जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये महत्त्वाची...

दुधाळ जनावरांना संतुलित पशूखाद्य दिल्याने आरोग्य आणि दुग्धोत्पादन चांगले रहाते
दुधाळ जनावरांना संतुलित पशूखाद्य दिल्याने आरोग्य आणि दुग्धोत्पादन चांगले रहाते

दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली झीज व वजन वाढीस होणारा उशीर याचा सरळ संबंध अंडाशयाच्या सुरळीत कार्यात अळथळा निर्माण करतो. प्रसूतीनंतर काही दिवसांत खाद्यात वाढ केली तर त्याचा अंडाशयाच्या कार्यक्षमतेवर चांगला फरक दिसून येतो. जास्त दूध देणाऱ्या जनावरांत प्रथिनाचे योग्य पचन झाल्यास प्रजननास मदत होते. दुधाळ जनावरांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शारीरिक, मानसिक व ग्रंथीस्त्रावामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येतो. प्रसूतीनंतर ती दुधावर येण्यासाठी भरपूर प्रमाणात ऊर्जाची गरज असते. त्यासाठी जनावरे शरीरातील जमा असलेली शक्ती व खाद्यावाटे मिळणाऱ्या ऊर्जावर अवलंबून असतात. प्रसूतीनंतरच्या काळात साधारणतः अर्धा किलो स्निग्ध पदार्थ, ०.०४ किलो प्रथिने प्रति दिन शरीरातून वापरली जातात. दुधाळ कालावधीच्या पहिल्या ६० दिवसांत ११.४ ते १६ किलो प्रथिने शरीरातून वापरले जातात. पहिल्या आठवड्यात दुधामुळे जनावरांची ऊर्जेची मागणी जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या शारीरिक वजन व आकारमानामध्ये घसरण दिसून येते.

  • शरीराचे वजन व आकारमान कमी होण्याचा कालावधी बऱ्याच बाबींवर अवलंबून असतो. यामध्ये जनावरांची जात, प्रसूतीचा अंक, खाद्याची प्रत, दुधाचे उत्पादन, ऋतू यांचा समावेश होतो.
  • लहान आकारमानाच्या तुलनेत मोठ्या म्हशीमध्ये जास्त प्रमाणात वजन कमी होते. वजन घटण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त दिसून येते. जर १० टक्के वजनामध्ये घट आली तर त्याचा प्रजननावर फरक दिसून येतो. १७ ते २३ टक्के वजनात घट झाली असल्यास अंडाशयातून अंडबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर फरक दिसून येतो. तसेच २३ टक्क्यांपेक्षा जास्त वजनात घट झाल्यास त्याचा अंडबीजच्या आकारमानावर फरक दिसून येतो.
  • प्रसूतीनंतर जनावरांमध्ये लवकर वजन व आकारमान वाढ दिसून आली तर त्याचा सरळ संबंध चांगल्या प्रजनन क्षमतेशी येतो. दुधाळ जनावरे लवकर माजावर येतात, कोरडा कालावधी कमी होतो व एकंदरीत गाभण राहण्याचे प्रमाणात सुधारणा दिसून येते.
  • जनावरांच्या आकारमानाचे मूल्यांकन १ ते ५ केले जाते. गायीच्या प्रसूतीवेळेस आकारमान ३ ते ३.७५ असणे अपेक्षित असते. व्यायल्यानंतर आकारमान साधारणत: १ ने कमी होते. आकारमान १ पेक्षा जास्तीने कमी झाल्यास त्याचा प्रजनन संस्थेशी सरळ संबंध दिसून येतो.
  • प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतर खाद्य व्यवस्थापनाचे नियोजन ः

