आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात आम्ही भारी

मधमाशीपालन हा परागीभवन व मधनिर्मिती अशा दोन्ही अंगांनी महत्वाचा व्यवसाय आहे
मधमाशीपालन हा परागीभवन व मधनिर्मिती अशा दोन्ही अंगांनी महत्वाचा व्यवसाय आहे

नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच राज्यस्तरीय मधमाशी परिसंवाद (मधुक्रांती) यशस्वी पार पडला. मधमाशीपालक, शेतकरी, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, प्रक्रिया उद्योजक आदींची मोठी उपस्थिती या वेळी लाभली. मधमाशीपालन उद्योगात दीर्घ अनुभव असलेल्या, आघाडीच्या व यशस्वी काही निवडक मधमाशीपालकांशी संवाद साधून ॲग्रोवनने त्यांचे अनुभव, यश, समस्या या बाबी या वेळी जाणून घेतल्या. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी त्या मोलाच्या व पथदर्शक राहतील. साडेतीनहजार मधुपेट्यांचा व्यावसायिक शेतकरी उत्तर प्रदेशात सूप (जि. बागपत) येथील संजीवकुमार तोमर यांचे नाव मधमाशीपालन उद्योगात देशपातळीवर घेण्यात येते. यमुना नदीपासून सुमारे १० किलोमीटरवर असलेला त्यांचा हा भाग संपूर्ण ऊसशेतीचा पट्टा आहे. साहजिकच परिसरात मधमाश्यांसाठी फुलोरा असणे दुर्मीळ. अशा ठिकाणी मधमाशीपालनाचे धाडस तोमर यांनी केले. सन १९९६ मध्ये ते पदवीधर झाले. त्याकाळात मधमाशीपालनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत कमी दर्जाचा होता. झाडावरून मधाचे पोळे काढायचे, ते बादलीत ठेवायचे, पिळायचे, मध काढायचा आणि गल्लोगल्ली फिरून तो विकायचा म्हणजेच मधमाशीपालन असे समजण्यात येई. एकतर उसाचा पट्टा, त्यात वडील उत्तम शिक्षक, त्यामुळे हा व्यवसाय स्वीकारून चांगल्या घरातील शिक्षकाचा मुलगा चुकीच्या मार्गाला लागला अशी अवहेलना तोमर यांच्या वाट्याला येऊ लागली. निश्‍चित केलेली दिशा पण दिशा आणि ‘व्हीजन’ पक्के होते. वडिलांकडून सातहजार रुपये घेऊन दहा मधुमक्षिका पेट्या खरेदी केल्या. त्या काळात २२ ते २३ रुपये प्रति किलो दराने मध विकला जायचा. पंजाबातील एका निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी परिचय झाला. मार्केट लक्षात येऊ लागले. तीन किलोमीटर परिसरातील ऊसशेतीच्या आसपासच्या झाडांच्या आधारे १० पेट्यांतील मधमाश्यांना फुलोरा मिळायचा. हळूहूळू पेट्यांची संख्या ५० पर्यंत पोचली. आता पुरेसे खाद्य उपलब्ध होणे गरजेचे होते. दरम्यान भूगोलाच्या प्राध्यापकांनी जयपूरला जाऊन त्यांनी संग्रहित केलेल्या दगडांचे ‘कटींग’ करून आणण्याचे काम सोपवले. त्या प्रवासात आजूबाजूला सर्वत्र मोहरीचे विस्तीर्ण शिवार दृष्टीस पडले आणि मधमाश्यांच्या खाद्याचा प्रश्‍न सुटल्याचे जाणवले. स्थलांतराचे अनुभव साधारण १९९७ ची ही गोष्ट. राजस्थानात जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या शेतात मधपेट्या ठेवण्यास सुरुवात केली. पण पिकांच्या फुलांतील रस मधमाशी शोषून घेईल आणि उत्पादन कमी होईल या भीतीने त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पण तोमरही निश्‍चयाचे होते. त्यांनी शेतकऱ्यांसोबत करार केला. मागील वर्षी प्रति एकरी जेवढे उत्पादन तुम्हाला मिळाले त्यापेक्षा कमी उत्पादन पेट्या ठेऊन आले तर ते मी भरून देईन असा शब्द दिला. आणि त्यापेक्षा जास्त उत्पादन मिळाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असेही ठरले. तोमर म्हणतात की आम्ही शेतकरी आहोतच. आमच्यात समाजसेवकाची भावनाही दडलेली आहे. प्रत्येकवेळी आम्ही व्यापार पाहात नाही. परागीभवनातून पिकांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकला आणि व्यवसाय वाढीस लागला. फुलोरा

