संशोधक मैत्रिणींकडून मधापासून वाइननिर्मिती, तयार केला ‘सिराना मीडस’ ब्रॅंड

तयार केलेल्या हनी मीडससोबत डावीकडून योगिनी बुधकर व अश्विनी टिळे-देवरे
तयार केलेल्या हनी मीडससोबत डावीकडून योगिनी बुधकर व अश्विनी टिळे-देवरे

परागीभवनासह मध, प्रोपॅलिस, बी वॅक्स आदी औद्योगिक उत्पादनांना विस्तृत बाजारपेठ देण्याची मधमाशीपालन उद्योगाची क्षमता आहे. त्यात नावीन्यपूर्ण उत्पादनाची भर पडली आहे. अश्‍विनी टिळे- देवरे आणि योगिनी बुधकर या युवा महिला संशोधकांनी मधापासून मीड (mead) म्हणजे प्रचलित शब्दात मधापासून वाइननिर्मिती यशस्वी केली आहे. सिन्नर (जि. नाशिक) येथे प्रकल्प उभारून ‘सिराना मीडस’ या ब्रॅंडद्वारे जांभूळ व डाळिंबाचा स्वाद लाभलेल्या या हनी वाइन्स बाजारपेठेत दाखल केल्या आहेत. त्याद्वारे आपल्यातील उद्योजकतेचा प्रत्ययही घडवला आहे.   अश्‍विनी टिळे-देवरे आणि योगिनी बुधकर या दोघी जिवलग मैत्रिणी. गाढ्या संशोधक. मूळच्या नाशिक येथील अश्‍विनी यांनी बीफार्मचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध ‘यूडीसीटी’ संस्थेतून (आताची इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- आयसीटी) ‘बायोप्रोसेस टेक्नॉलाजी’ विषयात ‘पीएच.डी.’साठी प्रवेश घेतला. मुंबईच्या योगिनी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र विषयातून पदवी, प्राणिशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मग यूडीसीटीमध्ये ‘फूड इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट’ ‘पीच.डी.साठी प्रवेश घेतला. इथल्या प्रयोगशाळेत एकाच टेबलवर रसायनांसोबत मैत्री घट्ट होताना त्या दोघींची एकमेकींसोबतही परफेक्ट ‘केमिस्ट्री’ जुळू लागली. संधीने दार ठोठावले योगिनी यांना बीएस्सीला असल्यापासूनच मधमाशी विषयात रस होता. पीएच.डी. सुरू असताना या आवडीला खतपाणी मिळाले. ते म्हणजे इंग्लंडहून आलेल्या एका प्राध्यापक महोदयांनी मधापासून ‘मीड’ (mead) म्हणजेच प्रचलित शब्दात मधापासून वाइननिर्मिती व त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व उलगडून सांगितले. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांत हनी मीड प्रचंड लोकप्रिय असल्याचे समजले. मधमाशीपालन उद्योगात काहीतरी वेगळे करून दाखवण्याची संधी दार ठोठावू लागली. त्यापासून प्रेरित होऊन योगिनी यांनी घरगुती स्तरावर बेकर्स यीस्ट व मसाल्यांचा वापर करून मधापासून वाइन तयार केली. त्याची चव परिचितांच्या पसंतीस उतरली. आता थांबायचे नाही हे निश्‍चित झाले. उद्योजक होण्यासाठी मायदेशी दरम्यान पीएच.डी. झाल्यानंतर अश्‍विनी कॅनडा येथे पोस्ट डॉक्टरेट फेलोशीपच्या आधारे कॅनडा येथे संशोधनात व्यस्त झाल्या होत्या. योगिनी यांनी फोनद्वारे मधापासून वाइननिर्मितीची कल्पना आणि एकत्र काम करण्याची इच्छा मैत्रिणीपुढे व्यक्त करताना भारतात परतण्याची साद घातली. आपल्या उच्च तांत्रिक ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग नोकरीत करण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगासाठी करणे ही गोष्ट अश्‍विनी यांच्यासाठी जास्त महत्त्वाची होती. तात्काळ होकार देत त्यांनी मायदेशाचा रस्ता धरला. मीडनिर्मिती प्रकल्प

  • आज दोघा मैत्रिणींनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसीत ८०० चौरस मीटर जागा भाडेतत्त्वावर घेऊन उभारला हनी मीडनिर्मिती प्रकल्प
  • त्यासाठी ६० ते ८० लाख रुपयांची गुंतवणूक
  • पाच हजार लिटर क्षमतेचा एक, प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेचे दोन असे फरमेंटेशन टॅंक, मिक्सिंग मशिनरी, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, पृथक्करण आदींसाठी सुसज्ज प्रयोगाशाळा
  • टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करणारा इटीपी प्लॅंट, बॉटल सीलिंग मशिनरी असा सेटअप.
  • जांभूळ व डाळिंब स्वादाच्या मीडस

