भाजीपाला पिकातून कळवंडे झाले आर्थिकदृष्ट्या सक्षम 

गावातील महिला दिवसभर शेतीतच व्यस्त असतात. शेतीतून त्यांनी आपले घर व प्रपंच उभा केला आहे. या गावचे नेतृत्व करते याचा मला अभिमान आहे. -सायली जाधव सरपंच, कळंवडे
भाजीपाला, भुईमूग अशा पिकांतून कळवंडेने पिकांची विविधता जपली आहे.
भाजीपाला, भुईमूग अशा पिकांतून कळवंडेने पिकांची विविधता जपली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव भाजीपाला शेतीसाठी ओळखले जाते. पारंपरिक भातशेतीसह आंबा, काजू या कोकणातील प्रमुख फळपिकांसह येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, चिबुड, काकडी लागवडीला प्राधान्य दिले आहे. याच शेतीतून संपूर्ण गाव स्वावलंबी झाले आहे. गावच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. तंटामुक्त, वणवामुक्त, चोरीमुक्त अशीही या गावची वेगळी ओळख आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे.  कोकणाचा नयनरम्य निसर्गाचा मोठा वारसा लाभला आहे. आंबा, काजू, सुपारीच्या बागा आणि भात ही कोकणातील शेतीची खास ओळख आहे. हीच पिके कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम करतात. रत्नागिरी जिल्ह्याची त्या मातातील हापूस आंबा म्हणूनही वेगळी ओळख आहे. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळवंडे हे कोकणातील नेहमीच्या पिकांबरोबरच भाजीपाला पिकांसाठीही खास म्हणून प्रसिद्ध आहे.  व्यावसायिक शेतीची धरली कास  कळवंडे धरणामुळे गावात मुबलक पाणी आहे. त्याचा पुरेपूर वापर करून शेती बागायती झाली आहे. सन १९६५ मध्ये गावातील तात्या उदेग यांनी ग्रामस्थांना सुधारित शेतीचा मार्ग दाखवला. वसंत उदेग यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरली. येथील ९९ टक्के ग्रामस्थ शेती याच व्यवसायात आहेत. बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक आहेत. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्या शेतात राबतात.  असे असते शेतीचे नियोजन  खरीप म्हणजे पावसाळा व हिवाळा अशा दोन मुख्य हंगामात कळवंडेत भाजीपाला घेतला जातो. काहीजणांनी पाचाड, दहिवली, कोंढे, खरवते येथील शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. धरणातील पाणी कालव्याद्वारे चार वाड्यांपर्यंत पोचले आहे. त्यातील तीन वाड्यांतील शेतकऱ्यांनी धरणात पंप टाकून पाणी शेतापर्यंत नेले आहे. एकाचवेळी एकाच भाजीची आवक वाढून दरांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची व्यवस्थित घडी बसवली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार लागवडीचे धोरण अवलंबिले आहे. सेंद्रिय शेतीवर भर दिला जातो. कमी कालावधीच्या भाज्यांचे हंगामात दोन वेळाही उत्पादन घेतले जाते. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, मेथी, कोथिंबीर, चवळी, चिबुड, काकडी, भेंडी, पावटा, वांगी, मुळा, दुधी भोपळा, कारले, मिरची अशी पिकांची विविधता कळवंडेच्या शिवारात पाहण्यास मिळते.  विक्रीचे नियोजन  कळंवडेतील भाजीपाल्यासाठी मुख्य मार्केट म्हणजे चिपळूण शहर व खेर्डीला भरणारे आठवडी बाजार.  येथील महिला भाज्यांची टोपली डोक्‍यावर घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी जातात. शहरात कोणत्या ठिकाणी कोणी जायचे? उपनगरात कुणी कोणत्या भागात जायचे याचे नियोजन आधीच केले जाते. एक महिला सुमारे शंभर भाजीच्या जुड्या सोबत नेते. साधारण १० रुपयांना एक जुडी म्हटले व शंभर जुड्या विकल्या गेल्यातरी दिवसभरात हजार रुपये तर महिन्याला सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते.  शेतीतून समृद्धी  गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान चार ते पाच एकर शेतजमीन आहे. शेतीद्वारे प्रतिकुटुंबाला किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन कमी केले जाते. काही शेतकऱ्यांकडे स्वमालकीची हापूस आंब्याची ७०० ते ८०० झाडे आहेत. मागणीच्या काळात हापूस आंबा दोन हजार रुपये प्रतिडझन दरानेही विकला जातो. मे अखेर ८०० रुपये शेकडा दराने आंब्यांची विक्री होते.  बचतीची सवय  भाजी विक्रीचा दररोज हिशोब केला जातो. खर्चाची रक्कम बाजूला करून मिळणारा नफा कळंवडे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये महिला आपल्या खात्यावर जमा करतात. यातून त्यांना बचतीची सवय लागली आहे. याच सोसायटीतून खते आणि बियाणे उपलब्ध केले जाते.  प्रक्रियेचे चार प्रकल्प  स्थानिक बाजारपेठेसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात कळंवडेचा आंबा पाठविला जातो. गावात महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत क्‍लिनिंग- ग्रेडिंग- पॅकिंगचे चार प्रकल्प आहेत. या प्रकल्पात काजूच्या ओल्या बिया ठेवण्यात येतात. काजूगर काढून त्यांची बाजारात विक्री होते. साहजिकच चिपळूण परिसरात वर्षभरात ओले काजूगर उपलब्ध होताच ते याच कारणामुळे. बिगर हंगामात या काजूगरांना हजार ते आठशे रुपये प्रतिकिलो दर मिळतो.  प्रगती झाली, स्थलांतर थांबले  गावातील तरुणांना शेतीद्वारे वर्षभर रोजगार मिळत असल्यामुळे मुंबई, पुणे आदी ठिकाणी त्यांचे होणारे स्थलांतर थांबले आहे. गावातील प्रत्येक कुटुंब शेतीतून सधन झाले आहे. कुटुंबामागे दुचाकी आहे. प्रत्येकाची घरे जांभा दगडी बांधकामाची आणि पक्की स्वरूपातील आहेत. गावातील मुले इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात. गावात राजकारणाला थारा नाही. स्थापनेपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. कोणाच्याही वाढदिवसाचे फलक लावले जात नाहीत.  शेतकऱ्यांचा गौरव  कळवंडेतील शेतकरी सतत नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्याच्या मागे असतात. त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. शासनाच्या नवीन योजनेचा निरोप घेऊन अधिकारी गावात आले की प्रथम गावकऱ्यांची बैठक जमते. नफ्या-तोट्याचा विचार करून योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जातो. बैठकीत सर्वांचे मत विचारात घेतले जाते. शासकीय योजनांबाबत शेतकरी जागृत असल्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेतात.  गावाची अन्य वैशिष्ट्ये 

  • ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून गावात दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा, सार्वजनिक परिसरात आणि शेताच्या बांधावर झाडांची लागवड केली जाते. 
  • ग्रामपंचायत कार्यालयाची नवी इमारत बांधण्यात आली आहे. येथे ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. कार्यालय परिसरात वृक्षारोपण झाले आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रोत्साहन दिले जाते. 
  • सर्व कुटुंबासाठी वैयक्तिक तसेच सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे आहेत. गावातील बहुतांशी रस्ते पक्के आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व नाल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 
  • प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोस्ट कार्यालयाची सुविधा उपलब्ध आहे. 
  • प्रतिक्रिया  भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी लागवड, पीक व्यवस्थापनातील सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगला असतो. त्यामुळे काम केल्याचे समाधान मिळते.  -संतोष भोसले  कृषी सहायक कळंवडे  शेती हाच समृद्धीचा राजमार्ग ठरू शकतो हे कळवंडेच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामागे कै. तात्या उदेग यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली आहे.  - वसंत उदेग  प्रगतशील शेतकरी  संपर्क- ९८२२१२१६७०  गावातील लोकसहभाग आणि एकोपा महत्त्वाचा आहे. कोणतेही काम लहान अगर मोठे समजून न करता प्रत्येकजण ते आवडीने करतो. त्यामुळे गावात मजुरांची समस्या जाणवत नाही.  -अजित कान्हेरे, शेतकरी  संपर्क- ८६०५२५४८९९ .  ग्रामस्थांना विविध सुविधा देण्याबरोबर महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांची कष्ट करण्याची तयारी व आर्थिक प्रगती उल्लेखनीय आहे.  -संतोष उदेग, शेतकरी  कळवंडे गाव दृष्टीक्षेपात 

  • भौगोलिक क्षेत्र- ७४४.६९ हेक्‍टर 
  • लागवडीखालील क्षेत्र- २७०.२१ हे. 
  • वनाखालील क्षेत्र- १२.६० हे. 
  • फळबागेखालील क्षेत्र- ९०.०२ हे. 
  • आंबा- ६६.९ हे. 
  • मसाला पिके- २.५ हे. 
  • भाजीपाला- ८ हे. 
  • भात- १२२.५ हे. 
  • विहीर सिंचन क्षेत्र- ३ हे. 
  • कालवा सिंचन- ४० हे. 
  • लोकसंख्या-२०५८ 
  • कृषी माल प्रक्रिया युनिटस- ४ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com