आले, उसाच्या पट्ट्यात स्वादिष्ट पेरूची शेती 

फायदेशीर उत्पादन फळांचे वजन व दर्जा चांगला मिळावा म्हणून पहिली दोन वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये प्रति झाड सुमारे एक किलोप्रमाणे एकूण झाडांचे ६०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. त्याची किलोला ५० ते ६० रूपये दराने विक्री केली. बहुतांशी थेट विक्री केल्याने चांगला दर मिळवणे शक्य झाले. आता सात वर्षांची बाग झाली असून प्रति झाड सुमारे ८ ते १० किलो उत्पादन मिळते आहे.
प्रकाश नलवडे यांनी फुलवलेली पेरूची बाग व दर्जेदार फळे.
प्रकाश नलवडे यांनी फुलवलेली पेरूची बाग व दर्जेदार फळे.

नागठाणे (जि. सातारा) येथील प्रकाश महिपती नलवडे हे अल्पभूधारक शेतकरी. विविध पिकांचे प्रयोग करण्याची आवड व प्रयोगशील मित्रांच्या सान्निध्यात राहण्याची सवय यातून त्यांची शेती बहरली. ऊस, आले या भागातील पारंपरिक पिकांच्या पट्ट्यात नलवडे यांनी पेरूशेतीचा प्रयोग करून तो यशस्वी केला आहे. उत्तम गुणवत्ता मिळवत फळांच्या थेट विक्रीतून बाजारपेठही मिळवली. शेतीत प्रगती करताना मुलांना उच्चशिक्षणही देण्यातही कुठे कसर ठेवली नाही.   सातारा जिल्ह्यातील नागठाणे गाव आले शेतीसाठी प्रसिद्ध अाहे. गावाच्या उत्तरेकडून उरमोडी नदी वाहत असल्याने गावात बागायत पर्यायाने आले, ऊस या नगदी पिकांचे क्षेत्र वाढले. गावातील प्रकाश महिपती नलवडे अल्पभूधारक शेतकरी. वडील पारंपरिक शेती करायचे. शिक्षण सुरू असल्यापासून प्रकाश वडिलांच्या बरोबरीने शेतीचे धडे गिरवायचे. गावात पाणी नसल्याने कोरडवाहू शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुटुंबाच्या विभाजनातून प्रकाश यांच्या वाट्याला एक एकर शेती आली. शेतीचे क्षेत्र कमी असल्याने लगतची शेती खंडाने करण्यावर त्यांनी भर दिला.  शेतीतील जडणघडण  प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण मनोहर साळुंखे हे नागठाणे येथीलच आहेत. त्यांच्यासोबतच संजय नलवडे, अविनाश यादव, यशवंत साळुंखे आदी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सहवास कायम होता. यांच्यासारखी शेती आपण केली पाहिजे असे प्रकाश यांचा सतत वाटायचे. या वेळी यशवंत साळुंखे व डीएस कुलकर्णी यांनीही शेती बागायती करण्याबाबत मार्गदर्शन केले. मग विहीर व बोअरवेल घेतले. पाण्याचे महत्त्व सुरवातीपासून माहीत असल्याने जास्तीत जास्त ठिबक सिंचन करण्याकडे कल ठेवला.  पेरूशेतीत पदार्पण  या भागातील नगदी पिके घेणे सुरू होतेच. दरम्यान मनोहर साळुंखे यांनी पेरूचा प्रयोग सुरू केला होता. त्यांच्याच सांगण्यावरून प्रकाश यांनीही त्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. २०११-१२ मध्ये सुमारे ३५ गुंठे क्षेत्रात पेरूची लागवड केली. सरदार ४९ हे वाण गर व स्वादाला चांगले असल्याचे कळल्यावर त्याचीच निवड केली. रोपे लखनो येथून आणली. जागेवर येईपर्यंत प्रतिरोप ५० रुपये खर्च आला. आज सुमारे ६०० झाडांची देखभाल सात वर्षांपासून सुरू आहे. बागेत सुरवातीला सोयाबीन, आले, झेंडू यांसारखी आंतरपिके घेतली. त्यातून पेरूचा भांडवली खर्च कमी केला. ठिबक सिंचन तसेच शेणखताचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे बागेची वाढही जोमदार झाली.  