चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर पॅलेट्स उपयुक्त

टंचाई काळात चाऱ्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून हाय फायबर पॅलेट्स उपयुक्त आहेत
टंचाई काळात चाऱ्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून हाय फायबर पॅलेट्स उपयुक्त आहेत

चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पादन क्षमता टिकवणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण जेव्हा पुढील काळात हिरवा/कोरडा चारा किंवा खाद्य उपलब्ध असेल तेव्हा जनावरांची शारीरिक झीज भरून काढून पुन्हा उत्पादन क्षमता वाढविण्यास जास्त वेळ लागेल. या टंचाई काळात चाऱ्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून हाय फायबर पॅलेट्सची उपयुक्तता आपण जाणून घेऊ.   दुभत्या जनावरांचे संगोपन करताना उत्पादकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात कमी होत जाणारी चाऱ्याची उपलब्धता. अशा टंचाईच्या काळात चाऱ्याच्या व खाद्याच्या किमती वाढत जातात व त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जगात सर्वत्र पशुधनाला दुष्काळसदृश स्थितीचा सामना कधी न कधी करावा लागला आहे, तर काही देशात जसे की दुबई तसेच इतर संयुक्त अरब अमिराती वाळवंटी देशामध्ये कुठलाच चारा उगवत नाही. सर्व प्रकारच्या चारा व पशुखाद्य इ.साठी त्यांना बाहेरील देशांवर अवलंबून राहावे लागते; पण अशा परिस्थितीतही या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दुभते पशुधन असून, उन्हाळ्यात सुमारे ५५ अंश सेल्सिअस तापमानातही या जनावरांच्या उत्तम व्यवस्थापनातून चांगले उत्पादन घेतले जाते. या देशांमध्ये जास्त दूध देणाऱ्या गायींना सोयाबीन, मका, बायपास फॅट व इतर पोषकतत्त्वांनी युक्त आहार दिला जातो, चाराही मोजून दिला जातो व या खाद्य आणि चारा या दोन्हींच्या मध्ये असणारा एक घटक त्यांना देण्यात येतो तो म्हणजे हाय फायबर पॅलेट्स. म्हणजे खाद्य व तंतुमय पदार्थ (फायबर) या दोघांचे पॅलेट् स्वरूपातील संतुलित मिश्रण. हाय फायबर पॅलेट्सची उपयुक्तता

  • गायी-म्हशींना असणाऱ्या चार पोटांमध्ये (अनुक्रमे: जाळीपोट, कोठीपोट, पडदेपोट व खरेपोट) कोठी पोटाची क्षमता सर्वांत जास्त म्हणजे सुमारे १५० ते २०० लिटर इतकी असते.
  • कोठीपोट पूर्ण भरल्याशिवाय जनावरांना भूक भागल्याची भावणा होत नाही. चाऱ्यातील फायबर किंवा तंतुमय पदार्थ ही गरज पूर्ण करतो. भूक न भागलेली जनावरे सारखी हंबरताना दिसतात.
  • जसजसा उन्हाळा वाढत जातो तसा दुभत्या जनावरांवरील ताणही वाढत जातो अशा वेळी आवश्यक पोषकतत्त्वे शरीरात गेली तरच जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकून राहू शकते.
  • टंचाई काळात चाऱ्याच्या, कच्या मालाच्या व पशुखाद्याच्या किमतीही वाढत जातात त्यामुळे दूध उत्पादकांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात परिपूर्ण पशुआहार देणे काही वेळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा वेळेस पशू खाद्यापेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के कमी किमतीत हाय फायबर पॅलेट्स उपलब्ध होऊ शकते.
  • चाराटंचाई काळातील समस्या

  • दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात सातत्य ठेवणे.
  • जनावरांचे शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवणे.
  • परवडणाऱ्या किमतीत चारा, खाद्य इ. ची उपलब्धता करणे.
  • उपलब्ध चारा व खाद्य इ. मोजून देणे व नासाडी टाळणे.
  • दुभती व गाभण जनावरे, वासरे, बैल इ. ना वजनाप्रमाणे खुराक देणे.
  • वजनानुसार खाद्याचे नियोजन सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावराच्या वजनाप्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते. जास्त खाद्य व चारा दिल्यामुळे जास्त दूध मिळेल ही धारणा चुकीची आहे. प्रथम जनावराचे वजन करावे त्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा. सूत्र ः {जनावराच्या छातीचा घेर (इंच)}२ x लांबी (इंच) = जनावराचे वजन (किलो)/ ६०० उ.दा. {६६ x ६६ } x ७० / ६०० = ५०८ किलो वजन जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायांमागून मोजलेला छातीचा घेर इंचांमध्ये त्याचा वर्ग, गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटापर्यंतचे अंतर इंचामध्ये भागिले ६०० बरोबर जनावराच अंदाजे वजन किलोमध्ये आपल्याला मिळते. वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य व चारा देण्याचे प्रमाण

    जनावराचे वजन (किलो) एकूण शुष्क पदार्थ (वजनाच्या ३ टक्के) पशुखाद्य (किलो) कोरडा चारा (किलो हिरवा चारा (किलो)
    ४०० १२ किलो ५.५ १८
    ४५० १३.५ किलो ४.५ १६
    ५०० १५ किलो ६.५ २२
    ५५० १६.५ किलो ५.५ २५

      टीप

  • पशुखाद्य, कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आर्द्रतेसह गृहीत धरले आहे.
  • वरील प्रमाण हे २४ तासांचे असून दोन वेळेस विभागून जनावरांना द्यावे.
  • हिरवा चारा उपलब्ध नसल्यास कोरडा चारा वाढवून द्यावा.
  • याव्यतिरिक्त दुभत्या गाई, म्हशींना बायपास फॅट व प्रिमिक्स द्यावे.
  • संपर्क ः डॉ पराग घोगळे, ९८९२०९९९६९ (लेखक बर्ग + श्मिट इंडिया, पुणे येथे पशू आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com