सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित नेपियर

वर्षभर हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी संकरित नेपिअर चारा पिकाची लागवड करावी.
वर्षभर हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी संकरित नेपिअर चारा पिकाची लागवड करावी.

महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे अत्यंत गरजेचे आहे. वर्षभर हिरवा आणि पौष्टिक चारा जनावरांना मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा याकरिता संकरित नेपियरच्या बीएचएन-१० या जातीची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी छोट्या व मोठ्या जनावरांची संख्या, क्षेत्र आणि सिंचन सुविधा यांची उपलब्धता इ. बाबी तपासून नियोजन करावे.   दुग्ध व्यवसायात एकूण खर्चाच्या ६०-६५ टक्के खर्च हा पशुखाद्य व वैरण या दोन घटकावर होतो. दिवसेंदिवस खुराकाच्या वाढत जाणाऱ्या किमतीमुळे असे खाद्य पुरेशा प्रमाणात जनावरांना खाऊ घालणे परवडत नाही, परिणामी संतुलित आहाराच्या आभावामुळे जनावराची उत्पादकता कमी होते. बीएचएन-१० या बहुवार्षिक व तुलनात्मकदृष्ट्या कमी पाण्यावर तग धरणाऱ्या‍ गवताची लागवड केल्यास काही प्रमाणात चाऱ्याची कमतरता कमी करता येईल. बीएचएन-१० संकरित नेपियरची वैशिष्ट्ये

  • बहुवार्षिक गवत त्यामुळे वर्षभर नियमित हिरवा चारा उपलब्ध होतो. एकदा लागवड केल्यास कमीत कमी ३ ते ४ वर्षे हिरव्या चाऱ्या‍चा पुरवठा होतो. हंगामी चारा पिकांप्रमाणे मशागत जसे नांगरणी, कुळवणी इ. वर सतत खर्च करावा लागत नाही त्यामुळे उत्पादन खर्चातदेखील बचत होते.
  • बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून विकसित केलेले हे वाण असून, पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारे आहे. त्यामुळे वर्षभर मुबलक तसेच सकस हिरवा चारा उपलब्ध होतो.
  • या गवताची सरासरी उंची १८५–१९० सें.मी. असून प्रति ठोंबास फुटव्याची संख्या ३०-४० असते. वर्षभरात १८०-२०० मे. टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
  • प्रथिनांचे प्रमाण १० ते १२ टक्के असून, ओक्झलिक अॅसिडचे प्रमाण अत्यल्प असते. कोणतेही हानिकारक घटक नसल्यामुळे जनावरांना त्यामुळे कोणताही अपाय होत नाही.
  • खोड इतर संकरित नेपियर वाणाच्या तुलनेने मऊ व रसाळ असल्यामुळे या चाऱ्या‍ची कापणी करताना कोणताही त्रास होत नाही. चारा चाफकटरशिवाय कुट्टी न करता जनावरांना खाऊ घालता येतो. त्यामुळे खर्चात व मनुष्यबळात बचत होऊन चाऱ्या‍चा कोणताही भाग वाया जात नाही.
  • चारा जनावरे आवडीने खातात. यापासून उत्तम प्रतीचा मुरघासदेखील बनविता येतो.
  • शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञान

  • संकरित नेपियरच्या सर्वच वाणाच्या योग्य वाढ आणि अधिक उत्पादनासाठी उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. जास्त पाऊस तसेच अधिक आर्द्रता पिकास हानिकारक आहेत.
  • चांगली निचऱ्यायाची पोयट्याची जमीन निवडावी. शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जमीन प्रथम नांगरून वखरणी करून शेत तयार करतेवेळी हेक्टरी १०-१५ मे. टन कुजलेले शेणखत जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
  • पिकाची लागवड पाण्याची हमखास सोय असल्यास या हंगामातही करता येईल. एक हेक्टर क्षेत्राकरिता १८ ते २० हजार ठोंब अथवा कांड्या (२-३ डोळे असणाऱ्या) पुरेशा आहेत. लागवड शक्यतो सरी वरंब्यावर ९० x ६० सें.मी अंतरावर करावी.
  • लागवडीच्या वेळी हेक्टरी २५ : ५० : ५० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश या खताची मात्रा द्यावी. हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी २५ किलो नत्र खताची मात्रा द्यावी.
  • जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे. या हंगामात १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. शेतात जास्त पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • लागवडीनंतर एक महिन्याने मातीची भर दिल्यास अधिक फुटवे फुटतात व पीक जोमदार वाढते.
  • पहिली कापणी लागवडीनंतर ३ महिन्यांनी आणि नंतरच्या कापण्या ४० - ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. वर्षभरात एकूण ६ - ८ कापण्या मिळतात व त्यापासून सरासरी हेक्टरी १८० ते २०० मे. टन हिरव्या चाऱ्या‍चे उत्पादन मिळते.
  • संपर्क ः डॉ. संजय कदम, ९८३३५४०९१२ (वैरण विकास अधिकारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव (पूर्व), मुंबई)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com