निरामय आरोग्यासाठी समतोल आहार

समतोल आहार
समतोल आहार

ज्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, सिग्धपदार्थ, क्षार व जीवनसत्त्वे ही सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात आणि शरीराच्या गरजेनुसार पुरेशी कार्यशक्ती पुरवली जाते. तसेच भविष्यासाठी पोषकतत्वे आणि कार्यशक्ती पुरवली जाते , कार्यशक्तीचा शरीरात साठाही केला जातो अशा आहाराला समतोल आहार असे म्हणता येईल.

समतोल आहारामुळे शारीरिक शक्ती, मानसिक तत्परता, बौद्धिक प्रगल्भता, रोगप्रतिकारक शक्ती, सौंदर्य, उमदे व सुदृढ व्यक्तिमत्त्व व आरोग्यपूर्ण दीर्घायुषी जीवन मिळते. सामान्यतः आजच्या आहारामुळे वरील सर्व गोष्टी मिळतात असे नाही. म्हणजेच आजचा आहार समतोल म्हणता येणार नाही. आजच्या आहाराचे वर्णन आहारतज्ज्ञांनी पुढील शब्दांत केले आहे.

सत्त्वहीन अाहार आजचा आहार सत्त्वहीन आहे. उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट होईल. धान्यातील सत्त्व हे धान्याच्या पापुद्र्यात आणि टोकात असते. आपण धान्याचा उपयोग करताना हे आवरण व टोके फेकून देतो. म्हणजे धान्य सत्त्वहीन करतो. उत्तम गोड पदार्थ म्हणजे ऊस. त्यानंतर उसाचा रस, नंतर काकवी, मग गूळ आणि उसातील सर्व क्षार, जीवनसत्त्वे नाहीसे झाल्यावर तयार होते साखर. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, आंत्रवण इत्यादीचे प्रमाण वाढले.

कृत्रिम अाहार अन्नपदार्थांची चव, त्याचा रंग, सवय इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच माणसाने कृत्रिम अन्नपदार्थांची निवड करायला सुरवात केली आहे. उदा. उसापासून साखर, गव्हापासून पाव, शेंगदाणे आणि तिळापासून रिफाइंड तेल हे सर्व पदार्थ कारखान्यात तयार होतात. जेव्हा माणूस नैसर्गिक अन्नपदार्थ सोडून कारखान्यातील अन्नपदार्थ वापरतो, तेव्हा त्यामधील बऱ्याच मोठ्या आहारघटकांचा नाश झालेला असतो. संस्कारित अन्नपदार्थ माणसाला जास्त आवडतात. त्यामुळे त्याचे प्रमाणही वाढले.

अन्नाचे वर्गीकरण आहार घटकांच्या प्रमाणाचा विचार करून अन्नाचे निरनिराळे गट पाडण्यात आले आहे. या गटाचा योग्य त्या प्रमाणात वापर केल्यास संतुलन आहार ठेवता येतो. १. प्रथिनयुक्त गट (प्रोटिन फूड) प्रथिने शरीराच्या वाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी आवश्‍यक असतात. या अन्नपदार्थातून चांगल्या दर्जाच्या प्रथिनांचा पुरवठा होऊ शकतो अशा पदार्थांचा या गटात समावेश केला आहे. दूध, दुधाचे पदार्थ, लोणी सोडून मासे, अंडी, खाद्यपक्षी या प्राणिजन्य (प्राण्यापासून मिळणारे) पदार्थांचा तसेच कडधान्य, डाळी, कठीण कवचाची फळे, तेलबिया या वनस्पतिजन्य पदार्थांचा या गटात समावेश होतो. २. संरक्षण गट (प्रोटेक्‍टिव फूड) या अन्नपदार्थातून जीवनसत्त्वांपैकी (अ) आणि (क) ही पुरवली जातात. तसेच क्षारांपैकी कॅल्शिअम व लोह हेपण मिळतात. त्या अन्नपदार्थांना संरक्षण अन्न असते म्हणतात. यामध्ये पालेभाज्या, पिवळी व नारंगी रंगांची फळे व आंबट फळे येतात. उदा. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, आंबा, पेरू, संत्री, मोसंबी, आवळा, गाजर. ३. दुय्यम संरक्षण गट (सेकेंडरी प्रोटेक्‍टिव फूड) या गटामध्ये दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट न केलेले किंवा राहिलेल्या भाज्या व फळांचा समावेश होतो. या भाज्या व फळातून जीवनसत्त्वे व क्षार पुरवले जातात. मात्र कुठल्याही जीवनसत्त्वाचा व क्षारांचा अधिक प्रमाणात पुरवठा होत नाही. आहारात विविधता आणण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो. या गटात बटाटे, रताळी, सुरण या कंद भाज्या तसेच तोंडली, दुधी भोपळा, पडवळ इत्यादी भाज्यांचा समावेश होतो व केळी, सफरचंद इत्यादी फळांचा समावेश होतो. ४. कार्यशक्ती गट (एनर्जी फूड व एकदल धान्य) ज्या अन्नपदार्थांमुळे प्रामुख्याने शक्तीचा पुरवठा होतो. अशा अन्नपदार्थांचा या गटात समावेश होतो. यामध्ये तांदूळ, गहू, मका या धान्यांचा तसेच पोहे, लाह्या, रवा, मैदा इत्यादी धान्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा समावेश होतो. आपल्या आहारात धान्याचे प्रमाण सर्वांत जास्त असते. धान्यामध्ये द्विदलापेक्षा प्रथिनांचे प्रमाण कमी असते. तरीही धान्यांचा वापर कडधान्यापेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याने धान्य प्रथिनांचा पुरवठा करतात. धान्यापासून मिळणारी प्रथिने ही दुय्यम दर्जाची असतात. संपूर्ण धान्यांचा वापर केल्यास धान्यांमधून ‘ब’ गटातील जीवनसत्त्वांचा व लोह यांचा पुरवठा होतो. ५. संपृक्त कार्यशक्ती देणारा गट लोणी, तूप, मार्गारिन, लार्ड यांसारख्या स्निग्धपदार्थांचा या गटात समावेश होतो. तसेच साखर, गूळ, मध, काकवी हेपण या गटात येतात. एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ कॅलरीजचा पुरवठा होतो. तर एक ग्रॅम कर्बोदकापासून ४ कॅलरीजचा पुरवठा होतो. स्निग्धपदार्थापेक्षा शर्करांचे पचन व शोषण चटकन होत असल्याने स्निग्ध घटकांपेक्षा कर्बोदकापासून चटकन कार्यशक्ती मिळते. ग्लुकोजचे तसेच शोषण होते. आहार हा हवामान, वय, लिंग, शारीरिक श्रम व कष्ट आणि स्त्रियांच्या विशिष्ट शारीरिक अवस्था यावर अवलंबून असतो.   संपर्क ः कृतिका गांगडे, ७५८८५०१४८९ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com