लिंबाच्या ‘क्लस्टरने सुधारले अर्थकारण

परभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच परिसरातील शेतकरी एकमेकांपासून प्रेरणा घेत लिंबू लागवडीकडे वळले. त्यातून तालुक्यात लिंबू ‘क्लस्टर’ विकसित झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील लिंबाचे क्लस्टर तयार झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील लिंबाचे क्लस्टर तयार झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच परिसरातील शेतकरी एकमेकांपासून प्रेरणा घेत लिंबू लागवडीकडे वळले. त्यातून तालुक्यात लिंबू ‘क्लस्टर’ विकसित झाले आहे. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळाला. तालुक्यातील अनेक गावात लिंबू लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार झाला. शेतकऱ्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळाली.   परभणी जिल्ह्यात कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या सेलू तालुक्यातील शेतकरी काही वर्षापूर्वी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून असत. फळपिकांचे क्षेत्र कमी होते. अनेक शेतकरी लिंबाच्या पाच- दहा झाडांची लागवड बांधावर करीत असत. तालुक्यातील राधेधामणगाव शिवारात हलक्या जमिनीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांपासून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन मिळत नसे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. बी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८-२००४ या कालावधीत राधेधामणगाव येथे रोजगार हमी योजनेतून लिंबू लागवडीवर भर देण्यात आला. मेहनती व अभ्यासू शेतकऱ्यांनी सिंचनस्त्रोताचे बळकटीकरण करून लिंबू लागवड क्षेत्राचा विस्तार केला. उत्पादन व उत्पन्नाची हळूहळू खात्री मिळाल्यामुळे तालुक्यात सुमारे १८ गावात लिंबू लागवड क्षेत्राचा विस्तार झाला आहे. लिंबू क्लस्टरचा विकास राधेधामगाव येथील विनायक गोरे यांच्या वडिलांनी रोजगार हमी योजनेतून १९९८ मध्ये चार हेक्टर क्षेत्रावर लिंबाची लागवड केली. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील रोपवाटिकेतून प्रमालिनी आणि विक्रम जातीच्या लिंबाची रोपे आणून लागवड केली. दरम्यान सन २००२ मध्ये गोरे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत वाहक म्हणून रुजू झाले होते. शेतातील लिंबाचे खात्रीशीर उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली. लिंबू उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. राज्य लिंबू उत्पादक महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष डॅा.आप्पासाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात लिंबू लागवडीसाठी पुढाकार घेतला. नागपूर येथील लिंबू वर्गीय फळपिक संशोधन संस्थेने विकसित केलेल्या वाणांची लागवड केली. सध्या राधेधामणगावमध्ये ६० हेक्टर लिंबू लागवड क्षेत्र आहे. देऊळगावात १५ हेक्टर, खवणे पिंपरी १५ हेक्टर, डासाळा १५ हेक्टर, लाडनांद्रा ५ हेक्टर असे ११० हेक्टर क्षेत्र आहे. स्थानिक तसेच राज्यबाहेरील बाजारपेठेत विक्री सुरुवातीची काही वर्षे सेलू तसेच परभणी येथील मार्केटमध्ये लिबांची विक्री केली जात असे. परंतु लागवड क्षेत्रात वाढ झाली. उत्पादन वाढले. त्यामुळे औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील मार्केटमध्ये लिंबे पाठवली जात आहेत. रेल्वेव्दारे पंजाब मधील अमृतसर, लुधियाना या ठिकाणी लिंबू रवाना होतात., एकरी १५ ते २० ते टनांपर्यंत उत्पादन मिळते. खर्च वजा जाता एकरी एक ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. गोरे हे लिंबू उत्पादनासोबतच विपणनात देखील उतरले आहेत. सेलू येथे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ते लिंबू खरेदी करतात. प्रतवारी करून विविध ठिकाणच्या बाजारपेठेत पोचवली जातात. सेलू तालुक्यातील लिंबू उत्पादक गावे  राधेधामणगाव, डासाळा, देऊळगाव गात, खवणे पिंपरी, लाडनांद्रा, गुगळी धामणगाव, हिस्सी, हदगाव, प्रिंप्रुळा, वाकी, रवळगाव, कुंडी, वालूर, राजवाडा, रायपूर, तांदुळवाडी, कुपटा. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा लिंबू क्लस्टर मुळे पीक व्यवस्थापन ते विक्रीपर्यंत कामे सोपी झाली. काढणीनंतर फळ चार ते पाच दिवस टिकून राहते. त्यास वर्षभर मागणी असते. बाजारभावात फारसे चढ उतार नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. विहिरी, शेततळ्यांच्या कामे करून सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. अनेक शेतकऱ्यांची पक्क्या घरांची बांधकामे केली. मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी खर्च करता आला. प्रतिक्रिया  या पिकाला तुलनेने कमी पाणी लागते. मृग, हस्त, आंबिया बहारामुळे वर्षभर उत्पादन मिळते. स्थानिक तसेच राज्याबाहेरील बाजारपेठेत पोचविण्यासाठी वाहतूक सुविधा असल्यामुळे लिंबू क्लस्टर विकसित झाले. विनायक गोरे, लिंबू उत्पादक, राधेधामणगाव  अन्य फळपिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. उत्पन्नाची खात्री आहे. त्यामुळे शेतकरी लिंबू लागवडीकडे वळले आहेत. मुकुंद गजमल, डासाळा, ता.सेलू लिंबू जास्त टिकून राहते. वर्षभर मागणी असते. त्यामुळे सेलू तालुक्यात लिंबू क्लस्टर तयार झाले. लिंबाप्रमाणे जिल्ह्यात संत्रा, पेरुचे क्लस्टर विकसित झाले आहेत. फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यास शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल. संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com