  • राजस्थानात मोहरी, बडीशेप, ओवा ही पिके, कोटा भागात कोथिंबीर, मध्य प्रदेशात बरसीम तर पंजाबात सूर्यफूल असते. जम्मू- काश्‍मीर, हिमाचल येथेही मल्टीफ्लोरल (विविध वनस्पतींचा फुलोरा)
  • यशाचा आलेख

  • वडिलांकडून सातहजार रुपये घेऊन १० मधपेट्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज
  • तब्बल साडेतीनहजार पेट्यांपर्यंत येऊन ठेपला आहे.
  • वीस व्यक्तींना रोजगार
  • वार्षिक मध उत्पादन (वनस्पती व फुलोऱ्यावर अवलंबून) -१०० ते १२५ टन.
  • (एपीस मेलिफेरा मधमाशीचा वापर)
  • सर्व मधाची होते विक्री.
  • सुरुवातीला मार्गदर्शनासाठी तोमर कृषी विभागाकडे गेले असताना आधी घरच्यांची संमती घ्या. हा व्यवसाय करण्याऱ्यांचे लग्न होणे कठीण असते. समाजात या व्यवसायाला स्टेटस नाही असे सांगण्यात आले. मात्र एकेकाळी बकेटमध्ये पोळे ठेऊन रस्त्यांवरून फिरून विक्री करण्याची या व्यवसायाची प्रतिमा तोमर यांनी जिद्दीने सुधारली.
  • शास्त्रीय दृष्ट्या पेट्यांद्वारे मधमाशीपालन व स्वच्छ, आरोग्यदायी मध व अन्य घटकांचे संकलन करण्याचे तंत्र अवलंबून त्याचा प्रसार केला. अमेरिकेत निर्यात करून मधाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व पटवून दिले.
  • सहा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुरुवातीला वडिलांकडून घेतलेल्या रकमेनंतर पुढे कधीच त्यांच्याकडून पैसे घेण्याची वेळ आली नाही. सन १९९९ मध्ये या व्यवसायातून फोर व्हीलर घेतली. एकेकाळी हिणवणारे लोक मधमाशीपालनाबाबत मार्गदर्शन मागू लागले. परिसरातील १०० ते १५० शेतकरी प्रशिक्षण घेऊन आज या व्यवसायात यश मिळवू लागले आहेत. भारतात सहाहजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यातील एकहजार ते बाराशे शेतकरी हा व्यवसाय करीत आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले असून येथील शेतकऱ्यांना उत्तर भारतात मधमाशीपालन फार्म्सना मोफत भेटी घडवल्या आहेत. ग्रामस्थांनी निवडणुकीत उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेत सर्वांत कमी वयाचा सदस्य म्हणून निवडून आलो. मग बिनविरोध जिल्हा नियोजन सदस्य आणि एक वर्ष सरकारच्या ‘टास्क फोर्स’मध्ये काम केले. हे सर्व मधमाशीपालनातून घडल्याचे तोमर अभिमानाने सांगतात. मध, अन्य घटक व उत्पन्न

  • मध- मध्यंतरीच्या काळात १५० ते १६० रुपये प्रति किलो असलेला दर मागील वर्षी एकदम खाली घसरून ६५ ते ८० रुपयांवर आला. व्यापारी घेण्यास उत्सुक नव्हते. अशावेळी खूप नुकसान सोसावे लागते. बनावट मध निर्मिती व्यावसायिकांनी बाजारपेठ व दरांवर मोठा परिणाम केल्याचे तोमर सांगतात.
  • तोमर यांच्याकडे रॉयल जेली वगळल्यास पोलन, बी वॅक्स, प्रोपॅलीस, बी व्हेनॉम (मधमाशीचे वीष)
  • आदी सर्व वेगळे करण्याचे तंत्रज्ञान आहे.
  • विक्री
  • पोलन (पराग)- ७०० ते ८०० रुपये प्रति किलो-आंतरराष्ट्रीय बाजारातील दर १५०० ते १६०० रू.
  • प्रति वसाहतीपासून पाच किलो पोलन मिळतात.
  • प्रोपॅलीस- दातांच्या उपचारांसाठी तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधनांमध्ये हा घटक उपयोगात.
  • बी वॅक्स

