शेतमाल निर्यातीसाठी ‘हॉर्टीनेट` प्रणाली

शेतमाल निर्यातीसाठी ‘हॉर्टीनेट` प्रणाली
शेतमाल निर्यातीसाठी ‘हॉर्टीनेट` प्रणाली

सन २०१६-१७ पासून राज्यात ग्रेपनेट, मॅंगोनेट, अनारेनेट व व्हेजनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर कार्यप्रणालीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी या वर्षापासून सर्व सेवा सेवा हमी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या अाहेत.

निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीडनाशके उर्वरित अंशाची हमी देण्यासाठी राज्यात सन २००३-०४ पासून द्राक्ष बागांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन ग्रेपनेट प्रणालीच्या धर्तीवर आता आंब्यासाठी मॅगोनेट, डाळिंबासाठी अनारनेट आणि भाजीपाला पिकांसाठी व्हेजनेट प्रणाली विकसित करण्यात आली. या सर्व प्रणाली अपेडा संस्थेच्या संकेतस्थळावर हॉर्टीनेट या नावाने एकत्रित उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कृषी मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सन २०१६-१७ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत हॉर्टीनेटची अंमलबजावणी करण्यात येत आहे

हॉर्टीनेटची अंमलबजावणी

हॉर्टीनेट कार्यक्षेत्र
ग्रेपनेट (द्राक्ष)   सर्व जिल्हे
अनारनेट (डाळिंब)   सर्व जिल्हे
मॅंगोनेट (आंबा)   सर्व जिल्हे
व्हेजनेट (भाजीपाला)    सर्व जिल्हे
  • हॉर्टीनेटअंतर्गत नोंदणी केलेल्या बागेतील शेतमालास कीडनाशके उर्वरित अंशाची युरोपीय संघाला हमी देण्यासाठी द्राक्ष, डाळिंब, आंबा व भाजीपाला या पिकांसाठी कीडनाशक उर्वरित अंश आणि किडींच्या व्यवस्थापनासाठी अपेडा संस्थेमार्फत दरवर्षी आराखडा तयार करण्यात येतो.
  • आराखड्यानुसार निर्यातक्षम फळबाग/ शेताची नोंदणी, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे, बागेची/ शेताची तपासणी, शेतकऱ्यांना उत्पादन पद्धती, कीडनाशक लेबल क्‍लेम, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीडनाशक उर्वरित अंश पातळी, नोंदणी केलेल्या भाजीपाला पिकांचा दर पंधरवड्यास कीड/ रोग स्थितीचा अहवाल दिला जातो. या सर्व गोष्टींचे अभिलेख जतन करणे इ. बाबत कृषी विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाते.
  • निर्यात होणाऱ्या कृषिमालाला फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हानिहाय फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारी पद्धती निश्‍चित करण्यात आली आहे.
  • सन २०१६-१७ पासून राज्यात ग्रेपनेट, मॅंगोनेट, अनारेनेट व व्हेजनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर कार्यप्रणालीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी या वर्षापासून सर्व सेवा सेवा हमी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या अाहेत. आपले सरकार या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • सन २०१६-१७ मध्ये नोंदणी केलेल्या बागांचा तपशील

    हॉर्टीनेट  बाग/ शेतांची संख्या
    ग्रेपनेट (द्राक्ष)   ३३,४६२
    अनारनेट (डाळिंब)  २,७००
    मॅंगोनेट (आंबा)  ६,५४३
    व्हेजनेट (भाजीपाला)   १,८५६
    एकूण ४४,५६१

    शिफारशीचा अवलंब महत्त्वाचा ः

  • हॉर्टीनेटअंतर्गत नोंदणी केलेल्या बागायतदारांनी कीडनाशकांच्या प्रकारानुसार त्याचा वापर, साठवणूक व रिकामे डबे/ बाटलीची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी.
  • कृषी मालावरील किडी व रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. कीडनाशकांचा लेबल क्‍लेमप्रमाणेच प्राथमिक अवस्थेमध्ये वापर करावा.
  • ज्या कीडनाशकांचा पूर्व हंगाम कालखंड (पीएचआय) जास्त आहे, अशा कीडनाशकांचा फळे व भाजीपाला काढणीपूर्व वापर करू नये. कारण पीएचआयचा कालावधी लक्षात न घेता कीडनाशकांचा वापर न केल्यास आपण उत्पादित केलेल्या मालात किडनाशके उर्वरित अंशाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्‍यता आहे.
  • मर्यादेपेक्षा जास्त कीडनाशके उर्वरित अंशाचे प्रमाण आढळून आल्यास त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे असा शेतमाल निर्यातीसाठी पाठविता येत नाही.
  • कीटकनाशक अधिनियम-१९६८ आणि कीटकनाशक नियम-१९७१ अन्वये कीटकनाशकांचे उत्पादन व विक्रीकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. कीटकनाशकांची नोंदणी करताना त्यातील रसायनाच्या तीव्रतेचे प्रमाण विचारात घेतले जाते.
  • नोंदणी प्रमाणपत्रासोबत लेबल व लिफलेट मंजूर करून दिले जाते, त्यामध्ये सदरचे कीडनाशक कोणत्या पिकाकरिता, कोणत्या किडी व रोगांकरिता आणि किती प्रमाणात वापरावयाचे याची माहिती असते. कीडनाशकांचा वापर केल्यानंतर त्यामधील उर्वरित अंशाचे प्रमाण किती दिवसांपर्यंत शेतमालात राहू शकते (पीएचआय) याचा सविस्तर तपशील दिलेला असतो. तो प्रत्येक कीडनाशकाच्या बाटलीसोबत घडी प्रतिकेच्या स्वरूपात स्थानिक भाषेबरोबर इंग्रजी आणि हिंदी भाषेत तपशीलवार देणे बंधनकारक आहे.
  • शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाला पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरिता कीडनाशकांची खरेदी करताना मंजूर लेबल क्‍लेम असलेल्या कीडनाशकांची अधिकृत परवानाधारक कीटकनाशक विक्रेत्याकडून रितसर पावती घेऊनच खरेदी करावी. कीडनाशकासोबत घडीपत्रिका मागून घ्यावी.
  • अपेडा फार्मर कनेक्‍टर मोबाईल ॲप

  • सन २०१७-१८ मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून नोंदणीसाठी थेट अर्ज करता यावा यासाठी अपेडाने ‘अपेडा फार्मर कनेक्‍टर मोबाईल ॲप` विकसित केले आहे.
  • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्याच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी केल्यास हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टिमधील द्राक्ष, डाळिंब, आंबा ही फळे आणि भेंडी, कारली, मिरची, वांगी, दुधी भोपळा, शेवगा, गवार इ. भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम शेतांची नोंदणी करता येते.
  • सदर मोबाईल ॲप हे अपेडाच्या वेबसाईटवरून किंवा Mobile Aap मधून हे ॲप उत्पादकांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे. सदर मोबाईल ॲपवरून नोंदणीसाठी अर्ज केल्यास संबंधित शेतकऱ्यांना/ अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती कळू शकेल.
  • या प्रणालीमुळे कार्यलयीन स्तरावर अर्ज ऑनलाइन करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. वेळेवर नोंदणी होईल.
  • शेतकरी निर्यातदार कंपनीला संधी

  • जागतिक बाजारपेठेत आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाली आहे. सॅनिटरी व फायटोसॅनिटरी कराराची अंमलबजावणी प्रगत व प्रगतिशील देशांमार्फत सुरू झाली आहे. त्यामुळे आयातदारामार्फत व प्रमुख आयातदार देशांमार्फत गुणवत्ता आणि कीड रोगमुक्त शेतमालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ट्रेसेबिलिटीला विशेष महत्त्व  आहे.
  • प्रमुख आयातदारांचा कल हा ट्रेडर-निर्यातदाराऐवजी उत्पादक निर्यातदाराकडून आयात करण्याचा आहे. याचा भविष्यात निश्‍चितच फायदा उत्पादक निर्यातदार यांना होणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या गटाने एकत्रित येऊन शेतकऱ्यांची निर्यातदार कंपनी स्थापन करून जागतिक बाजारपेठांबरोबरच स्थानिक बाजारपेठांतील ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट दर्जाच्या शेतमालाचे उत्पादन करावे. ग्राहकांना आवश्‍यक असणाऱ्या शेतमालाचे प्रमाणीकरण करून निर्यात करण्यास वाव आहे.
  • केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमार्फत फळे, फुले व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.
  • संपर्क ः गोविंद हांडे , ९४२३५७५९५६  (तंत्र अधिकारी (निर्यात कक्ष), कृषी आयुक्तालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com