  • प्रसूतीच्या २५ दिवसांनंतर दुधाळ जनावरांचा चारा किमान ५ टक्क्यांनी वाढवावा.
  • प्रसूतीनंतर जनावरांची ऊर्जा भागून निघेल, अशा प्रतीचे योग्य प्रमाणात खाद्य देणे आवश्यक आहे.
  • प्रसूतीनंतर काही जनावरे नवीन कोरडा चारा खाण्यास पसंती दाखवत नाही किंवा अशा कोरड्या चाराने त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. अशा परिस्थितीमध्ये उपाय म्हणून प्रसूतीच्या ३ ते ४ आठवडे आधी थोड्या प्रमाणात नवीन कोरडा चारा देण्यास सुरुवात करावी.
  • प्रसूतीआधी चांगले खाद्य व्यवस्थापन झाले तर त्याचा परिणाम प्रसूतीनंतर दिसून येतो. साधारत: ६० दिवसांत गाय व ९० दिवसांत म्हशी गाभण राहण्यास मदत होते.
  • खाद्यामध्ये प्रथिनांच्या प्रमाणात वाढ केल्यास त्याचा दुधात सकारात्मक फरक दिसून येतो.
  • बऱ्याच संशोधनात असे दिसून आले आहे की खाद्यात प्रमाणापेक्षा जास्त प्रथिने असल्यामुळे जनावरे गाभण राहत नाही.
  • प्रथिनाचे प्रमाण जेव्हा २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास माजाच्या वेळेस येणाऱ्या स्त्रावामध्ये युरिया नायट्रोजनचे प्रमाण ७.६ ते १९ मिलिग्रॅमपर्यंत जाते. वाढत्या युरिया नायट्रोजनमुळे गाभण राहण्याच्या प्रमाणात १० ते २० टक्क्यांनी फरक दिसून येतो. २० मिलिग्रॅमपेक्षा युरिया नायट्रोजनचे प्रमाण झाल्यास गर्भाशयातील द्रव्याचा लीटमस अंक बदलतो. त्यामुळे गाभण राहण्याच्या प्रमाणात कमीपणा दिसतो.
  • माजाच्या दिवशी येणाऱ्या स्त्रावात युरिया नायट्रोजनचे प्रमाण २० मिलिग्रॅमपेक्षा जास्त असल्यास गाभण राहण्याच्या प्रमाणात घट दिसून येते. त्यामुळे प्रथिनाचे प्रमाण १८ टक्क्यांच्या वर जाऊ देऊ नये.
  • खाद्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास खाद्यात ऊर्जेची भर पडते. स्निग्ध पदार्थाचे पशू स्तोत्र (मत्सयुक्त खाद्य) आणि वनस्पती स्तोत्र (तेलबिया) असे दोन स्तोत्र असतात. स्निग्ध पदार्थांचा प्रकार आणि प्रमाणाचा जनावरांवर बदल दिसून येतो. स्निग्ध पदार्थाच्या खाद्यात प्रमाण वाढल्याने प्रोजेस्टेरोनचे प्रमाण वाढते आणि पीजी एफटूअल्फा संप्रेरकाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंडाशयावर असलेले सी. एल. चा कालावधी वाढतो आणि गाभण राहण्याचे प्रमाण अधिक राहते.
  • मोनेनसीस (जैवनाशक) खाद्यामध्ये वापरल्यास रुमेनमध्ये असणाऱ्या फ्लोराचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुमेनमध्ये प्रोपीओनेट व ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्याचा पिटूटरी व अंडाशयाच्या कार्यावर चांगला फरक दिसून येतो. पण, मोनेनसीसचा (जैवनाशक) सरळ प्रजननाशी सरळ संबंध येत नाही.
  • ग्लूकोज, प्रथिने, इन्सुलीन, किटोनचा अभ्यास ः

  • पोषणशास्त्र व ग्रंथीशास्त्र यांचा सबंध पूर्णपणे समजणे आजपर्यंत शक्य झाले नाही. पण, त्यातील काही बाबींचा सरळ किंवा अवलंबून असलेला संबंध प्रजननशास्त्राशी दिसून येतो. त्यापैकी मुख्यत: ग्लुकोज, प्रथिने, इन्सुलीन, किटोनचा अभ्यास बऱ्याच प्रमाणात झाला आहे.
  • प्रसूतीनंतर उशिराने माजावर येणाऱ्या दुधाळ जनावरांमध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी आढळून आले आहे. ऊर्जाची आवश्यक पूर्तता न झाल्यास आणि शरीरात ग्लुकोजचे प्रमाण कमी असल्यास त्याचा एलएच संप्रेरकाच्या उत्पादनावर फरक दिसून येतो.
  • प्रसूतीनंतर ६० दिवसांपर्यंत ज्या दुधाळ गायी माजावर येत नाहीत त्यांच्यामध्ये प्रथिनांची कमी दिसून येते. शरीरातील वाढते स्निग्ध आम्ल सोबत कमी प्रमाणात ग्लुकोज व इन्सुलिन प्रजनन क्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरते.
  • इन्सुलिन वाढ प्रकार -१ चा सरळ संबध पोषकद्रव्ये व अंडाशयाच्या कार्यावर दिसून येतो. त्यामुळे अंडाशयावरील अंडबीजाची वाढ होते, एलएच संप्रेरकाचे प्रमाण वाढते, इतर काही संप्रेरक तयार होण्यास मदत होते. अंडाशयातून अंडबीज बाहेर येण्यास मदत होते.
  • संपर्क ः डॉ. चेतन लाकडे, ०८०८७१०९८७८ (पशुप्रजननशास्त्र विभाग, बिदर पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com