  • दर- २२० ते २५० रुपये प्रति किलो
  • त्यापासून वॅक्स शीट बनते. सौंदर्यप्रसाधानतही वापर.
  • बी व्हेनोम (मधमाशीचे विष ४० वसाहतींपासून एक ग्रॅम व्हेनॉम मिळते. १५ दिवसांतून एकदा असे महिन्यातून दोनवेळा काढता येते. एरवी मधमाशीने डंख मारला की काटा आपल्या शरीरात घुसतो. मधमाशी मरण पावते. मात्र ती सुरक्षित राहावी व वीषही मिळावे यासाठी आता सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर होतो. यातील उपकरणात काचेची प्लेट असते. बॅटरीचा करंट दिल्यानंतर शत्रू आहे असे समजून मधमाशी डंख मारते. मात्र तिचा काटा काचेत घुसत नाही. तिने बाहेर सोडलेले विष काचेवर पसरते. सूर्यप्रकाशात सुकवून पद्धतशीरपणे ते संकलित केले जाते. ही प्रक्रिया ४० मिनिटांची असते. आंतरराष्ट्रीय बाजारात ७००० रुपये प्रति ग्रॅम म्हणजे सोन्यापेक्षा ते महाग विकले जाते. मात्र मधमाशीपालकाला ३००० ते ३५०० रुपये दर मिळत असल्याचे तोमर सांगतात. औषधनिर्मिती कंपन्यांमधून त्यास मागणी असते. निर्यातीत ४५ लाखांचा फटका सन २०१५ मध्ये मधाचे १० कंटेनर (प्रति कंटेनर १८. ६ टन क्षमता) अमेरिकेत निर्यात करण्यापर्यंत तोमर यांनी बाजी मारली खरी. पण मध्यस्थ व्यापाऱ्याने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा कमी दर सांगून फसवणूक केली. यात तब्बल ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. किमान तीन वर्षे निराशेत घालवली. त्यातून शिकून पुन्हा जिद्दीने उभारी घेतल्याचे तोमर म्हणाले. समस्या तोमर सांगतात की दरवर्षी लांबलचक प्रवास करून अन्य राज्यांत मधमाश्या वसाहतींचे स्थलांतर करावे लागते. तेथील शेतकऱ्यांच्या शेतात तंबू ठोकून राहावे लागते. त्यासाठी नेमलेल्या माणसांचे पगार, त्यांची भोजन व्यवस्था, वाहनात पेटी चढवणे, उतरवण्याचा खर्च, पेटीत वॅक्स शीट, फ्रेम व्यवस्था आदी असंख्य खर्च असतात. त्या तुलनेत मधला मिळणारा दर अत्यंत कमी आहे. पेट्या नव्हे मधमाशी घर मधपेट्या हा शब्द चुकीचा असून त्याला मधमाशीगृह असेच संबोधले पाहिजे असा आग्रह तोमर धरतात. संपर्क- संजीवकुमार तोमर- ०८७४४०६६६७६   शेतीपेक्षा सरस ठरले मधमाशीपालन जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील ढालसिंगे येथील विद्यानंद अहिरे यांची केवळ दोनच एकर शेती. तेवढ्यातून पुरेसे उत्पन्न घेता येत नसल्यानेच त्यांनी २०१२ पासून भागीदारीतून मधमाशीपालन सुरू केले. आज त्यांच्याकडे दोनशे मधपेट्या आहेत. फुलोरा, हवामान व स्थलांतर या बाबी अनुकूल ठरल्या तर ॲपीस मेलिफेराच्या प्रति पेटीतून वर्षाला २५ ते ४० किलोपर्यंत मध मिळतो असे ते सांगतात. उत्तर भारतातील व्यावसायिक त्यांच्याकडून मध खरेदी करतात. अहिरे यांनी २० शेतकऱ्यांचा गटही तयार केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मध असा मिळवतात

  • वर्षातील तीनही हंगामातील पिकांनुसार मधपेट्यांचे स्थलांतर
  • राजस्थानात खरिपात बाजरी, तीळ. पावसाळ्यानंतर राजस्थान, पंजाब, हरियाणात मोहरी
  • त्यानंतर फेब्रुवारीपासून ओवा, धणे. एप्रिलनंतर हिमाचल प्रदेशात कढीपत्ता, जंगली फुलोरा
  • तिथे काही दिवस वास्तव्य करून जम्मू काश्मीर भागात जूनमध्ये मल्टीफुलोरा
  • महाराष्ट्रात फुलोऱ्याच्या संधी

  • परागीभवनासह मकरंद देऊ शकणाऱ्या वनस्पतींची अहिरे यांनी सांगितलेली नावे
  • चिंच, निलगिरी, जांभूळ, सुपारी, कढीपत्ता, हिरडा, बेहडा, आवळा, जंगली बोर, सुबाभूळ
  • काही वेलवर्गीय, रानटी, काही फूलवर्गीय गवती वनस्पती
  • जंगले वाढली तर फुलोरा वाढेल. रस्ते विकासात जी झाडे लावली आहेत ती मधमाश्यांना फुलोरा देणारी नाहीत. नदीकाठचे पट्टे, माळरानावर झाडे जगवली तर पोषक फुलोरा तयार होईल.
  • अहिरे म्हणतात

  • मधमाशीपालनातून मिळणारी सर्व उत्पादने उच्च मूल्याची. त्यामुळे उद्योजक होण्याची संधी.
  • रीतसर शास्त्रीय प्रशिक्षण व व्यवस्थापनाची गरज. त्यानुसार सुशिक्षित तरुणांनी आधुनिक तंत्रासह व्यवसायात उतरायला हवे.
  • एका वर्षात गुंतवलेली रक्कम मिळू शकते. तिसऱ्या वर्षापासून व्यवसाय सुरळीत सुरू होऊ शकतो.
  • शासनाकडून प्रोत्साहनपूर्वक पाठबळ हवे. बॅंका भांडवल देण्यासाठी दारात उभ्या करीत नाहीत हा विदारक अनुभव
  • समस्या-

  • राज्यात हवी तशी फुलोऱ्याची विविधता नसल्याने एका ठिकाणी राहून व्यवसाय करता येत नाही.
  • स्थलांतराच्या एका खेपेमागे पेट्यांचे लोडींग, अनलोडिंग यावर २५ ते ३० हजार रुपये खर्च होतो.
  • पाच ते सहा खेपांमागे दीड लाख रुपये खर्च होतो. दोन महिने राहण्या-खाण्याचा खर्च
  • असतो. ऊन, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता काम करावे लागते.
  • संपर्क- विद्यानंद अहिरे- ९०६७१०१३८१   सेंद्रिय प्रमाणित मध व चॉकलेट हनी महाबळेश्‍वर मधोत्पादक सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक महादेव जाधव सांगतात की १९५५ सालापासून खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहयोगाने सुरू असलेली राज्यातील पहिलीच संस्था म्हणून आमचे नाव घेता येईल. खादी ग्रामोद्योगचे तत्कालीन अधिकारी वि.स. पागे, गुजरातमधील विरजीभाई, महाबळेश्‍वरातील शेतकरी शिंदे, माळी आदींनी एकत्र येऊन संस्था स्थापनेस हातभार लावला. हाताने पिळून मध काढण्याच्या पद्धतीला छेद देत शास्त्रीय दृष्ट्या मधनिर्मिती सुरू केली. आज आमच्या सातारा जिल्ह्यात तीन तालुक्यांतील ११० गावांतील १७०० मधमाशीपालक संस्थेचे सदस्य आहेत. आम्ही सातेरी मधमाशीचे संगोपन करतो. महाबळेश्‍वर भागात जंगल भरपूर असल्याने विविध फुलांपासून मध घेतला जातो. त्यामुळे पेट्यांच्या स्थलांतराची भासत नाही. जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहतो. शेतकऱ्यांना चांगला दर किलोला ४०० रुपये असा सर्वाधिक दर आम्ही सदस्यांना देतो. प्रक्रिया व बॉटलींग करून त्यांचा मध मधुसागर ब्रॅंडने विकतो. महाबळेश्‍वर व परिसरातील पर्यटन ठिकाणे हेच आमचे ७० टक्के मार्केट आहे. नावीन्यपूर्ण उत्पादने

