रडायचं नाही, लढायचं...दुष्काळातही ७० एकरांत फळबाग शेतीतील उत्साह 

दुष्काळाशी लढा कायम अनेक वर्षांपासून साळुंकेकुटुंब दुष्काळाशी लढते आहे. अनेकवेळा टॅंकरद्वारे पाणी आणून डाळिंब, पेरू, चिकूच्या बागा जगवल्या. वाढवल्या. मोसंबीची बाग काढावी लागली. अन्य फळांची झाडेही काढावी लागली. सध्याही सर्व फळांची झाडे केवळ जगविण्याचे किंवा वाचविण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही स्थितीत रडायचं नाही, लढायचं हाच मंत्र वडिलांनी दिला. तो पुढेही आचरणात आणतोय असे अनिल यांनी सांगितले.
सुदामआप्पा साळुंके यांनी दुष्काळातही डाळिंब व अन्य पिके जगवण्याचा प्रयत्त्न केला आहे.
सुदामआप्पा साळुंके यांनी दुष्काळातही डाळिंब व अन्य पिके जगवण्याचा प्रयत्त्न केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गोलटगाव येथील सुदामआप्पा साळुंके यांनी अतीव कष्ट, अभ्यासातून विविध पिकांसह ७० एकरांत फळबाग केंद्रित शेतीचा आदर्श उभारला. शेळीपालन केले. अनिल व अजय या दोन्ही मुलांनी वडिलांचा वारसा चालू ठेवला. 'रडायचं नाही, लढायचं' हाच मंत्र जपत दुष्काळाशी अखंड लढत साळुंके परिवाराने शेतीत आजही उत्साह कायम ठेवला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील गोलट येथील कृषिभूषण सुदामआप्पा निवृत्ती साळुंके यांचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांची ७० एकर शेती आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अनिल व अजय ही दोन मुले शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थात वयाची पंचाहत्तरी गाठूनही सुदामआप्पा आजही  शेतीत व्यस्त असतात.  साळुंके यांची शेती 

  • एकूण शेती ७० एकर 
  • सुमारे १२ एकर डाळिंब, ३०० आवळा झाडे, पेरू- दोन हजार झाडे- सघन पद्धतीने 
  • फळबागांची नर्सरी 
  • खरीप, रब्बीची पिके 
  • येत्या काळात ‘कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंग’ पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्याची तयारी 
  • मोठ्या प्रमाणात शेती असल्याने मजुंराचा प्रश्‍नही असतो. परंतु, शक्य तसे मजूर मिळवून तसेच शेतात स्वत: राबण्याला प्राधान्य. 
  • शेतीतील ठळक बाबी 

  • डाळिंबाची बारा एकरांवर बाग. एकवेळा दुबईलाही निर्यात. एकरात सात ते आठ टनांपर्यंत उत्पादन मिळते. 
  • चाळीस वर्षांपासून शंभरावर चिकू झाडे. ३० बाय ३० फूट अंतरावर मोठ्या डौलाने उभी आहेत. किमान ६० ते ७० हजार रुपये उत्पन्न ही बाग देते. पूर्वी आठशे झाडे होती. यंदा पाण्याच्या संकटामुळं सातशे झाडे काढावी लागली. 
  • आवळ्याची सुमारे ३०० झाडे. सुमारे १५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळणारी ही झाडे वर्षाला किमान ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न देतात. 
  • सुमारे पाच वर्षांपूर्वीची दोन एकरांवर पेरूची सघन लागवड. प्रतिझाड ३० किलो याप्रमाणे उत्पादन तर वर्षाला ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेतेले आहे. 
  • बांधावर चिंचेची सुमारे ३०० झाडे. प्रत्येक झाड वर्षाला लाखभर रुपयांचे उत्पन्न देते. 
  • केशर आंब्याची २५ तर सागाची ४०० झाडे 
  • नर्सरीचा आधार  सुमारे २०१० पासून डाळिंब रोपनिर्मिती व विक्रीचं काम साळुंके करतात. आंबा व चिकू कलमांचे कामही केले. यंदा दहा ते पंधरा हजार आंबा कलमे करण्याचा संकल्प आहे. लागणारे मदर प्लॅंट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून (परभणी) आणण्यात येतात. नर्सरी वर्षाला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न देते. दरवर्षी ३० ते ३५ हजार रोपांपर्यंत निर्मिती पूर्वी व्हायची. यंदा पाणीटंचाईमुळे केवळ १५ ते २० हजार रोपांचीच निर्मिती करणं शक्‍य झालं.  बांबूची पंधरा हजारांवर बेटे  ओढ्याकाठी असलेली विहीर खचल्याने ओढ्याच्या काठावर जवळपास एक हजार बांबू रोपांची लागवड सुदामआप्पांनी ४० वर्षांपूर्वी केली. सध्या ४० फूट लांबीचा बांबू ५० रुपये दराने विकण्यात येतो.  तोडणी खर्च काढणाऱ्याकडेच असतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.  पाण्यासाठी संघर्ष  एक कोटी लिटर क्षमतेची दोन व ८० लाख लिटर क्षमतेचे शेततळे आहे. दोन शेततळ्यांसाठी स्वखर्च केला. आज दुष्काळात त्यात अत्यंत कमी पाणी आहे. नाही म्हणायला त्यात मत्स्यपालनाचही प्रयोग केला आहे. आजवर आठ विहिरी व जवळपास पंधरा बोअर्स घेतले. पाण्यासाठी संघर्ष आजही सुरूच आहे.   

    पुरस्कारांनी गौरव  सुदामआप्पांना शेतीनिष्ठ, कृषिभूषण, दूध उत्पादन, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र विकास आदी विषयांसाठीही पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्या कामांमुळे हा सन्मान झाला त्या मातीशी प्रामाणिक राहण्याचं काम त्यांची पुढची पिढी करते आहे. यांत्रिकीकरण जपताना दोन ट्रॅक्‍टर्स, ब्लोअर, मशागत, पेरणीची ट्रॅक्‍टरवरील सर्व अवजारे आहेत.  उस्मानाबादी शेळीपालन  शेतीला उस्मानाबादी शेळीपालनाची जोड दिली. एप्रिल २०१६ मध्ये बारा शेळ्यांपासून सुरू झालेला हा ‘गोटफार्म’ आता १०६ शेळ्यांपर्यंत पोचला आहे. बंदिस्त शेळीपालनाचा विचार डोक्‍यात होता. प्रसंगानुरूप आपल्याच शेतात चराईचा मार्ग निवडला आहे. आजवर ५५ बोकडांची विक्री केली आहे. सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून शेड उभारले. यात शेळ्यांसाठी स्वतंत्र कक्ष व पाण्याची स्वयंचलित सोय केली आहे. प्रत्येक शेळीला टॅगिंग केले आहे.   

    ठळक बाबी 

  • सन २००८-०९ च्या दरम्यान महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस. जी. जमीर यांनी सुदामआप्पांच्या शेतीला भेट देत त्यांच्या प्रयोगशीलतेची प्रशंसा केली होती. 
  • नवे प्रयोग, अवजारे, बियाणे, खते, हवामान अंदाज, पावसाच्या नोंदी आदी बाबींना कायम प्राधान्य. 
  • काळानुरूप पीक पद्धतीत बदल करण्याला प्राधान्य. 
  • संपर्क-  सुदामआप्पा साळुंके - ९६२३५०९००८, ९४२१४३०५१०  - अनिल सुदामआप्पा साळुंके- ९८२२७९०३३५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com