फायदेशीर उत्पादन  फळांचे वजन व दर्जा चांगला मिळावा म्हणून पहिली दोन वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये प्रति झाड सुमारे एक किलोप्रमाणे एकूण झाडांचे ६०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. त्याची किलोला ५० ते ६० रूपये दराने विक्री केली. बहुतांशी थेट विक्री केल्याने चांगला दर मिळवणे शक्य झाले. आता सात वर्षांची बाग झाली असून प्रति झाड सुमारे ८ ते १० किलो उत्पादन मिळते आहे. दोन वर्षांत दोन ते तीन बहर घेण्याकडे कल राहिला आहे. पूर्वी दोन एकरांत ही बाग होती. सध्या क्षेत्र कमी केले असले तरी पुढे ते वाढवण्याचा विचार आहे.  थेट विक्री, चांगले दर  नागठाणे हे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत व बाजारपेठेचे गाव असल्याने दैनंदिन वर्दळ कायम असते. गावात प्रकाश यांचे कपडयांचे दुकानही आहे. पत्नी सौ. सुनंदा या व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. या दुकानासमोर पेरूचा स्टॉल उभारला जातो. सुमारे ५० टक्के विक्री या माध्यमातून होते. उर्वरित पेरू छोट्या व्यावसायिकांना दिले जातात. या विक्रीपद्धतीत हमाली, अडत, वाहतूक यामध्ये मोठी बचत होते. प्रकाश यांच्याकडे पपईचीदेखील शेती आहे. त्यामुळे पेरूसोबत त्यांचीही विक्री सोपी होते. थेट विक्रीतून पेरूला किलोला ६०, ७० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. तर व्यावसायिक ५० रुपये दराने पेरू खरेदी करतात.  शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • पाण्याची मुबलकता असावी यासाठी २०१४ मध्ये सुमारे साडेदहा लाख रुपये खर्च करून उरमोडी नदीवरून पाणी आणले. त्यातून घरची व खंडाने घेतलेली शेती बायागत करणे शक्य झाले. 
  • वेळेत छाटणी केली जाते. 
  • बहुतांश व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केले जाते. जीवामृत व दशपर्णी अर्क यांचा वापर होतो. 
  • आंतरमशागत पॅावर टिलरच्या साह्याने होते. 
  • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होतो. 
  • ढगाळ वातावरणात किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता पाहून प्रतिबंधकात्मक फवारण्या घेतल्या जातात. 
  • अन्य पिकेही उल्लेखनीय  आले, उसात आंतरपीक म्हणून पपईची लागवड केली जाते. पूर्वी केवळ एक एकर असलेले क्षेत्र मेहनत, जिद्द आणि प्रयत्नवादातून ११ एकरांपर्यंत नेण्यात प्रकाश यशस्वी झाले आहेत. यात ऊस पाच एकर, प्रत्येकी ३० गुंठे आले व पेरू व एक एकर पपई आहे. उर्वरित क्षेत्रात हंगामनिहाय पिके घेतली जातात. लागवड उसाचे एकरी ८० टन तर खोडव्याचे ६० टनांपर्यंत उत्पादन घेतात. आल्याचे एकरी ३० गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादन मिळते. आले, उसात बटाटा, झेंडू, कांदा यांसारखी आंतरपिकेही घेतली जातात. कृषी सहायक अकुंश सोनावले यांचे मार्गदर्शन तर शेतीकामासाठी नारायण गुप्ता यांची दत होते.  शेणखत व दुधासाठी गोठा  शेतातच बांधले आहे. यात मजुरांची राहण्याची व्यवस्थाही केली आहे. या घरालगत जनावरांसाठी २५ जनावरांची क्षमता असलेला गोठा बांधला आहे. यामध्ये सध्या चार म्हशी व एक खिलार गाय आहे. या जनावरांपासून उपलब्ध होणारे शेण स्वतःच्या शेतात वापरले जाते. जीवामृत तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. गोमूत्राच्याही फवारण्या होतात.  केवळ शेतीतूनच मुलांना घडवले  केवळ नियोजनबद्ध शेती व कष्ट यांच्या जोरावर आपण कुटुंबाची प्रगती घडवू शकलो याचा प्रकाश यांना अभिमान आहे. आज त्यांनी टुमदार बंगला बांधला आहे. मुलगी शीतल ‘बीएएमएस’ डॅाक्टर असून, ती विवाहित आहे. दुसरी मुलगी पल्लवी इंजिनियर झाली आहे. मुलगा पुणे येथील नामांकित महाविद्यालयात ‘बीएसस्सी’चे शिक्षण घेत आहे.  संपर्क- प्रकाश नलवडे - ९८५०६५२२७१ v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com