  • मध आवळा कॅंडी हे नवे उत्पादन आहेच. शिवाय सेंद्रिय प्रमाणीकरण केलेला मध अलिकडेच बाजारात आणला आहे. किलोला एकहजार रुपये दराने त्याची विक्री सुरू केली असून त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.
  • हनी चॉकलेट- मध्यभागी मध व बाजूंनी चॉकलेट असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन अलिकडेच बाजारात आणले आहे. तोंडात ठेवता क्षणीच त्यातून मध बाहेर येतो.
  • वर्षभर येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांच्या गरजेचा अभ्यास करून उत्पादनांची निर्मिती करतो.
  • उल्लेखनीय कामगिरी

  • वर्षिक उलाढाल- सात ते आठ कोटी रू.
  • संस्था ए वर्गात. दरवर्षी नफ्यात. नफा सदस्यांना वितरित.
  • पंधरा वर्षे सातत्याने सदस्यांना १५ टक्के डिव्हीडंड.
  • महाराष्ट्र शासनाकडून सहकारभूषण पुरस्काराने सन्मान (२०१५)
  • समस्या

  • राज्यातील बहुतांश मध उत्पादन वन्य झाडांपासून. साहजिकच त्यास जास्त दर द्यावा लागतो.
  • अन्य राज्यात पिकांच्या आधारे मध घेण्यात येतो. त्याचा दर कमी असतो.
  • अवेळी पाऊस, वारा, गारपीट, निसर्गाचा कोप झाला तर उत्पादनावर परिणाम होतो.
  • संपर्क- महादेव जाधव- ९४२३८१६६१७    पेट्या पुरवण्याचा फायदेशीर व्यवसाय देऊळगाव सिद्धी (ता. जि. नगर) येथील नानासाहेब इंगळे २०१२ पासून मधमाशीपालन व्यवसायात आहेत. त्यांनी २०१४ मध्ये महाबळेश्‍वर येथे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला ५० पेट्या होत्या. आता ५०० पर्यंत त्याचा विस्तार केला आहे. पेट्यांच्या स्थलांतरासाठी त्यांनाही उत्तर प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी सहा महिने मुक्काम करावा लागला आहे. आता तीन कामगार ठेऊन हे काम सुलभ केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुपेट्या भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायावर अधिक भर देत उत्पन्नवाढ साधली आहे. जिल्ह्यातील २५० ते ३०० शेतकरी त्यांच्या नेटवर्कमध्ये आहेत. जवळपास सर्व डाळिंब बागायतदार आहेत. मधमाशीचे शास्त्रीय व यशस्वी संगोपन, परागीभवनाचे महत्त्व याबाबत ते जागृती करतात. त्यातून मधमाश्या मरण्याचे प्रमाण कमी केले आहे. बागायतदारांकडे पेट्या ठेवल्यानंतर परागीभवन यशस्वी करून देण्याची जबाबदारी ते घेतात. पंधरा दिवसांनी त्या ठिकाणी जाऊन पेटी साफ करणे, मधमाश्यांचे आजार तपासणे तसेच अन्य सेवा देतात. त्यातून बागायतदारांचा विश्‍वास त्यांनी संपादन केला आहे. साधारण १०० किलोमीटर अंतरासाठी पेटीमागे २५०० रुपये भाडेशुल्क असते. यात पेट्या ठेवणे, मध्यंतरीची भेट व पेट्या घेऊन जाणे असे तीन वेळा येणे-जाणे होते. यातील कष्टाची बाब म्हणजे हे काम रात्रीच करावे लागते. मधाचा हेमंतगिरी ब्रॅंड त्यांनी तयार केला आहे. या ब्रॅंडने वर्षाला ७०० किलोपर्यंत तर विनाब्रॅंड दीड ते दोन टनांपर्यंत विक्री होते. शेतकऱ्यांचा गटही तयार केला आहे. फुलोरा- इंगळे म्हणतात की तेलबिया पिकांत मध चांगला मिळतो. मराठवाडा, विदर्भात तूर, कपाशी आहे. त्यासूनही चांगला मध मिळतो. वर्ध्यात रानतुळस चांगली आहे. डाळिंबाचा प्लॉट उत्तम असेल तर त्यातूनही काही प्रमाणात मध मिळतो. समस्या पेट्या भरत आल्याच्या काळात हवामान ढगाळ वा दूषित झाले असेल तर मध काढता येत नाही. त्यास विलंब झाल्यास मधमाशी मध पिऊन घेते. त्यात नुकसान होते. दुसऱ्या राज्यात स्थलांतर करताना संबंधित विभागाने वाहन अडवल्यास वेळेचा अपव्यय होतो. यावर उपाय म्हणून अत्यावश्‍यक सेवा म्हणून हा व्यवसाय घोषित करून मधमाशीपालकांना अधिकृत ‘आयडेंटी कार्ड’ द्यावे अशी मागणी त्यांनी केली. संपर्क- नानासाहेब इंगळे- ९३०९८७२११८   आग्या मधमाशीपालनाचे मॉडेल वर्धा येथील ‘सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट’ या स्वयंसेवी संस्थेचे डॉ. गोपाल पालिवाल सचीव आहेत. सर्वांत रागीट वा भीतिदायक वाटणाऱ्या आग्या मधमाश्यांपासून (रॉक बी) मधाचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान व साधनसामग्री संस्थेने विकसित केली आहे.  

