकीय संस्थांच्या मदतीने झाले आहे. शाळेला कुंपण भिंत, शंभर टक्के रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व एलईडी पथदिवे, पिण्याच्या पाण्याची काटकसर म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा अशी कार्यवाही झाली आहे. 

आदिवासी बांधवांना रोजगार 

 • गावात सुमारे ४०० आदिवासी कुटुंबे सातपुडा पर्वतरागांमधील पाडे, वस्त्यांमधून आली आहेत. 
 • काही कुटुंबे मागील सुमारे १८ वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. शिवारात त्यांना रोजगार 
 • मिळाला आहे. त्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. ज्या शेतकऱ्यांकडे संबंधित कुटुंबातील सालगडी काम करतो त्या शेतकऱ्याकडून वर्षाकाठचे धान्य, निवासासाठी शेतात किंवा गावात पक्के घर, वीज यांची व्यवस्था केली जाते. 

श्रीराम मंदिराचा इतिहास 
गावात सुुमारे शंभर वर्षे जुने श्रीराम मंदिर असून, त्यातील धनुर्धारी मूर्ती स्वयंभू असल्याचे जुनेजाणते सांगतात. मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी केला असून त्यासाठी ३० लाख रुपये निधी गावातूनच गोळा झाला. गावात पिलीग देवीचे मंदिरही उभारण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या एकत्रीकरणासाठी दरवर्षी हरिनाम सप्ताह व महाप्रसाद वाटप कार्यक्रम घेतला जातो. 
संपर्क- सचिन पाटील- ९८८१७९८०८१ 
संजय चौधरी- ८८८८०१०३६७ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...
सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
पुसद वन विभागाचा हायटेक  दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...
अडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...
आदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...
विदर्भात रूजतोय काबुली हरभराकाबुली हरभऱ्याला देशभरातील बाजारपेठेत चांगली...
पाषाण जमिनीवर दरवळतोय सोनचाफ्याचा सुगंध ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम...