फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म सनफ्रीज’

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) ने नाशवंत फळे व भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म सनफ्रीज’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विजेच्या वापराविना म्हणजेच सौर पॅनेल्स व अन्य तंत्रज्ञान वापरून तुलनेने कमी खर्चिक व छोट्या शेतकऱ्यांसाठी हा फ्रिज अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे संबंधित शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सनफ्रीज व त्यात साठविलेला भाजीपाला.
सनफ्रीज व त्यात साठविलेला भाजीपाला.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) ने नाशवंत फळे व भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म सनफ्रीज’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विजेच्या वापराविना म्हणजेच सौर पॅनेल्स व अन्य तंत्रज्ञान वापरून तुलनेने कमी खर्चिक व छोट्या शेतकऱ्यांसाठी हा फ्रिज अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे संबंधित शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.   ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर राहते. पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात तर २४ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहण्यासारखी परिस्थिती असते. अशावेळी फळे, भाजीपाला यासारखा नाशवंत शेतमाल टिकवण्याचे आव्हान शेतकरी किंवा व्यावसायिकांपुढे राहते. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) ने याच समस्येवर अभ्यास केला. त्यातून ‘पुसा फार्म सनफ्रीज’ हे तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. राजस्थानच्या उष्ण वातावरणात त्याची चाचणी यशस्वी झाल्याने या माध्यमातून शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल टिकविण्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. ‘आयएआरआय’ च्या कृषी अभियांत्रिकी विभागातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संगीता चोप्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तंत्रज्ञानावर संशोधन केले आहे. डॉ. चोप्रा म्हणाल्या की दुर्गम भागात शीतगृहासारखी पर्यायी सुविधा उपलब्ध करण्याबरोबर फळे, भाजीपाला यांचा टिकवण कालावधी वाढावा या उद्देशाने पुसा सनफ्रीज हे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले. यामध्ये १५ दिवसांसाठी दोन टनांपर्यंत फळे व भाजीपाला यांची साठवणूक करता येणार आहे. शेतमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी देखील हा पर्याय वरदान ठरेल. बाजारात भाजीपाला, फळे आणि फुलांच्या दरात सतत चढउतार होतात. त्या अनुषंगाने या फ्रीजमध्ये साठवणूक करून बाजाराचा अंदाज घेत शेतमालाची विक्री करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. या तंत्राच्या माध्यमातून अंडी देखील१५ दिवस टिकविता आली आहेत. अशी आहे संरचना आकार मर्यादित असल्याने हा फ्रिज एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज हलविणे शक्य होते. गोदाम तसेच शेताच्या जवळपास त्याची उभारणी करता येईल. फ्रिज संचाच्या वरील बाजूस पाच सोलर पॅनेल बसविले आहेत. त्या माध्यमातून पाच किलोवॅट ऊर्जेचे उत्पादन होते. त्याचा वापर करून दीड टन वातानुकूलित यंत्र (एसी) संचलित होते. ‘एसी’ थंडाव्याव्दारे छताच्या वरच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या कंटेनरमधील पाणी थंड केले जाते. या संचामध्ये पाइप बसविण्यात आले असून सबमर्सिबल पंपाचा वापर करून कंटेनरमधील