agriculture story in marathi, Guljar Kazii a Konkan farmer has developed his farming with experiments & progressive attitude. | Agrowon

प्रयोगशील शेतीतील गुलजार

एकनाथ पवार
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथवली येथील गुलजार निजाम काझी या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने सातत्याने विविध प्रयोग करून चिकाटीने शेती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथवली येथील गुलजार निजाम काझी या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने सातत्याने विविध प्रयोग करून चिकाटीने शेती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस, कलिंगड, भाजीपाला, भात अशी वर्षभर विविधता जपत थेट विक्री व्यवस्थादेखील यशस्वी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्गावर तिथवली (ता. वैभववाडी) गाव आहे. येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. काही ऊसशेतीकडेही वळले आहेत. अनेकांकडे हापूस आंबा आहे. गावातील गुलजार काझी हे युवा शेतकरी आहेत. त्यांनी बी.एस्सी., बी.कॉम., एम.कॉम. व एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. गावापासून काही किलोमीटरवरील महाविद्यालयात व्याख्याते म्हणून त्यांना नोकरी मिळाली. पण नोकरी आणि शेती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्धवेळ शेती करून हाती फारसे काही लागत नाही हे लक्षात आले. सन २०१४ मध्ये पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला पाटपाण्यावर ऊसशेती केली. त्यात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (मांजरी) येथे जाऊन काही दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ऊस रोपांची लागवड केली. त्यात कलिंगडाचे आंतरपीक घेतले. पहिल्या वर्षी चांगले उत्पादन मिळाले. पुढील वर्षी मग पीक कायम ठेवले.

कलिंगड झाले नियमित पीक
कलिंगडाचे अर्थशास्त्र उसापेक्षा फायदेशीर असल्याचे लक्षात आले. मग उसाचे क्षेत्र कमी करून अधिक क्षेत्रावर कलिंगड हेच पीक घेण्याचे ठरवले. त्या वेळी सुधारित तंत्रज्ञानाचा म्हणजे पॉलिमल्चिंग, ठिबक सिंचन यांचा वापर सुरू केला. अलीकडील काळात दोन ते तीन एकर क्षेत्र असते. एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते.

कोरोना संकटात शोधली संधी
गुलजार यांनी मागील वर्षी दोन मित्रांच्या मदतीने दोन एकरांत कलिंगड आणि एक एकरांत खरबूज लागवड केली. एक कंपनी माल खरेदी करणार होती. उत्पादन चांगले मिळाले पण कोरोना लॉकडाउन सुरू झाले. मोठा पेच उभा राहिला. अखेर टेम्पोतून काही गावांमध्ये फिरून थोडाफार माल विक्री केला. त्याचवेळी वाशीमधील व्यापाऱ्यांमार्फत सुमारे १० टन कलिंगडाची निर्यात दुबईत करण्यात यश मिळाले. किलोला सव्वाआठ रुपये दर मिळून हाती सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न आले.

भाजीपाल्यातील संधी ओळखली
प्रयोगशील वृत्तीच्या गुलजार यांनी आणखी एका संधीचा अभ्यास केला. गाव परिसरात दररोज भाजीपाला कोल्हापूर जिल्ह्यातून येतो. त्याचे उत्पादन घेतले तर गावासह स्थानिक बाजारपेठ मिळेल हे जाणले. सुरुवातीला काही गुंठ्यांत लागवड केली. बहुतांशी उत्पादन सेंद्रिय पद्धतीनेच घेतले. सर्व भाज्या उत्तम दर्जाच्या मिळाल्या. आता दरवर्षी अडीच एकरांत दोडका, काकडी, भेंडी, गवार, मिरची, पालेभाज्या, कोथिंबीर, टॉमेटो, कारले आदींची हंगामनिहाय लागवड होते. त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न सुरू राहते.

गुलजार यांच्या शेती व्यवस्थापनाविषयी

  • स्वतःची पाच एकर तर ५ एकर जमीन भाडेकरारावर.
  • शेतीत दहा वर्षांचा अुनभव
  • तीन एकरांत ऊस
  • -दोन टप्प्यांत कलिंगड. नोव्हेंबर ते जानेवारी आणि जानेवारी ते मार्च
  • दोन एकरांत हापूस आंबा
  • भाजीपाल्यासह कलिंगड, चिबूड, बोरे आदींची हंगामनिहाय थेट विक्री. खारेपाटण-गगनबावडा मार्गावर तिथवली येथे स्वतःचा स्टॉल. उर्वरित विक्री व्यापाऱ्यांना. स्टॉलमुळे नफ्याचे मार्जिन वाढते. उदा. कलिंगड व्यापाऱ्यांना दिल्यास किलोला ८ रुपये, तर स्टॉलवर दर १५ ते २० रुपये मिळतो.
  • स्टॉलवर भाजीपाल्यास प्रति किलो ४०, ६० ते ८० रू तर कोथिंबीर दहा रुपये जुडी दर मिळतो.
  • महिन्याचे एकूण उत्पन्न ७० हजार रुपये.
  • शेतीत आई रुकसाना, वडील निजाम व पत्नी रेहाना यांचे मोठे सहकार्य

‘ऑर्गोफ्रेश ब्रँड’
पिकांसाठी रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यंत कमी तर कडुनिंब, गोमूत्र अर्क, ताक आदींचा वापर होतो. ‘ऑर्गोफ्रेश’ ब्रँडने कंपनीची नोंदणी केली असून रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला, आंबा, कोकम, काजू ग्राहकांना थेट पोहोचविण्याचा गुलजार यांचा मानस आहे.

भांडवल
सुरुवातीला जमीन शेतीयोग्य तयार करणे, मल्चिंग, ठिबक सिंचन व अन्य सुविधांसाठी गावातील दिर्बादेवी सहकारी संस्थेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले. आता याच संस्थेत किसान क्रेडिट कार्ड सुविधा असून, क्षमता तीन लाख रुपये आहे. मुदतीत रक्कम भरल्यानंतर नूतनीकरण केले जाते.

अन्य प्रयोग
सलग तीन वर्षांपासून चार गुंठ्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग. सध्या खर्चाएवढेच उत्पन्न मिळते. नफा वाढवण्यासाठी यंदापासून शेडनेटमध्ये पीक घेणार. ठरावीक ग्राहक असून, किलोला २५० ते ३०० रुपयांपर्यंत स्ट्रॉबेरीस दर मिळतो.

सुमारे ३५ गुंठ्यांत हळद व भात असा प्रयोग मागील वर्षी केला. त्यातून ४० पोती भात (प्रति ३० ते ३५ किलोचे) तर चार टन हळद उत्पादन मिळाले. हळदीला दिलेली खते भातासाठी उपयोगी पडली.
कोकणात अति पावसाच्या स्थितीत हा प्रयोग फायदेशीर ठरला.

स्वतंत्र ३० गुंठ्यांत ४०० रोपांची लागवड अलीकडेच सघन पद्धतीने केली. यात २० प्रकारचा आंबा, तीन प्रकारचा पेरू, सीताफळ, लिंबू दोन प्रकार असा समावेश. यातही सुरुवातीला कलिंगडाचे आंतरपीक घेतले.

संपर्क- गुलजार काझी ९१७२६४७५२२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...