  • उत्तर भारतातील मधमाशीपालकांकडून गुणवत्तापूर्ण व अधिकृत प्रमाणपत्र असलेल्या मधाची काही टनांत खरेदी. त्यातून मधमाशीपालकांनाही मिळाला उत्पन्नाचा मार्ग.
  • प्रकल्पात मधावर होते फरमेंटेशन (किण्वन) प्रक्रिया.
  • त्यातून ‘जामून मेलोमील’ व ‘पोमेग्रेनेट मेलोमील’ अशा दोन प्रकारच्या मीडसची निर्मिती
  • पहिल्या प्रकारात जांभळाचा मध व जांभूळ तर दुसऱ्या प्रकारात जंगलातील मध व डाळिंब ज्यूस यांचा वापर. मध व फळांच्या उत्कृष्ठ ‘कॉम्बिनेशन’मधून मीडला वैशिष्ट्यपर्ण स्वाद व चव.
  • लो अल्कोहोल कार्बोनेडेट व्हरायटीदेखील
  • ॲपीस सिराना या मधमाशीच्या प्रजातीवरून नाव घेत ‘सिराना मीडस’ असे उत्पादनांचे ब्रॅंडनेम
  • मॅंगो मेलोमील उत्पादन प्रक्रियेच्या अवस्थेत
  • उत्पादनांचे प्रमोशन आकर्षक लोगो, आवश्‍यक लेबल्स, फूड सेफ्टी व आवश्‍यक प्रमाणपत्रांसह मीडस बाजारात येण्यास सज्ज झाल्या आहेत. सद्यःस्थितीत बल्क प्रमाणात ‘केग्ज’ (छोटी टाकी व त्याला असलेले कॉक्स) स्वरूपातून विक्री होत आहे. उत्पादनांच्या प्रमोशनसाठी ‘इव्हेंटस’चा आधार महत्त्वाचा ठरला आहे. अलिकडेच पुणे येथे झालेले पेय उत्पादने क्षेत्रातील प्रदर्शन, मुंबई येथील ख्रिसमसच्या निमित्ताने झालेला मोठा ‘इव्हेंट’ या ठिकाणी ‘सिराना मीडस’ उत्पादनांचे दणक्यात मार्केटिंग झाले. ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद अश्‍विनी म्हणाल्या, की वाइन सर्वांनाच प्रचलित आहे. पण, मीड म्हणजे काय हे ग्राहकांना माहीत नसल्याने त्याची प्रक्रिया, रेसीपी, गुणवत्ता अशा सर्व बाबतीत जागरूकता तयार करतो आहोत. मीड ‘टेस्ट’ करण्यास दिल्यानंतर ‘लाजबाव,’ ग्रेट अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया ग्राहकांकडून उमटतात. दोन संशोधक युवती या उद्योगात उतरल्याचे अप्रूपही अनेकांना वाटते. बाजारातील वाइन्सच्या तुलनेत या मीडसच्या किंमतीही ग्राहकांच्या आवाक्यातच ठेवण्यात आल्या आहेत. उत्पादनांना लाभत असलेला प्रतिसाद आमचा उत्साह द्विगुणीत करणारा असून, येत्या काळात मीडच्या मागणीत भरीव वाढ होईल, अशा आशावाद अश्‍विनी व योगिनी प्रकट करतात. मधमाशीपालकांनाही या उद्योगाचा फायदा होणार असल्याची पुस्ती त्या जोडतात.   ...आणि मधाच्या वाइनला मंजुरी दोघी मैत्रिणी म्हणाल्या, की मीडनिर्मिती उद्योग सुरू करायचे निश्‍चित झाले. पण, मधाचे फरमेंटेशन करण्यास कायदेशीर संमती नसल्याचे लक्षात आले. वाइनच्या व्याख्येत वा ‘कॅटॅगिरी’त त्याचा समावेशच नव्हता. मग २०१७ मध्ये आम्ही मंत्रालयात उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलो. सर्व बाबींचा अभ्यास व युवा महिला उद्योजक नावीन्यपूर्ण काही करण्याची प्रबळ इच्छा घेऊन प्रयत्नशील आहेत, हे जाणून बावनकुळे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले. त्यानंतर दोन महिन्यांमध्येच ‘जीआर’ पास झाला आणि मीडनिर्मितीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला, हे सांगताना दोघींच्या चेहऱ्यावर विजय संपादन केल्याचा आनंद पसरला होता. मीड आणि वाइन- फरक द्राक्ष किंवा फळांच्या रसाचे फरमेंटेशन केल्यानंतर त्यास वाइन संबोधले जाते. मधाचे फरमेंटेशन केल्यानंतर त्यास तांत्रिकदृष्ट्या मीड म्हटले जाते. मात्र हनी वाइन हाच शब्द रूढ झाला आहे. मात्र तो योग्य नसल्याचे योगिनी सांगतात. अथक कामांची फलश्रुती अथक परिश्रम, जगभरातील ज्ञानाचा व्यासंग, संशोधक वृत्ती, नवे शिकण्याची धडपड, आव्हानांना सामोरे जात नवे करण्याची ऊर्मी या गुणांच्या आधारेच उद्योगाची वाटचाल दोघा मैत्रिणींसाठी सुकर झाली. दोघींचे पती सॉप्टवेअर इंजिनिअर. उद्योग आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी दुहेरी कसरत करताना घरच्यांची मदत त्यांना फार मोलाची ठरली आहे. मधमाशीपालन विषयातील तज्ज्ञ डॉ. तुकाराम निकम यांचेही मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. संपर्क- - अश्‍विनी टिळे-देवरे - ९८९२७७९६५६ - योगिनी बुधकर - ९८२०८७०९८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com