थंड पाणी पाईपमध्ये फिरवले (सर्क्‍युलेट) केले जाते. अशाप्रकारे संपूर्ण कक्ष थंड होतो. सायंकाळी ‘एसी’ आणि पंप बंद होतो. थंड पाणी पाईपमध्ये साठलेले राहते. त्यामुळे कक्षातील वातावरण रात्रभर थंड राहण्यास मदत होते. तंत्रज्ञानाला मागणी हे तंत्रज्ञान पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित आहे. त्यास देशभरातून मागणी वाढते आहे. आत्तापर्यंत पाच ठिकाणी या तंत्रज्ञानाची उभारणी करण्यात आली आहे. यात चमरारा (पानिपत), पिचौलीया (राजस्थान), पल्ला (दिल्ली) याप्रमाणे तीन तर ‘आयएआरआय’ प्रक्षेत्रात (नवी दिल्ली) शेतकऱ्यांना पाहता यावे याकरिता दोन ठिकाणी हे फ्रिज उभारण्यात आले आहेत. तन्वीर सिंग यांचा अनुभव ज्या भागात उन्हाची तीव्रता अधिक असते अशा भागात त्याची उपयोगिता अधिक आहे. पिचोलीया (जि..अजमेर, राजस्थान) येथील तन्वीर सिंग यांनी आपल्या शेतात हे तंत्रज्ञान बसविले आहे. ते १५ एकरांत मिरची, टोमॅटो, कोबी, पालक, धने या सारखी पिके घेतात. बाजारात दर कोसळतात त्यावेळी नाशवंत शेतमाल त्या पडेल भावात विकावा लागायचा. आता मात्र ‘सनफ्रीज’ मुळे चार ते सहा दिवस भाजीपाला साठवता येतो. बाजारात तेजी असेल त्यावेळी विक्रीचा निर्णय घेणे शक्‍य होते असे त्यांनी सांगितले. राजस्थानमध्ये उन्हाळ्यात ४० ते ४२ अंश से.पर्यंत तापमान जाते. त्यावेळी ‘सनफ्रीज मधील तील तापमान ८ अंश से. पर्यंत नियंत्रित करता येते. लॉकडाऊनकाळात अंड्यांची साठवणूक केली होती. त्याचा फायदा झाल्याचे ते म्हणाले. ५० बाय ५० फूट जागेत त्याची उभारणी केली आहे.   पुसा सनफ्रीजचे तंत्रज्ञान

  • किंमत- पाच लाखांपर्यंत
  • फोटोव्हॉल्टिक वॅटेज- ५ केडब्ल्यू
  • बांधकाम क्षेत्रफळ- ३५ मीटर वर्ग
  • बांधकाम उभारणी कालावधी- एक महिना.
  • आकार- ३ बाय ३ बाय ३ मीटर.
  • दिवसाचे आतील तापमान- ८ ते १० अंश से.
  • रात्रीचे आतील तापमान- १२ ते १४ अंश से.
  • फ्रिजच्या बाहेरील भिंती या विशिष्ट नॉयलॉन फॅब्रिकच्या बनविल्या आहेत. पाणी शोषून घेण्याचे व पसरवण्याचे काम त्या करतात.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व विशेष उपयोगी आहे. कारण कोणतीही वीज त्यासाठी लागत नाही.
  • स्थानिक सामानाचे घटक वापरूनही या फ्रिजची उभारणी करता येते.
  • तंत्रज्ञानात वापरलेल्या बाबी
  • आयर्न मेशवर फॅब्रीकचा वापर केल्याने कक्षाच्या भिंतींना विशेष ताकद व संरक्षण देण्यात आले आहे.
  • छप्पर व फरशीचा भाग हा ‘आरसीसी’ बांधकामाचा आहे. त्याला ‘ॲटोक्लेव्हड एरिएटेड कॉंक्रीट’ ब्लॉक्स.
  • आतील भिंतींना कमी खर्चिक पाच सेंटीमीटर जाडीचे, उच्च घनतेचे ( २२ ते ३२ किलो प्रति मीटर क्यूब)स्टायरोफोम पॅनेल्स. त्यांचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी पत्र्यांचा वापर.
  • मॉडिफाइड मिनी स्प्लिट इन्व्हर्टर एअर कंडिशनिंग युनिट.
  • १४ सौर पॅनेल्स. प्रत्येकी ३५० वॅटचे.
  • इन्व्हर्टरची विशेष संरचना. बॅटरी किंवा ग्रीड व्यतिरिक्त चालण्यासाठी.
  • रात्रीच्या वेळी सौर ऊर्जा काम करू शकत नाही. अशावेळी थंड पाणी टाकी,
  • चार इंची व्यासाची पाइप व विशेष प्रवाह नियंत्रण पद्धती.
  • दिवसा उष्णतेचे नियमन करण्यासाठी स्टेनलेस स्टील चा किंवा प्लॅस्टिकचा १२० लिटर क्षमतेचा ड्रम.
  • (हीट एक्सेंजर)
  • दिवसा तापमानात सातत्याने चढ उतार होऊ शकतो. अशावेळी इन्व्हर्टरवर दाब येऊ नये तसेच
  • फ्रीजमधील तापमान नियंत्रित राहावे यासाठी पायरॅनोमीटरचा वापर.
  • संपर्क- तन्वीर सिंग-०९६६०२३८२५७ डॉ.संगीता चोप्रा- ०९२७८७४५२५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com