    मधमाशीविषयी

  • ॲपीस डॉरसेटा हे शास्त्रीय नाव
  • जंगलात मोठ्या झाडांवर, पहाडांवर घरटे करून राहते. पेट्यांमध्ये संगोपन करता येत नाही किंवा पाळता येत नाही. शास्त्रीय व्यवस्थापन मात्र करता येते.
  • उंच झाडावरील घरट्याला इजा पोचणार नाही या पद्धतीने मध काढावा लागतो. त्यासाठी योग्य व्यक्तींना चार- पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. झाडांवर कसे चढायचे? त्यातील घरट्यात मधाचा कांदा शोधून तेवढाच कसा कापायचा? दोऱ्याच्या साह्याने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर कसे जायचे? त्याचाच वापर करून झाडावरून खाली उतरायचे आदी बाबींत हे लोक प्रशिक्षित होतात. मधमाशी रागीट असल्याने संरक्षक पोशाषही देण्यात येतो. मधकांद्यांवर प्रक्रिया, मधाचे शुद्धीकरण, बॉटलींग पॅकिंग होते. या युनिटला ‘लो कॉस्ट हनी हाउस असे नाव दिले आहे. या उपक्रमातून ग्राहकांना उच्च गुणवत्तेचा मध मिळतो तर उत्पादकाला रास्त दर मिळतो. चार हजार आदिवासींचे नेटवर्क

  • महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आदी सात- आठ राज्यांतील २७ जिल्ह्यांत चार हजार आदिवासींपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रसार व लो कॉस्ट हनी हाउसची उभारणी 
  • वर्ध्यातील संस्थेत वर्षाला १२ टन तर देशभरात मिळून १२५ टन मधाचे उत्पादन
  • त्यातून पूर्वी २५०० ते ३००० रुपये कमावणारा आदिवासी १५ हजारांपासून ते ५५ हजारांपर्यंत हंगामात कमावत आहे.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रात ड्रीमहनी, सेवाग्राम निसर्ग हनी, अरण्यमधु, अपेक्षा आदी ब्रॅंड तयार झाले. -उत्पादनाला ‘फूड सेफ्टी’, ॲगमार्क आदी प्रमाणीकरण देण्याची व्यवस्था
  • रोजगारनिर्मितीसह मधमाश्यांचे संवर्धन व त्यांची संख्या प्रचंड वाढवण्यात यश.
  • फुलोरा

  • आवळा, हिरडा, बेहडा, करंज, पळस, आरोळी, चारोळी, काटेसावर, कडुनिंब, येन आदी वनस्पती
  • यांचे रोपवन ‘सोशल फॉरेस्टी’च्या माध्यमातून करता येते. त्यातून मधमाश्यांना पुरेसे खाद्य (नेक्टर व पोलन्स) मिळू शकेल. अशी मिश्रशेती केल्यास पाळीव मधमाश्यांचे पेट्यांद्वारे होणारे स्थलांतर थांबवणे शक्य होते. आग्या मधमाश्या मात्र स्थलांतरवादी आहेत. उन्हाळ्यात त्या जंगलात असतात. तर थंड काळात त्या पठारावर येतात.
  • समस्या- मध काढण्यासाठी दुर्गम जंगलात जावे लागते. त्यासाठी आदिवासींना खडतर पायपीट करावी लागते. रात्री काम करायचे असल्यास अस्वल, वाघांचा धोका असतो. ‘कम्युनिकेशन’ ही मोठी समस्या. झाडांवरून कोणी पडला तर जीवित हानी होऊ शकते. संपर्क-डॉ. गोपाल पालिवाल-९४२३४२०४८५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com